Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

निर्ग 32

सोन्याचे वासरू

अनु. 9:6-29

मोशेला पर्वतावरून उतरण्यास बराच विलंब लागला आहे असे लोकांनी पाहिले तेव्हा सर्व लोक अहरोनाभोवती जमले व त्यास म्हणाले, “पाहा, मोशेने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले आहे. परंतु मोशेचे काय झाले ते आम्हांला कळत नाही, म्हणून आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर.” तेव्हा अहरोन लोकांस म्हणाला, “तुम्ही तुमच्या स्रिया, पुत्र व कन्या यांच्या कानातील सोन्याची कुंडले मजकडे आणा.” मग सर्व लोकांनी आपल्या कानातील सोन्याची कुंडले काढून अहरोनाकडे आणली. अहरोनाने लोकांकडून ते सोने घेतले; आणि ते ओतून व कोरणीने कोरून त्यापासून वासरू केले. मग लोक म्हणाले, “हे इस्राएला, ज्या देवाने तुला मिसर देशातून बाहेर आणले आहे तो हाच देव आहे.” अहरोनाने हे सर्व पाहिले तेव्हा त्याने त्या वासरापुढे एक वेदी बांधली आणि जाहीर करून तो म्हणाला, “तुमच्या परमेश्वराकरता उद्या उत्सव होणार आहे.” लोक दुसऱ्या दिवशी पहाटेस उठले; त्यांनी होमार्पणे अर्पिली व शांत्यर्पणे आणली. मग ते खाण्यापिण्यास बसले; नंतर उठून ते खेळायला लागले. त्या वेळी परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू पर्वत उतरुन लवकर खाली जा, कारण ज्या तुझ्या लोकांस तू मिसर देशातून बाहेर आणले ते बिघडले आहेत. ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते त्या मार्गापासून किती लवकर ते बहकून गेले आहेत. त्यांनी आपल्यासाठी सोने वितळवून वासराची मूर्ती केली आहे; ते त्याची पूजा करीत आहेत व त्यास बली अर्पणे वाहत आहेत; ते म्हणत आहेत, ‘हे इस्राएला, याच देवांनी तुला मिसर देशातून बाहेर आणले आहे.” परमेश्वर मोशेला म्हणाला, “या लोकांस मी पाहिले आहे; ते ताठ मानेचे लोक आहेत; तर आता मला आड येऊ नको, त्यांना माझ्या रागाच्या तडाख्याने भस्म करतो. नंतर मी तुझ्यापासूनच एक महान राष्ट्र निर्माण करतो.” परंतु काकुळतीने विनंती करून मोशे आपला देव परमेश्वर ह्याला म्हणाला, हे परमेश्वरा, तुझ्या महान सामर्थ्याने व भुजप्रतापाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा? आणि परमेश्वराने त्यांचे वाईट करण्यासाठी, डोंगरावर त्यांना ठार मारण्यासाठी व पृथ्वीवरून त्यांचा नायनाट करण्यासाठी त्यांना मिसर देशातून बाहेर आणले असे मिसरी लोकांनी का म्हणावे? आपल्या तीव्र कोपापासून फीर, आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याच्या हेतूपासून परावृत्त हो. तुझे सेवक अब्राहाम, इसहाक व इस्राएल, यांची आठवण कर; तू तुझ्या नावाने शपथ वाहिली होतीस; तू म्हणाला होतास, मी तुमची संतती आकाशातील ताऱ्यांइतकी जास्तीत जास्त करीन, मी ज्या देशाविषयी सांगितले तो सर्व देश मी तुझ्या संततीला देईन व तो सर्वकाळ त्यांचे वतन होईल. तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता, त्यापासून तो परावृत्त झाला. मग मोशे पर्वतावरून साक्षपटाच्या दोन पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला. त्या पाट्यावर पुढे व मागे अशा दोन्ही बाजूंना लिहिलेले होते. देवाने स्वत:च त्या पाट्या तयार केल्या होत्या व त्यांच्यावर कोरलेला लेख देवाने लिहिलेला होता. यहोशवाने लोकांचा गोंगाट ऐकला व तो मोशेला म्हणाला, “छावणीत लढाईसारखा आवाज ऐकू येत आहे.” मोशेने उत्तर दिले, “एखाद्या सैन्याच्या विजयाचा हा आवाज नाही किंवा एखाद्या सैन्याच्या पराभवाचा हा आक्रोश नाही; मला जो आवाज ऐकू येत आहे तो नाचगाण्यांचा आहे.” मोशे छावणीजवळ येऊन पोहोचल्यावर त्याने ते सोन्याचे वासरू व लोकांच्या नाचगाण्यांचा धिंगाणा पाहिला आणि तो भयंकर संतापला; त्याने आपल्या हातातल्या दगडी पाट्या खाली डोंगराच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या. नंतर लोकांनी बनविलेले ते सोन्याचे वासरू मोशेने तोडून फोडून ते अग्नीत जाळले. व कुटून त्याची पूड केली; मग ती पाण्यात टाकली. नंतर ते पाणी त्याने इस्राएल लोकांस प्यायला दिले. मोशे अहरोनास म्हणाला, “या लोकांनी तुझे असे काय केले होते की तू त्यांना असे भयंकर पाप करावयास लावलेस?” अहरोन मोशेला म्हणाला, “स्वामी, असे माझ्यावर रागावू नका; या लोकांची प्रवृत्ती पापाकडे आहे, हे आपल्याला माहीत आहे. लोक मला म्हणाले, ‘मोशेने आम्हांला मिसर देशातून काढून बाहेर आणले; परंतु आता त्याचे काय झाले हे आम्हांला माहीत नाही; तेव्हा आमच्यापुढे चालतील असे देव तू आमच्यासाठी करून दे.’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘जर तुमच्याकडे सोन्याची कुंडले असतील तर ती मला द्या.’ तेव्हा लोकांनी मला त्यांच्याकडील सोने दिले; मी सोने भट्टीत टाकले आणि तिच्यातून हे वासरू बाहेर आले.” मोशेने पाहिले की अहरोनाने लोकांवरचे नियंत्रण ढिले केले त्यामुळे ते बेभान होत गेले आणि त्यांच्या मूर्खपणाच्या आचरणाचा तमाशा त्यांच्या शत्रूंनी पाहिला. तेव्हा मोशे छावणीच्या दाराजवळ उभा राहिला आणि म्हणाला, “ज्या कोणाला परमेश्वराच्या मागे यावयाचे असेल, त्याने मजकडे यावे,” आणि लगेच लेवी वंशाचे सर्व लोक मोशेकडे जमा झाले. मग मोशे त्यांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर काय म्हणतो ते मी तुम्हास सांगतो, ‘प्रत्येकाने आपल्या कमरेस तलवार लटकावावी आणि छावणीच्या या प्रवेशव्दारापासून त्या प्रवेशव्दारापर्यंत अवश्य जावे आणि प्रत्येक मनुष्याने आपला भाऊ, मित्र व शेजारी यांना अवश्य जिवे मारावे.” लेवी वंशाच्या लोकांनी मोशेची आज्ञा पाळली आणि त्या दिवशी सुमारे तीन हजार इस्राएल लोक मरण पावले. मग मोशे म्हणाला, “आज आपणाला परमेश्वराकरता समर्पण करून प्रत्त्येक पुरुषाने आपल्या पुत्रावर व भावावर चालून जावे, म्हणजे आज तो तुम्हास आशीर्वाद देईल.” दुसऱ्या दिवशी सकाळी मोशेने लोकांस सांगितले, “तुम्ही भयंकर पाप केले आहे! परंतु आता मी परमेश्वराकडे पर्वतावर जातो; काहीतरी करून कदाचित मला तुमच्या पापांचे प्रायश्चित करता येईल.” तेव्हा मोशे माघारी परमेश्वराकडे जाऊन म्हणाला, “हाय, हाय या लोकांनी फार घोर पातक केले आहे. आपणासाठी सोन्याचे देव बनविले; तरी आता तू त्यांच्या या पापांची क्षमा कर! परंतु जर तू त्यांच्या पापांची क्षमा करणार नसशील तर मग तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक.” परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “जे माझ्याविरूद्ध पाप करतात केवळ त्या लोकांचीच नावे मी माझ्या पुस्तकातून काढून टाकतो. तेव्हा तू आता खाली जा आणि मी सांगतो तेथे लोकांस घेऊन जा; माझा दूत तुझ्यापुढे चालेल व तुला मार्ग दाखवील. जेव्हा पाप केलेल्या लोकांस शिक्षा करण्याची वेळ येईल तेव्हा त्यांना शिक्षा केली जाईल.” अहरोनाने बनवलेले वासरू लोकांनीच बनवले होते, म्हणून परमेश्वराने त्यांना ताडण केले.

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.