Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

लूक 3

बाप्तिस्मा करणारा योहान व त्याचा संदेश

मत्त. 3:1-6; मार्क 1:2-6; योहा. 1:19-23

आता तिबिर्य कैसराच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी, जेव्हा पंतय पिलात यहूदीया प्रांताचा शासक होता आणि हेरोद चौथाई गालील प्रांताचा शासक असताना आणि त्याचा भाऊ फिलिप्प हा चौथाई इतुरीया व त्राखोनीती या देशांचा शासक व लूसनिय हा चौथाई अबिलेनेचा शासक होता. आणि हन्ना व कयफा हे मुख्य याजक लोक होते, तेव्हा अरण्यात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे आले. तो यार्देनेच्या सभोवतालच्या सर्व परिसरात पापांच्या क्षमेसाठी पश्चात्ताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत फिरला.

यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हे झालेः

“रानात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी,

‘परमेश्वराचा मार्ग तयार करा,

त्याच्या वाटा सरळ करा.

प्रत्येक दरी भरली जाईल,

आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल,

वांकडी सरळ होतील,

आणि खडबडीत मार्ग सपाट केले जातील

आणि सर्व मनुष्यप्राणी देवाचे तारण पाहतील.’”

त्याच्याकडून बाप्तिस्मा करून घेण्यासाठी येणाऱ्या जमावाला योहान म्हणाला; “अहो, विषारी सापाच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्हास कोणी सावध केले? पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या आणि आपल्या मनात असे म्हणू नका की, ‘अब्राहाम आमच्या पित्यासारखा आहे.’ कारण मी तुम्हास सांगतो की, अब्राहामासाठी या दगडापासून मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. आताच झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. म्हणून प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाईल.”

नंतर जमावातील लोकांनी त्यास विचारले, “आता आम्ही काय करावे?” त्याने उत्तर दिले, “ज्याच्याकडे दोन अंगरखे असतील त्याने ज्याला नाही त्यास एक द्यावा आणि ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे.”

काही जकातदारही बाप्तिस्मा करून घ्यावयास आले होते. ते म्हणाले, “गुरुजी, आम्ही काय करावे?” तो त्यांना म्हणाला, तुम्हास जे नेमून दिले आहे त्यापेक्षा जास्त पैसे घेऊ नका. काही शिपायांनीसुद्धा त्यास विचारून म्हटले, “आणि आमच्या बद्दल काय, आम्ही काय करावे?” तो त्यांना म्हणाला, “कोणाकडून जबरदस्तीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करू नका, तुम्हास मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा.”

तेव्हा लोक उत्सुकतेने वाट पाहत असता प्रत्येकजण आपल्या अंतःकरणात हाच ख्रिस्त असेल काय म्हणून विचार करीत असत. त्या सर्वांना योहानाने उत्तर दिले, “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण एकजण जो माझ्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे तो येत आहे आणि त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासही मी पात्र नाही, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील. त्याचे खळे अगदी स्वच्छ करायला व गहू त्याच्या कोठारात साठवायला त्याचे सूप त्याच्या हातात आहे, पण तो भूस न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील.”

योहानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करून सुवार्ता सांगितली. योहानाने चौथाईचा शासक हेरोद याची कानउघडणी केली कारण त्याचे त्याच्या भावाच्या पत्नी हेरोदीया हिच्याशी अनैतिक संबंध होते, तसेच इतर अनेक वाईट गोष्टी त्याने केल्या होत्या. हे सर्व करून सुद्धा त्याने आणखी एक दुष्कर्म केले ते म्हणजे त्याने योहानाला तुरुंगात टाकले.

येशूचा बाप्तिस्मा

मत्त. 3:13-17; मार्क 1:9-11; योहा. 1:29-34

तेव्हा असे झाले की, जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा योहानाद्वारे केला जात होता, तेव्हा येशूचा ही बाप्तिस्मा होऊन तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले. आणि पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुझ्याविषयी फार संतुष्ट आहे.”

येशूची वंशावळ

उत्प. 5:1-32; 11:10-26; रूथ 4:18-22; 1 इति. 1:1-4; 1 इति. 1:24-27; मत्त. 1:2-16

जेव्हा येशूने त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोक त्यास योसेफाचा मुलगा समजत. योसेफ एलीचा मुलगा होता एली मत्ताथाचा, मत्ताथ लेवीचा, लेवी मल्खीचा, मल्खी यन्रयाचा, यन्रया योसेफाचा मुलगा होता. योसेफ मत्तिथ्याचा मुलगा होता. मत्तिथ्य अमोसाचा, अमोस नहूमाचा, नहूम हेस्लीचा, हेस्ली नग्गयाचा, नग्गय महथाचा, महथ मत्तिथ्याचा, मत्तिथ्य शिमयीचा, शिमयी योसेखाचा, योसेख योदाचा मुलगा होता. योदा योहानानाचा मुलगा होता. योहानान रेशाचा, रेशा जरूब्बाबेलाचा, जरूब्बाबेल शल्तीएलाचा, शल्तीएल नेरीचा, नेरी मल्खीचा, मल्खी अद्दीचा, अद्दी कोसोमाचा, कोसोम एल्मदामाचा, एल्मदाम एराचा, एर येशूचा, येशू अलिएजराचा, अलिएजर योरीमाचा, योरीम मत्ताथाचा, मत्ताथ लेवीचा मुलगा होता. लेवी शिमोनाचा मुलगा होता. शिमोन यहूदाचा, यहूदा योसेफाचा, योसेफ योनामाचा, योनाम एल्याकीमाचा, एल्याकीम मल्लयाचा, मल्लया मिन्नाचा, मिन्ना मत्ताथाचा, मत्ताथ नाथानाचा, नाथान दाविदाचा, दावीद इशायाचा, इशाय ओबेदाचा, ओबेद बवाजाचा, बवाज सल्मोनाचा, सल्मोन नहशोनाचा मुलगा होता. नहशोन अम्मीनादाबाचा मुलगा होता. अम्मीनादाब अदामीनचा, अदामीन अर्णयाचा, अर्णय हेस्रोनाचा, हेस्रोन पेरेसाचा, पेरेस यहूदाचा, यहूदा याकोबाचा, याकोब इसहाकाचा, इसहाक अब्राहामाचा, अब्राहाम तेरहाचा, तेरह नाहोराचा, नाहोर सरुगाचा, सरुग रऊचा, रऊ पेलेगाचा, पेलेग एबराचा, एबर शेलहाचा मुलगा होता. शेलह केनानाचा मुलगा होता. केनान अर्पक्षदाचा, अर्पक्षद शेमाचा, शेम नोहाचा, नोहा लामेखाचा, लामेख मथुशलहाचा, मथुशलह हनोखाचा, हनोख यारेदाचा, यारेद महललेलाचा, महललेल केनानाचा, केनान अनोशाचा, अनोश शेथाचा, शेथ आदामाचा, आदाम देवाचा पुत्र होता.

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.