Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

मत्तय 5

डोंगरावरचे प्रवचन

लोकांची गर्दी पाहून, येशू टेकडीवर गेले आणि तिथे बसले. त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले. मग ते त्यांना शिकवू लागले.

आशीर्वादाची वचने

ते म्हणाले:

“धन्य आहेत ते, जे आत्म्याने नम्र आहेत,

कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.

धन्य आहेत ते, जे शोकग्रस्त आहेत,

कारण त्यांना सांत्वन मिळेल.

धन्य आहेत ते, जे सौम्य आहेत,

कारण ते पृथ्वीचे वतनाधिकारी होतील.

धन्य आहेत ते, ज्यांना नीतिमत्वाची तहान व भूक लागली आहे,

कारण ते तृप्त केले जातील.

धन्य ते, जे दयाळू आहेत,

कारण त्यांना दयाळूपणाने वागविले जाईल.

धन्य आहेत ते, जे शुद्ध अंतःकरणाचे आहेत,

कारण त्यांना परमेश्वराचे दर्शन घडेल.

धन्य आहेत ते, जे शांती प्रस्थापित करतात,

कारण ते परमेश्वराची मुले म्हटले जातील.

धन्य आहेत ते, ज्यांचा नीतिमत्वासाठी छळ करण्यात येतो,

कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.

“माझे अनुयायी असल्यामुळे लोक तुमची निंदा, तुमचा अपमान व छळ करतील व तुमच्याविरुद्ध सर्वप्रकारच्या गोष्टी लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात. तुम्ही आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे, त्यांनी प्राचीन काळाच्या संदेष्ट्यांनाही असेच छळले होते.

मीठ आणि दिवे

“तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याचा खारटपणा परत कशाने आणू शकता? ते बाहेर टाकून दिले पाहिजे व असे मीठ पायदळी तुडविण्याच्या लायकीचे आहे.

“तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले शहर लपू शकत नाही. त्याचप्रमाणे लोक दिवा लावून तो मापाखाली ठेवत नाही. त्याऐवजी, दिवठणीवर ठेवतात म्हणजे घरातील प्रत्येकाला प्रकाश मिळावा. याचप्रकारे लोकांनी तुमची चांगली कामे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे म्हणून तुमचा प्रकाश उजळू द्या.

नियमशास्त्राची परिपूर्ती

“मी मोशेचे नियमशास्त्र व संदेष्ट्यांची भाकिते रद्द करण्यासाठी नाही, तर ती पूर्ण करण्यासाठी आलो आहे. मी तुम्हाला सत्य सांगतो की आकाश व पृथ्वी नाहीतशी होतील तोपर्यंत, आणि सर्वगोष्टी पूर्ण होईपर्यंत नियमशास्त्रातील एकही शब्द अथवा कानामात्रा कशानेही नाहीसा होणार नाही. जो कोणी नियमशास्त्रातील लहान आज्ञा मोडेल आणि दुसर्‍यांनाही त्यानुसार शिकविल, तो स्वर्गाच्या राज्यात कनिष्ठ गणला जाईल. परंतु जे परमेश्वराचे नियम शिकवितात आणि पाळतात ते परमेश्वराच्या राज्यात श्रेष्ठ ठरतील. कारण मी तुम्हाला सांगतो की, परूशी आणि इतर नियमशास्त्र शिक्षक यांच्या नीतिमत्वापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक असल्याशिवाय, तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात कधीही प्रवेश मिळणार नाही.

खून

“ ‘तू खून करू नको,1 आणि जो कोणी खून करेल तो न्यायास पात्र ठरेल,’ असे प्राचीन काळाच्या लोकांना सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे. पण मी सांगतो की, तुम्ही बहीण किंवा भावावर रागवाल, तर तुम्ही न्यायदंडास पात्र व्हाल, जो कोणी त्यांना ‘मूर्ख’2 असे म्हणेल, तर त्याला न्यायालयासमोर उत्तर द्यावे लागेल. पण जो कोणी ‘तू मूर्ख’ असे म्हणेल तर त्याला नरकाच्या अग्नीत टाकले जाण्याची भीती आहे.

“यास्तव, जर तुम्ही वेदीवर भेट अर्पण करीत असाल आणि तिथे तुम्हाला आठवले की, तुझ्या बंधू किंवा भगिनीच्या मनात तुमच्याविरुद्ध काहीतरी आहे, तर तुमची भेट तिथेच वेदीपुढे ठेवा. आधी जाऊन त्यांच्याबरोबर समेट करा आणि मग येऊन आपली भेट अर्पण करा.

“तुमच्या शत्रूने तुम्हाला न्यायालयात नेण्यापूर्वीच, तुम्ही त्याच्याबरोबर वाटेत असतानाच लवकर त्याच्याशी संबंध नीट करा. नाही तर तुमचा शत्रू तुम्हाला न्यायाधीशाच्या स्वाधीन करेल आणि न्यायाधीश तुम्हाला शिपायांच्या स्वाधीन करेल आणि तुम्हाला तुरुंगात टाकेल. मी तुम्हाला निश्चित सांगतो की प्रत्येक दमडी चुकती केल्याशिवाय तुमची तुरुंगातून सुटका होणार नाही.

व्यभिचार

“ ‘तू व्यभिचार करू नको,’3 असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे. पण मी तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेच्या दृष्टीने पाहतो, त्याने तिच्याबरोबर आपल्या अंतःकरणात आधीच व्यभिचार केला आहे. जर तुमचा उजवा डोळा तुम्हाला अडखळण करीत असेल तर तो उपटून फेकून द्या. तुमचे संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एक भाग गमविणे अधिक उत्तम आहे; आणि जर तुमचा उजवा हात तुम्हाला अडखळण करीत असेल, तर तो कापून टाक. संपूर्ण शरीर नरकात जाण्याऐवजी तुम्ही तुमच्या शरीराच्या एका भागाला मुकणे अधिक हिताचे होईल.

घटस्फोटाविषयी

“नियमशास्त्र सांगते की, ‘जो कोणी आपल्या पत्नीपासून विभक्त होऊ इच्छितो, त्याने तिला सूटपत्र लिहून द्यावे.’4 मी तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय सूटपत्र देतो तो तिला व्यभिचाराचे भक्ष करतो आणि सोडलेल्या स्त्रीशी जो कोणी लग्न करतो तो व्यभिचार करतो.

शपथा

“प्राचीन काळाच्या लोकांना सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे, ‘शपथ मोडू नका, तर प्रभूला वाहिलेली प्रत्येक शपथ पूर्ण करा.’ परंतु मी तुम्हाला सांगतो, शपथ वाहू नका. स्वर्गाची नव्हे, कारण ते परमेश्वराचे सिंहासन आहे. किंवा पृथ्वीची, कारण ते त्यांचे पायासन आहे; किंवा यरुशलेमची, कारण ती थोर राजाची नगरी आहे, आणि स्वतःच्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण तुम्हाला एक केसही पांढरा किंवा काळा करता येत नाही. जे काही तुम्हाला म्हणावयाचे ते साधे ‘होय’ किंवा ‘नाही’ असावे; यापेक्षा अधिक त्या दुष्टापासून5 येते.

डोळ्याबद्दल डोळा

“ ‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात,’6 असे म्हटलेले तुम्ही ऐकले आहे, पण मी तुम्हाला सांगतो, दुष्ट मनुष्याला प्रतिकार करू नका. तुमच्या एका गालावर कोणी चापट मारली तर दुसराही गाल पुढे करा. जो कोणी तुमच्यावर फिर्याद किंवा वाद करून तुमची बंडी घेऊ पाहतो, त्याला तुमच्या अंगरखाही देऊन टाका. जर कोणी तुम्हाला एक मैल जाण्याची सक्ती करेल, तर त्याच्याबरोबर दोन मैल जा. तुम्हाजवळ कोणी काही मागत असल्यास त्यांना द्या आणि ज्यांना उसने हवे असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.

शत्रूंवर प्रीती करा

“ ‘तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा आणि शत्रूंचा द्वेष करा,’7 असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे. पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशा वागण्याने तुम्ही स्वर्गीय पित्याचे पुत्र व्हाल. कारण ते आपला सूर्यप्रकाश चांगले आणि वाईट करण्यार्‍या अशा दोघांनाही देतात आणि नीतिमान व अनीतिमान या दोघांवरही पाऊस पाडतात. जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावरच तुम्ही प्रीती केली, तर त्यात तुम्हाला असे कोणते मोठे श्रेय मिळणार आहे? जकातदारही तसेच करतात की नाही? आणि तुम्ही आपल्या बंधूनाच अभिवादन करीत असाल तर इतरांहून चांगले ते काय करता? गैरयहूदी तसेच करतात की नाही? म्हणून जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे, तसे तुम्हीही परिपूर्ण असावे.”

Source notes (7)
  1. Footnote निर्ग 20:13
  2. Footnote मूळ भाषेत राका अरामी भाषेत तिरस्काराची संज्ञा
  3. Footnote निर्ग 20:14
  4. Footnote अनु 24:1
  5. Footnote दुष्टापासून म्हणजे सैतानापासून
  6. Footnote निर्ग 21:24; लेवी 24:20; अनु 19:21
  7. Footnote लेवी 19:18

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.