Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

उत्प 30

याकोबापासून आपल्याला मुल होत नाहीत हे पाहिल्यावर राहेल आपली बहीण लेआ हिचा मत्सर करू लागली; तेव्हा राहेल याकोबाला म्हणाली, “मला मुल द्या, नाही तर मी मरेन.” याकोबाचा राहेलवर राग भडकला. तो म्हणाला, “ज्याने तुला मुल होण्यापासून रोखून धरले आहे, त्या देवाच्या ठिकाणी मी आहे की काय?” ती म्हणाली, “पाहा, माझी दासी बिल्हा आहे. तुम्ही तिच्या जवळ जा म्हणजे मग ती माझ्या मांडीवर मुलाला जन्म देईल व तिजपासून मलाही मुले मिळतील.” अशा रीतीने तिने त्यास आपली दासी बिल्हा पत्नी म्हणून दिली. आणि याकोबाने तिच्याबरोबर संबंध ठेवला. तेव्हा बिल्हा गरोदर राहिली व याकोबाच्या मुलाला जन्म दिला. मग राहेल म्हणाली, “देवाने माझे ऐकले आहे. त्याने माझा आवाज नक्कीच ऐकला आहे आणि मला मुलगा दिला आहे.” म्हणून तिने त्याचे नाव दान ठेवले. राहेलची दासी बिल्हा पुन्हा गर्भवती झाली व तिने याकोबाच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. राहेल म्हणाली, “मी माझ्या बहिणीशी प्रबळ स्पर्धा करून लढा दिला व विजय मिळवला आहे.” तिने त्याचे नाव नफताली ठेवले. जेव्हा लेआने पाहिले की, आता आपल्याला मुले होण्याचे थांबले आहे. तेव्हा तिने आपली दासी जिल्पा हिला घेतले आणि याकोबाला पत्नी म्हणून दिली. नंतर लेआची दासी जिल्पाने याकोबाच्या मुलाला जन्म दिला. लेआ म्हणाली, “मी सुदैवी आहे.” तेव्हा तिने त्याचे नाव गाद ठेवले. नंतर लेआची दासी जिल्पाने याकोबाच्या दुसऱ्या मुलाला दिला. लेआ म्हणाली, “मी आनंदी आहे! इतर स्त्रिया मला आनंदी म्हणतील” म्हणून तिने त्याचे नाव आशेर ठेवले. गहू कापणीच्या हंगामाच्या दिवसात रऊबेन शेतात गेला आणि त्यास पुत्रदात्रीची फळे 1सापडली. त्याने ती आपली आई लेआ हिच्याकडे आणून दिली. नंतर राहेल लेआस म्हणाली, “तुझा मुलगा रऊबेन याने आणलेल्या पुत्रदात्रीच्या फळातून मला काही दे.” लेआ तिला म्हणाली, “तू माझ्या नवऱ्याला माझ्यापासून घेतलेस हे काय कमी झाले? आता माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळेही तू घेतेस काय?” राहेल म्हणाली, “तुझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे मला देशील तर त्याच्या बदल्यात आज रात्री तो तुझ्याबरोबर झोपेल.” संध्याकाळी याकोब शेतावरून आला. तेव्हा लेआ त्यास भेटण्यास बाहेर गेली व ती म्हणाली, “आज रात्री तुम्ही माझ्याबरोबर झोपणार आहात, कारण माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे देऊन मी तुम्हास मोलाने घेतले आहे.” तेव्हा याकोब त्या रात्री लेआपाशी झोपला. तेव्हा देवाने लेआचे ऐकले व ती गर्भवती राहिली आणि तिने याकोबाच्या पाचव्या मुलाला जन्म दिला. लेआ म्हणाली, “देवाने माझे वेतन मला दिले आहे कारण मी माझी दासी माझ्या नवऱ्याला दिली.” तेव्हा तिने आपल्या मुलाचे नाव इस्साखार ठेवले. लेआ पुन्हा गरोदर राहिली व तिने याकोबाच्या सहाव्या मुलाला जन्म दिला. लेआ म्हणाली, “देवाने मला उत्तम देणगी दिली आहे. आता माझा पती माझा आदर करील कारण मी त्याच्या सहा मुलांना जन्म दिला आहे.” तिने त्याचे नाव जबुलून 2ठेवले. त्यानंतर तिला एक मुलगी झाली. तिने तिचे नाव दीना ठेवले. मग देवाने राहेलीचा विचार केला आणि तिचे ऐकले. त्याने तिची कूस वाहती केली. ती गर्भवती झाली व तिला मुलगा झाला. ती म्हणाली, “देवाने माझा अपमान दूर केला आहे.” तिने त्याचे नाव योसेफ ठेवले. ती म्हणाली, “परमेश्वर देवाने आणखी एक मुलगा मला दिला आहे.”

याकोबाने लाबानाशी केलेली देवघेव

मग राहेलीला योसेफ झाल्यानंतर याकोब लाबानाला म्हणाला, “मला माझ्या स्वतःच्या घरी आणि माझ्या देशात मला पाठवा. ज्यांच्यासाठी मी तुमची सेवा केली आहे त्या माझ्या स्त्रिया आणि माझी मुले द्या आणि मला जाऊ द्या, कारण मी तुमची सेवा कशी केली आहे हे तुम्हास माहीत आहे.” लाबान त्यास म्हणाला, “परमेश्वराने केवळ तुझ्यामुळे मला आशीर्वादित केले आहे हे मी जाणतो. जर तुझ्या दृष्टीने माझ्यावर तुझी कृपा असेल तर आता थांब.” नंतर तो म्हणाला, “तुला काय वेतन द्यावे हे सांग आणि ते मी देईन.” याकोब त्यास म्हणाला, “मी तुमची सेवा केली आहे आणि तुझी गुरेढोरे माझ्याजवळ कशी होती हे तुम्हास माहीत आहे. मी येण्यापूर्वी तुम्हापाशी फार थोडी होती. आणि आता भरपूर वाढली आहेत. मी जेथे जेथे काम केले तेथे तेथे परमेश्वराने तुम्हास आशीर्वादित केले आहे. आता मी माझ्या स्वतःच्या घराची तरतूद कधी करू?” म्हणून लाबान म्हणाला, “मी तुला काय देऊ?” याकोब म्हणाला, “तुम्ही मला काही देऊ नका. जर तुम्ही माझ्यासाठी ही गोष्ट कराल तर मी पूर्वीप्रमाणे आपले कळप चारीन व सांभाळीन. परंतु आज मला तुमच्या सगळ्या कळपात फिरून त्यातील मेंढरांपैकी ठिपकेदार व प्रत्येक काळे व तपकरी असलेली मेंढरे व शेळ्यांतून तपकरी आणि काळ्या रंगाची ही मी बाजूला करीन; हेच माझे वेतन असेल. त्यानंतर तुमच्यापुढे असलेल्या माझ्या वेतनाविषयी हिशोब घ्यायला याल तेव्हा माझा प्रामाणिकपणा माझ्याकरिता साक्ष देईल, जर त्यामध्ये तुम्हास माझ्याजवळच्या शेळ्यांतले जे प्रत्येक ठिपकेदार व तपकरी नाही व मेंढरांतले जे काळे नाही ते आढळले, तर ते मी चोरले आहे असे समजावे.” लाबान म्हणाला, “मी मान्य करतो. तुझ्या शब्दाप्रमाणे कर.” परंतु त्याच दिवशी लाबानाने ठिपकेदार व बांडे एडके तसेच ठिपकेदार व बांड्या शेळ्या आणि मेंढरापैकी काळी मेंढरे कळपातून काढून लपवली, गुपचूप ती आपल्या मुलांच्या हवाली केली व त्यावर लक्ष ठेवून त्यांना सांभाळण्यास सांगितले; तेव्हा लाबानाने आपल्यामध्ये व याकोबामध्ये तीन दिवसाचे अंतर ठेवले. याकोब लाबानाचे बाकीचे कळप चारीत राहिला. मग याकोबाने हिवर व बदाम व अर्मोन या झाडांच्या हिरव्या कोवळ्या फांद्या कापून घेतल्या, त्याने त्यांच्या साली, त्याचे आतील पांढरे पट्टे दिसेपर्यंत त्या सोलून काढल्या. त्याने त्या पांढऱ्या फांद्या किंवा पांढरे फोक कळपांच्या समोर पाणी पिण्याच्या टाक्यात ठेवले जेव्हा शेळ्यामेंढ्या पाणी पिण्यास तेथे येत तेव्हा त्यांच्यावर त्याचे नर उडत व त्या फळत. तेव्हा त्या काठ्यांपाशी शेळ्यामेंढ्यांचे कळप फळले आणि त्या कळपात बांडी व ठिपकेदार, तपकरी अशी पिल्ले झाली. याकोब कळपातील इतर जनावरांतून ठिपकेदार, पांढऱ्या ठिपक्यांची व काळी करडी कोकरे लाबानाच्या कळपापासून वेगळी करून ठेवत असे. जेव्हा जेव्हा कळपातील चांगली पोसलेली जनावरे फळत असत तेव्हा तेव्हा याकोब त्या पांढऱ्या फांद्या त्यांच्या नजरेसमोर ठेवी आणि मग ती जनावरे त्या फांद्यांसमोर फळत. परंतु जेव्हा दुर्बल जनावरे फळत तेव्हा याकोब त्यांच्या नजरेसमोर त्या झाडांच्या फांद्या ठेवत नसे. म्हणून मग अशक्त नर-माद्यापासून झालेली करडी, कोकरे लाबानाची होत. आणि सशक्त नर-माद्यांपासून झालेली करडी, कोकरे याकोबाची होत. अशा प्रकारे याकोब संपन्न झाला. त्याच्यापाशी शेरडेमेंढरे, उंट, गाढवे व दासदासी हे सर्व भरपूर होते.

Source notes (2)
  1. Footnote पुत्रप्राप्तीसाठी किंवा प्रेमवाढीसाठी वापरले जाणारे औषध
  2. Footnote अर्थ-बक्षिस

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.