Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

स्तोत्र 89

देवाचा दाविदाशी करार

एथानाचे स्तोत्र

मी परमेश्वराच्या विश्वासाच्या कराराच्या कृतीचे गीत सर्वकाळ गाईन.

मी तुझी सत्यता भावी पिढ्यांना जाहीर करीन.

कारण मी म्हणालो आहे की, विश्वासाचा करार सर्वकाळासाठी स्थापित होईल;

तुझी सत्यता स्वर्गात तूच स्थापन केली आहेस.

मी माझ्या निवडलेल्याशी करार केला आहे,

मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे.

मी तुझ्या वंशाजांची स्थापना सर्वकाळ करीन,

आणि तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थापिन.

हे परमेश्वरा, तुझ्या विस्मयकारक कृतीची स्तुती आकाश करील,

तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्रजनांच्या मंडळीत होईल.

कारण परमेश्वराशी तुलना होऊ शकेल असा आकाशात कोण आहे?

देवाच्या मुलांपैकी परमेश्वरासारखा कोण आहे?

पवित्र जनांच्या सभेत ज्याचा सन्मान होतो असा तो देव आहे;

आणि त्याच्या सभोवती असणाऱ्या सर्वांपेक्षा तो भितीदायक आहे.

हे सेनाधीश देवा, परमेश्वरा,

हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण समर्थ आहे?

तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे?

समुद्राच्या खवळण्यावर तू अधिकार चालवतोस;

जेव्हा त्याच्या लाटा उसळतात, तेव्हा तू त्यांना शांत करतोस.

तू राहाबाला 1ठेचून त्याचा चुराडा केलास.

तू तुझ्या बलवान बाहूंनी आपल्या शत्रूंना पांगवलेस.

आकाश तुझे आहे आणि पृथ्वीही तुझी आहे.

तू जग आणि त्यातले सर्वकाही निर्माण केलेस.

उत्तर आणि दक्षिण निर्माण केल्या.

ताबोर 2आणि हर्मोन 3तुझ्या नावाचा जयजयकार करतात.

तुला पराक्रमी भुज आहे आणि तुला बळकट हात आहे

व तुझा उजवा हात उंचावला आहे.

निती आणि न्याय तुझ्या राजासनाचा पाया आहेत.

कराराचा विश्वास आणि सत्य तुझ्यासमोर आहेत.

जे तुझी उपासना करतात ते आशीर्वादित आहेत.

हे परमेश्वरा ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात.

ते दिवसभर तुझ्या नावाची स्तुती करतात,

आणि तुझ्या न्यायीपणाने ते तुला उंचावतात.

त्यांच्या शक्तीचे वैभव तू आहेस,

आणि तुझ्या कृपेने आम्ही विजयी आहोत.

कारण आमची ढाल परमेश्वराची आहे;

इस्राएलाचा पवित्र देव आमचा राजा आहे.

पूर्वी तू आपल्या विश्वासणाऱ्यांशी दृष्टांतात बोललास;

तू म्हणालास, मी एका वीरावर मुकुट ठेवण्याचे ठरवले आहे;

लोकांतून निवडलेल्या एकास मी उंचावले आहे.

मी माझा सेवक दावीद याला निवडले आहे;

मी त्यास आपल्या पवित्र तेलाने अभिषेक केला आहे.

माझा हात त्यास आधार देईल;

माझा बाहू त्यास बलवान करील.

कोणी शत्रू त्यास फसवणार नाही.

दुष्टांची मुले त्यास छळणार नाहीत.

मी त्याच्या शत्रूंना त्याच्यापुढे चिरडून टाकीन;

जे त्याचा द्वेष करतात त्यांना मारून टाकीन.

माझे सत्य आणि विश्वासाचा करार त्यांच्याबरोबर राहील;

माझ्या नावाने ते विजयी होतील.

मी त्याचा हात समुद्रावर

आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन.

तो मला हाक मारून म्हणेल, तू माझा पिता,

माझा देव, माझ्या तारणाचा खडक आहेस.

आणि मी त्यास माझा प्रथम जन्मलेला पुत्र करीन,

पृथ्वीवरील राजांत त्यास परमश्रेष्ठ करीन.

मी आपला विश्वासाचा करार त्यांच्यासाठी सर्वकाळ विस्तारील,

आणि त्यांच्याबरोबरचा माझा करार सर्वकाळ टिकेल.

त्याचे वंश सर्वकाळ राहील,

आणि त्याचे राजासन आकाशाप्रमाणे टिकेल.

जर त्याच्या वंशजांनी माझे नियम सोडले

आणि माझ्या आदेशाचा आज्ञाभंग केला.

जर त्यांनी माझे नियम मोडले

आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.

मग मी त्यांच्या बंडखोरांना काठीने,

आणि त्यांच्या अपराधांना फटक्यांनी शिक्षा करीन.

परंतु मी माझा विश्वासाचा करार त्यांच्यापासून काढून घेणार नाही;

मी माझ्या वचनाशी निष्ठावान राहीन.

मी माझा करार मोडणार नाही,

किंवा माझ्या ओठांचे शब्द बदलणार नाही.

एकदा सर्वांसाठी मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे,

आणि मी दावीदाशी खोटे बोलणार नाही.

त्याची संतती सर्वकाळ राहील,

आणि त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील.

ते चंद्राप्रमाणे सर्वकाळ टिकेल.

आकाशात विश्वसनीय साक्षीदार आहेत.

पण तरी तू आपल्या अभिषिक्तावर रागावलास,

तू त्याचा त्याग केला, आणि नाकारलेस.

तू आपल्या सेवकाशी केलेला करार सोडून दिलास.

तू त्याचा मुकुट भूमीवर फेकून भ्रष्ट केलास.

तू त्याच्या सर्व भिंती पाडून टाकल्यास.

तू त्याचे सर्व किल्ले उध्वस्त केलेस.

सर्व येणारे जाणारे त्यास लुटतात.

तो आपल्या शेजाऱ्यांच्या तिरस्काराचा विषय झाला आहे.

तू त्याच्या शत्रूंचा उजवा हात उंच केला आहे.

तू त्याच्या सर्व शत्रूंना आनंदित केले आहेस.

तू त्यांच्या तलवारीची धार बोथट केली आहे.

आणि युद्धात त्यास तू टिकाव धरू दिला नाहीस.

तू त्याच्या तेजस्वितेचा शेवट केला;

तू त्याचे सिंहासन जमिनीवर खाली आणलेस.

तू त्याच्या तारुण्याचे दिवस कमी केले आहेत.

तू त्यास लज्जेने झाकले आहेस.

हे परमेश्वरा, किती वेळ? तू आपल्या स्वतःला सर्वकाळ लपविणार काय?

तुझा राग अग्नीसारखा किती वेळ जळेल?

माझे आयुष्य किती कमी आहे याविषयी विचार कर,

तू सर्व मानव पुत्र निर्माण केलेस ते व्यर्थच काय?

कोण जिवंत राहिल आणि मरणार नाही

किंवा कोण आपला जीव अधोलोकातून सोडवील?

हे प्रभू, ज्या सत्यतेत तू दावीदाशी शपथ वाहिली,

ती तुझी पूर्वीची विश्वासाच्या कराराची कृत्ये कोठे आहेत?

हे प्रभू, तुझ्या सेवकाविरूद्धची थट्टा होत आहे;

आणि अनेक राष्ट्राकडून झालेला अपमान मी आपल्या हृदयात सहन करत आहे हे तू लक्षात आण.

हे परमेश्वरा, तुझे शत्रू जोराने अपमान करतात;

ते तुझ्या अभिषिक्ताच्या पावलांची थट्टा करतात.

परमेश्वरास सदासर्वकाळ धन्यवाद असो.

आमेन आणि आमेन.

Source notes (3)
  1. Footnote समुद्र प्राणी
  2. Footnote गालील सरोवराच्या दक्षिण टोकावरील पश्चिमेकडील पर्वत
  3. Footnote गालील सरोवराच्या ईशान्येकडील पर्वत

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.