Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

1 शमुवेल 17

दावीद आणि गल्याथ

पलिष्ट्यांनी युद्धासाठी आपले सैन्य गोळा केले आणि ते यहूदीयातील सोकोह येथे जमले. त्यांनी सोकोह आणि अजेकाह यांच्यामध्ये एफेस-दम्मिम येथे छावणी दिली. शौल आणि इस्राएली लोक जमले आणि त्यांनी एलाहच्या खोर्‍यात छावणी दिली आणि पलिष्ट्यांशी युद्ध करण्यासाठी सेनेचे नियोजन केले. पलिष्टी लोक एका टेकडीवर सज्ज झाले आणि दुसर्‍यावर इस्राएली लोक सज्ज झाले; व त्यांच्यामध्ये खोरे होते.

तेव्हा गथ येथील, गल्याथ नामक एक महाशूरवीर, पलिष्ट्यांच्या छावणीतून बाहेर आला, त्याची उंची सहा हात आणि एक वीत.1 त्याच्या डोक्यावर कास्याचा टोप होता, त्याने खवल्यासारखे कास्याचे चिलखत घातले होते; ज्याचे वजन पाच हजार शेकेल होते2; त्याच्या पायात त्याने कास्याचे संरक्षण कवच घातले होते व कंबरेला कास्याची बरची लटकलेली होती. विणकर्‍याच्या काठीसारखा त्याचा भाला होता आणि त्याच्या लोखंडी पात्याचे वजन सहाशे शेकेल होते.3 त्याचा ढाल वाहक त्याच्यापुढे चालत गेला.

गल्याथ उभा राहिला आणि इस्राएली सैन्याला ओरडून म्हणाला, “तुम्ही युद्ध रचण्यासाठी बाहेर येऊन का उभे आहात? मी पलिष्टी नाही काय आणि तुम्ही शौलाचे चाकर नाहीत काय? तुमच्यातील एक मनुष्य निवडा आणि त्याने माझ्याकडे यावे. जर तो माझ्याशी लढून मला मारू शकेल तर आम्ही तुमची प्रजा होऊ; परंतु जर मी त्याच्यावर मात केली आणि त्याला मारले, तर तुम्ही आमची प्रजा होऊन आमची सेवा कराल.” तो पलिष्टी म्हणाला, “आज मी इस्राएली सैन्याला चेतावणी देतो! माझ्याकडे एक मनुष्य पाठवा म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू.” पलिष्ट्याचे हे शब्द ऐकून शौल आणि सर्व इस्राएली लोक घाबरून गेले.

दावीद यहूदीयातील बेथलेहेम येथील एफ्राथी गोत्रातील इशायाचा पुत्र होता. इशायला आठ पुत्र होते आणि शौल राजाच्या कारकिर्दीत तो खूप वृद्ध झाला होता. इशायाचे तीन थोरले पुत्र; प्रथमपुत्र एलियाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शम्माह हे युद्धासाठी शौलाच्या सेवेत गेले होते. दावीद सर्वांहून धाकटा होता. थोरले तीन शौलाबरोबर गेले, परंतु दावीद बेथलेहेमात आपल्या वडिलांची मेंढरे चारण्यासाठी शौलाकडून जात येत असे.

तो पलिष्टी मनुष्य चाळीस दिवस दररोज सकाळी व संध्याकाळी समोर येऊन उभा राहत असे.

एके दिवशी इशाय त्याचा पुत्र दावीदाला म्हणाला, “एक एफाभर भाजलेले हे धान्य आणि या दहा भाकरी तुझ्या भावांसाठी लवकर छावणीत घेऊन जा. त्याचबरोबर खव्याचे हे दहा लाडू त्यांच्या तुकडीच्या सेनापतीसाठी घे, तुझे भाऊ कसे आहेत ते पाहा आणि परत येताना त्यांच्याकडून काही शांतीची बातमी घेऊन ये. ते शौल आणि सर्व इस्राएली लोकांबरोबर एलाहच्या खोर्‍यामध्ये पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध करीत आहेत.”

सकाळी लवकरच दावीदाने आपली मेंढरे एका राखणदार्‍याच्या हाती सोडली, इशायाने सांगितल्याप्रमाणे सर्वकाही घेऊन निघाला. तो छावणीजवळ पोहोचला, तेव्हा सैन्य युद्धाच्या घोषणा देत त्यांच्या लढाईचे स्थानग्रहण करत होते. इस्राएली आणि पलिष्टी सेना समोरासमोर उभ्या राहिल्या. दावीदाने आपल्या वस्तू सामान राखणार्‍याच्या स्वाधीन केल्या व युद्धभुमीकडे धावत जाऊन त्याच्या भावांना अभिवादन केले. तो त्यांच्याबरोबर बोलत असता, गथ येथील पलिष्टी महाशूरवीर गल्याथ त्याच्या जागेतून बाहेर येऊन नेहमीप्रमाणे ओरडून बोलला, आणि दावीदाने ते ऐकले. त्या मनुष्याला पाहताच इस्राएली लोक मोठ्या भयाने पळून जात असत.

इस्राएली लोक म्हणत होते, “तुम्ही हा मनुष्य बाहेर येताना पाहता ना? तो इस्राएली लोकांना चेतावणी देण्यासाठी बाहेर येतो. जो कोणी त्याला ठार मारेल त्याला राजा मोठी संपत्ती देईल, तो त्याला त्याची कन्या देईल व इस्राएलात त्याचे कुटुंब करमुक्त होईल.”

दावीदाने त्याच्या बाजूला उभे असलेल्या पुरुषांना विचारले, “जो या पलिष्टी मनुष्याला मारेल आणि इस्राएलची ही अप्रतिष्ठा काढून टाकेल, त्याला काय करण्यात येईल? हा बेसुंती पलिष्टी मनुष्य कोण आहे की त्याने जिवंत परमेश्वराच्या सैन्याला चेतावणी द्यावी?”

ते जे काही म्हणत आले होते ते त्यांनी त्याला पुन्हा सांगितले आणि म्हणाले, “जो मनुष्य त्याला ठार मारेल त्याचे असे करण्यात येईल.”

जेव्हा दावीदाचा थोरला भाऊ एलियाब याने दावीदाला या लोकांबरोबर बोलतांना पाहिले, तेव्हा तो त्याच्यावर रागाने भडकला आणि त्याला विचारले, “तू येथे का आलास? आणि ती थोडीशी मेंढरे रानात तू कोणाबरोबर सोडली आहेत? तू किती गर्विष्ठ आहेस आणि तुझे हृदय किती दुष्ट आहे हे मी जाणतो; तू येथे खाली केवळ युद्ध पाहायला आला आहेस.”

दावीद म्हणाला, “मी काय केले आहे? मी बोलूपण नये काय?” नंतर तो दुसर्‍या कोणाकडे वळला आणि तोच विषय पुढे नेला आणि त्यांनीही आधीप्रमाणेच उत्तर दिले. दावीद जे बोलला ते कोणी ऐकले व ते शौलाला कळविले, तेव्हा शौलाने त्याला बोलावून घेतले.

दावीद शौलाला म्हणाला, “या पलिष्ट्यामुळे कोणी मनुष्याने खचून जाऊ नये; तुमचा सेवक पुढे जाऊन त्याच्याशी लढेल.”

शौलाने दावीदाला उत्तर दिले, “या पलिष्ट्यांविरुद्ध लढण्यास तू सक्षम नाहीस; तू केवळ कोवळा तरुण आहेस आणि तो त्याच्या तारुण्यापासून योद्धा आहे.”

परंतु दावीद शौलाला म्हणाला, “तुमचा सेवक त्याच्या वडिलांची मेंढरे राखीत असताना, एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन त्याने कळपातील मेंढरू उचलून घेतले, मी त्याच्यामागे गेलो, त्याला मारले व त्याच्या जबड्यातून मेंढरू बाहेर काढले. जेव्हा त्याने माझ्यावर झडप घातली, मी त्याचे केस धरून त्याला ठार मारले. आपल्या दासाने सिंह व अस्वल हे दोन्ही मारले; हा बेसुंती पलिष्टीही त्यापैकी एकासारखा असेल, कारण त्याने जिवंत परमेश्वराच्या सेनेचा उपहास केला आहे. ज्या याहवेहने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजांतून सोडविले, तेच याहवेह मला या पलिष्ट्यांपासूनही सोडवेल.”

शौल दावीदाला म्हणाला, “जा, याहवेह तुझ्याबरोबर असो.”

शौलाने आपली वस्त्रे दावीदाच्या अंगावर चढविली, त्याच्यावर चिलखत चढविले आणि त्याच्या डोक्यावर कास्य टोप घातला. दावीदाने त्याच्या चिलखतावर तलवार बांधली, त्याला याचा आधी सराव नसल्यामुळे, त्याने चालण्याचा प्रयत्न केला.

तो शौलाला म्हणाला, “मी यामध्ये चालू शकत नाही, मला याचा सराव नाही.” म्हणून दावीदाने तो पोशाख उतरविला. नंतर त्याने आपली काठी हातात घेतली, ओहोळातून पाच गुळगुळीत गोटे घेतले व ते आपल्या धनगरी बटव्यात ठेवले व आपली गोफण हाती घेऊन त्या पलिष्ट्याकडे गेला.

त्या दरम्यान पलिष्टी गल्याथही दावीदाच्या जवळ येऊ लागला; त्याचा शस्त्रवाहक त्याच्यापुढे चालत होता. पलिष्ट्याने दावीदाकडे नजर टाकून पाहिले की तो केवळ एक तरुण, तांबूस रंगाचा, सुंदर डोळ्यांचा, दिसायला रूपवान होता, आणि त्याने दावीदाला तुच्छ मानले. तो दावीदाला म्हणाला, “माझ्यावर काठी घेऊन चालून येण्यास, मी कुत्रा आहे काय?” आणि त्या पलिष्ट्याने आपल्या दैवतांची नावे घेऊन दावीदाला शाप दिला. तो पलिष्टी दावीदाला म्हणाला, “इकडे ये, म्हणजे मी तुझे मांस पक्ष्यांना व जंगली जनावरांना देईल.”

दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला, “तू तलवार, भाला व बरची घेऊन माझ्याविरुद्ध आलास, परंतु ज्या इस्राएली सैन्याच्या परमेश्वराला तू तुच्छ लेखले; त्या याहवेह, सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याविरुद्ध येतो. आज याहवेह तुला माझ्या हाती देईल, मी तुला मारून टाकीन व तुझा शिरच्छेद करेन. या आजच्या दिवशी मी पलिष्टी सैन्याची शरीरे पक्ष्यांना व जंगली जनावरांना देईन आणि सर्व जगाला समजेल की परमेश्वर इस्राएलात आहेत. येथे जमलेल्या प्रत्येकाने जाणावे की तलवार किंवा भाल्याने याहवेह आम्हाला सोडवित नाही; कारण युद्ध याहवेहचे आहे आणि तुम्हा सर्वांना याहवेह आमच्या हाती देतील.”

पलिष्टी गल्याथ जसा दावीदावर हल्ला करण्यासाठी पुढे येऊ लागला, तसा दावीद त्याचा सामना करण्यास त्याच्या दिशेने धावत गेला. दावीदाने आपल्या बटव्यातील एक दगड घेऊन, तो गोफणीत घातला व तो त्या पलिष्ट्याच्या कपाळावर मारला. तो दगड त्याच्या कपाळात शिरला आणि गल्याथ जमिनीवर पालथा पडला.

अशाप्रकारे, दावीदाने त्या पलिष्ट्यावर गोफण व गोट्याद्वारे विजय मिळविला; त्याच्या हाती तलवार नसताना त्याने त्या पलिष्ट्याला मारून टाकले.

दावीद धावत जाऊन त्याच्यावर उभा राहिला, त्याने त्या पलिष्ट्याच्या म्यानातून तलवार काढून त्या तलवारीनेच त्याचे डोके कापले.

जेव्हा पलिष्ट्यांनी पाहिले की त्यांचा नायक मरण पावला त्यांनी तिथून पळ काढला. तेव्हा इस्राएली व यहूदीयाच्या सैनिकांनी उठून आरोळी केली, त्यांनी गथ व एक्रोनच्या वेशींपर्यंत पलिष्ट्यांचा पाठलाग केला. मरण पावलेले पलिष्टी शाराईमाच्या वाटेवर गथ4 व एक्रोन येथवर पडलेले होते. इस्राएली लोक पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून परत आले व त्यांची छावणी लुटली.

दावीदाने त्या पलिष्ट्याचे शिर घेऊन यरुशलेमास आणले; पण त्या पलिष्ट्याची शस्त्रे आपल्या तंबूत ठेवली.

शौलाने दावीदाला पलिष्ट्याशी युद्ध करण्यास जाताना पाहिले, तेव्हा त्याने सेनापती अबनेर याला विचारले, “हा तरुण कोणाचा पुत्र आहे?”

अबनेरने उत्तर दिले, “महाराज चिरायू होवो, मला माहीत नाही.”

राजा म्हणाला, “हा तरुण कोणाचा पुत्र आहे त्याचा तपास कर.”

दावीदाने त्या पलिष्ट्याला मारल्यावर परत येताच, अबनेरने त्याला शौलाकडे आणले, त्या पलिष्ट्याचे शिर अजूनही दावीदाच्या हातात होते.

शौलाने दावीदाला विचारले, “हे तरुणा, तू कोणाचा पुत्र आहेस?”

दावीद म्हणाला, “आपला सेवक इशाय बेथलेहेमकर याचा मी पुत्र आहे.”

Source notes (4)
  1. Footnote सुमारे तीन मीटर
  2. Footnote अंदाजे 58 कि.ग्रॅ.
  3. Footnote अंदाजे 7 कि.ग्रॅ.
  4. Footnote काही मूळ प्रतींनुसार एक खोरे

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.