Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
प्रकटीकरण 8
सातवा शिक्का आणि सोन्याची धूपदाणी
त्यांनी जेव्हा सातवा शिक्का उघडला, तेव्हा स्वर्गामध्ये अंदाजे अर्धातास सर्वत्र संपूर्ण शांतता पसरली.
नंतर मी पाहिले जे सात देवदूत परमेश्वरासमोर उभे राहिले, त्यांना सात कर्णे देण्यात आले.
नंतर दुसरा एक देवदूत, सोन्याची एक धूपदाणी घेऊन आला व वेदीजवळ उभा राहिला. त्याला राजासनासमोरील सोन्याच्या वेदीवर अर्पण करण्यासाठी परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांच्या प्रार्थना मिश्रित बराच धूप देण्यात आला होता. त्या देवदूताच्या हातातून प्रार्थना मिश्रित धूपाचा सुगंध परमेश्वरासमोर वर चढला. तेव्हा त्या देवदूताने वेदीवरील अग्नी धूपदाणीत भरून घेतला आणि त्याने खाली पृथ्वीवर टाकला. त्याबरोबर मोठा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या आणि प्रचंड भूमिकंप झाला.
कर्णे
नंतर ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते, त्यांनी आपआपले कर्णे वाजविण्याची तयारी केली.
पहिल्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा पृथ्वीवर रक्तमिश्रित गारा व अग्नीचा वर्षाव झाला. पृथ्वीच्या एकतृतीयांश भागाला आग लागली आणि त्यामुळे एकतृतीयांश वृक्ष व सर्व हिरवे गवत जळून गेले.
नंतर दुसर्या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा एका मोठ्या जळत्या पर्वतासारखे काहीतरी समुद्रात टाकण्यात आले. त्यामुळे समुद्राचा तिसरा हिस्सा रक्तमय झाला. समुद्रातील एकतृतीयांश जिवंत प्राणी मरण पावले आणि एकतृतीयांश जहाजे नष्ट झाली.
मग तिसर्या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा आकाशातून एक मोठा जळता तारा पृथ्वीवरील एकतृतीयांश नद्या व झरे यावर पडला. त्या तार्याचे नाव कडूदवणा1 असे आहे. त्यामुळे पृथ्वीवरील एकतृतीयांश पाणी कडू विषारी बनले व अनेक लोक मरण पावले.
चौथ्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा सूर्याचा तिसरा हिस्सा, चंद्र व तारे यांचाही तिसरा हिस्सा काळा झाला. त्यामुळे दिवसाचा एकतृतीयांश भाग प्रकाशाविना आणि रात्रीचा एकतृतीयांश भाग अंधार झाला.
मी हे पाहत असतानाच, आकाशातून एक गरुड पक्षी उडतांना मला दिसला. तो मोठ्याने म्हणत होता, “धिक्कार! धिक्कार! पृथ्वीवरील लोकांना धिक्कार! कारण लवकरच उरलेले तीन देवदूत आपआपले कर्णे वाजवितील.”
Source notes (1)
- Footnote मूळ भाषेत अपसिन्थॉस एक कडू पदार्थ
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.