इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
निर्ग 23
न्याय आणि दयेविषयी नियम
खोटी अफवा पसरवू नकोस; दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नकोस. दुष्टाई करण्याकरता पुष्कळ जणांना तू अनुसरू नकोस, आणि तू पुष्कळ जणांच्या मागे लागून वादात न्याय विपरीत करण्यास बोलू नकोस. एखाद्या गरीब मनुष्याचा न्याय होताना, त्याची बाजू खरी असल्याशिवाय त्याचा पक्ष घेऊ नकोस. आपल्या शत्रूचा हरवलेला बैल किंवा एखादे गाढव मोकाट फिरताना दिसले तर त्यास वळवून ते त्याच्याकडे नेऊन सोड. तुझ्या शत्रूचे गाढव जास्त ओझ्याखाली दबून पडलेले दिसले तर तू त्यास सोडून जाऊ नकोस, तू अवश्य त्याच्याबरोबर राहून ते सोड. तू आपल्या गरीबाच्या वादात त्याचा योग्य न्याय विपरीत होऊ देऊ नकोस; कोणावरही खोटे दोषारोप करू नकोस; एखाद्या निष्पाप वा निरपराधी ह्यांचा वध करू नकोस. कारण दुष्टाला मी नीतिमान ठरवणार नाही. लाच देण्याचा प्रयत्न करील, तर ती तू मुळीच घेऊ नकोस; लाच घेऊ नको कारण लाच डोळसास आंधळे करते; आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपरीत न्याय करते. परक्याला कधीही छळू नकोस, कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हास चांगली माहिती आहे; कारण तुम्ही देखील एके काळी मिसर देशात परके होता.
शब्बाथ वर्ष आणि शब्बाथ दिवस याविषयी नियम
सहा वर्षे आपल्या जमिनीची पेरणी कर; आणि तिचे उत्पन्न साठीव. परंतु सातव्या वर्षी जमीन पडीक राहू दे. त्या वर्षी शेतात काहीही पेरू नये. जर शेतात काही उगवले तर ते गरीबांना घेऊ द्या; व राहिलेले वनपशूंना खाऊ द्या; तुमचे द्राक्षमळे व जैतूनाची वने यांच्या बाबतीतही असेच करावे. तुम्ही सहा दिवस काम करावे, व सातव्या दिवशी विसावा घ्यावा; त्यामुळे तुमच्या गुलामांना व इतर उपऱ्यांनाही विसावा मिळेल व त्यांना ताजेतवाने वाटेल; तुमच्या बैलांना व गाढवानांही विसावा मिळेल. मी जे काही सांगितले ते सर्व नियम कटाक्षाने पाळावेत; इतर देवांचे नांव देखील घेऊ नका; ते तुमच्या तोंडाने उच्चारू नका.
वार्षिक तीन सण
निर्ग. 34:18-26; अनु. 16:1-17
वर्षातून तीनदा तू माझ्यासाठी उत्सव करून सण पाळ. बेखमीर भाकरीचा सण पाळ; त्यामध्ये सात दिवस खमीर न घातलेली भाकर तुम्ही खावी; हा सण तुम्ही अबीब महिन्यात पाळावा, कारण याच महिन्यात तुम्ही मिसरमधून बाहेर निघून आला; कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये. शेतात पेरलेल्या पहिल्या पिकाच्या कापणीचा सण पाळावा. वर्षाच्या अखेरीस तू आपल्या श्रमाच्या फळांचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळावा. वर्षातून तीनदा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरासमोर यावे. तुम्ही यज्ञपशूचे रक्त मला अर्पण करावयाचे वेळी खमीर घातलेल्या भाकरीसोबत अर्पण करू नये; आणि मला अर्पण केलेल्या यज्ञपशूची चरबी दुसऱ्या दिवसापर्यंत राहू देऊ नये. आपल्या जमिनीच्या प्रथम उपजातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.
इस्त्राएल लोकांस मार्ग दाखवणारा देवाचा दूत
पाहा, वाटेने तुला सांभाळण्याकरता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोचविण्याकरता मी एक दूत तुझ्यापुढे पाठवत आहे. त्याच्यासमोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक, आज्ञा पाळ आणि त्याच्यामागे चाल; त्याच्याविरुध्द बंड करू नकोस. कारण तो तुम्हास क्षमा करणार नाही; कारण त्याच्या ठायी माझे नाव आहे1. जर तू त्याची वाणी खरोखर ऐकशील व मी सांगतो ते सर्व करशील तर मी तुम्हाबरोबर राहीन; मी तुमच्या सर्व शत्रूंचा शत्रू व विरोधकांचा विरोधक होईन. देव म्हणाला, माझा दूत तुमच्यापुढे चालून अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी या लोकांकडे तुला नेईल आणि मी त्यांचा नाश करीन. परंतु या सर्व लोकांच्या देवाला तू नमन करू नकोस; त्यांची सेवा करू नकोस, त्यांना जमीनदोस्त करावेस; आणि त्यांच्या स्तंभाचे तुकडे तुकडे करावेस. तू आपला देव परमेश्वर याचीच उपासना करावीस; म्हणजे तो तुझ्या अन्नपाण्यास बरकत देईल. मी तुमच्यामधून रोगराई दूर करीन. तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणीही वांझ असणार नाही; मी तुला दीर्घायुषी करीन. ज्या ज्या लोकांच्या विरूद्ध तू जाशील त्यांना मी आधीच दहशत घालून त्यांची फसगत करीन. आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुला पाठ दाखवयास लावीन. मी तुझ्यापुढे गांधीलमाशा पाठवीन; त्या हिव्वी, कनानी, व हित्ती ह्यांना तुझ्यापुढून पळावयास लावतील. मी त्यांना एका वर्षातच घालवून देणार नाही; कारण मी तसे केले तर देश एकदम ओस पडेल आणि मग वनपशूंची वाढ होऊन ते तुला त्रास देतील. तुमची संख्या वाढून तू देशाचा ताबा घेशील तोपर्यंत मी हळूहळू तुझ्यापुढून त्यांना घालवून देईन. “मी तांबड्या समुद्रापासून पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदीपर्यंत मी तुझ्या देशाची सीमा करीन. तेथे राहणाऱ्या लोकांस मी तुझ्या हाती देईन व तू त्या सर्वांना तेथून घालवून द्याल. तू त्याच्याशी किंवा त्यांच्या देवांशी कोणताही करार करू नकोस. तू त्यांना तुझ्या देशात राहू देऊ नकोस; तू जर त्यांना तुझ्यामध्ये राहू देशील तर ते पुढे तुला सापळ्यासारखे अडकविणारे होतील, ते तुला माझ्याविरूद्ध पाप करायला लावतील व तू त्यांच्या देवांची उपासना करण्यास सुरुवात करशील.”
Source notes (1)
- Footnote अर्थ-मी त्याला पूर्ण अधिकार देईन
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.