इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
स्तोत्र 147
यरूशलेमेवर केलेल्या कृपेबद्दल परमेश्वराची स्तुती
परमेश्वराची स्तुती करा,
कारण आमच्या देवाची स्तुती गाणे चांगले आहे;
ते आनंददायक आहे व स्तुती करणे उचित आहे.
परमेश्वर यरूशलेम पुन्हा बांधतो;
तो इस्राएलाच्या विखुरलेल्या लोकांस एकत्र करतो.
तो भग्नहृदयी जनांना बरे करतो,
आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो.
तो ताऱ्यांची मोजणी करतो;
तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो.
आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे;
त्याची बुद्धी मोजू शकत नाही.
परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो;
तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो.
गाणे गाऊन परमेश्वराची उपकारस्तुती करा.
वीणेवर आमच्या देवाचे स्तुतीगान करा.
तो ढगांनी आकाश झाकून टाकतो,
आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो,
तो डोंगरावर गवत उगवतो.
तो प्राण्यांना
आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो.
घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही;
मनुष्याच्या शक्तीमान पायांत तो आनंद मानत नाही.
जे परमेश्वराचा आदर करतात,
जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो.
हे यरूशलेमे, परमेश्वराची स्तुती कर;
हे सियोने तू आपल्या देवाची स्तुती कर.
कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत;
त्याने तुझ्यामध्ये तुझी लेकरे आशीर्वादित केली आहेत.
तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो;
तो तुला उत्कृष्ट गव्हाने तृप्त करतो.
तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो;
त्याचा शब्द फार वेगाने धावतो.
तो लोकरीसारखे बर्फ पसरतो;
तो राखेसारखे दवाचे कण विखरतो.
तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो;
त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल?
तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो;
तो आपला वारा वाहवितो व पाणी वाहू लागते.
त्याने याकोबाला आपले वचन,
इस्राएलाला आपले नियम व निर्णय सांगितले.
त्याने हे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी केले नाही;
आणि त्यांनी त्याचे निर्णय जाणले नाहीत.
परमेश्वराची स्तुती करा.
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.