इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मत्त. 9
पक्षघाती मनुष्य
मार्क 2:1-12; लूक 5:17-26
तेव्हा येशू तारवात बसून पलीकडे गेला व परत आपल्या स्वतःच्या नगरात आला. तेव्हा काही लोकांनी पक्षघात झालेल्या कोणाएका मनुष्यास येशूकडे आणले. तो मनुष्य बाजेवर पडून होता. येशूने त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्यास म्हटले, “मुला, धीर धर. तुझी पापे क्षमा करण्यात आली आहेत.” काही नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले, “हा मनुष्य तर देवाविरुद्ध दुर्भाषण करीत आहे.” येशूला त्यांचे विचार कळाले व तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणात तुम्ही वाईट विचार का करता? कारण, तुझी पापे क्षमा करण्यात आली आहे, असे म्हणणे किंवा उठ व चालू लाग, असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे? परंतु, मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, हे तुम्ही जाणावे म्हणून,” मग येशू त्या पक्षघाती मनुष्यास म्हणाला, “ऊठ! आपली बाज उचलून घेऊन घरी जा.” मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोकसमुदाय थक्क झाला आणि ज्या देवाने मनुष्यास एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले.
मत्तयाला पाचारण
मार्क 2:13-17; लूक 5:27-32
मग येशू तेथून पुढे निघाला असता, तेव्हा त्याने मत्तय नावाच्या मनुष्यास, जकात गोळा करतात त्या नाक्यावर बसलेले पाहिले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठला आणि त्याच्यामागे गेला.
येशू मत्तयाच्या घरी जेवत असता, पुष्कळ जकातदार व पापी तेथे आले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले. जेव्हा परूशांनी ते पाहिले तेव्हा त्यांनी येशूच्या शिष्यांना विचारले, “तुमचा गुरू जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो?” येशूने त्यांना हे बोलताना ऐकले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “वैद्याची गरज जे निरोगी आहेत त्यांना नाही, तर जे आजारी आहेत त्यांना आहे. मी तुम्हास सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका; मला दया हवी आहे आणि यज्ञ नको, कारण मी नीतिमानांना नव्हे, तर पाप्यांना पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.”
मग योहानाचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्यास विचारले, “आम्ही व परूशी पुष्कळ उपवास करतो. पण तुझे शिष्य उपवास करीत नाहीत. ते का?” येशूने त्यांना उत्तर दिले, “जेव्हा वर सोबत असतो तेव्हा त्याच्या वऱ्हाड्यांना दुःखी कसे राहता येईल? परंतु अशी वेळ येईल जेव्हा वराला त्यांच्यापासून दूर केले जाईल तेव्हा ते उपवास करतील. कोणी नव्या कापडाचे ठिगळ जुन्या कापडाला लावीत नाही, कारण ते ठिगळ त्या कापडाला फाडते व छिद्र अधिक मोठे होते. तसेच कोणीही नवा द्राक्षरस जुन्या कातडी पिशवीत 1 घालीत नाहीत, घातला तर त्या पिशव्या फुटतात व द्राक्षरस सांडतो; तर नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशव्यांत घालतात. म्हणजे दोन्हीही टिकून राहतात.”
याईराची कन्या व रक्तस्रावी स्त्री
मार्क 5:21-43; लूक 8:40-56
येशू या गोष्टी त्यांना सांगत असता यहूद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी त्याच्याकडे आला व येशूच्या पाया पडून म्हणाला, “माझी मुलगी आताच मरण पावली आहे. परंतु आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेव म्हणजे ती पुन्हा जिवंत होईल.” तेव्हा येशू उठून आपल्या शिष्यांबरोबर त्याच्यामागे जाऊ लागला.
मग पाहा, वाटेत बारा वर्षापासून रक्तस्राव होत असलेली एक स्त्री येशूच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला शिवली. कारण ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन.” तेव्हा येशूने मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच क्षणी बरी झाली.
मग येशू त्या यहूदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला. तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व रडून गोंधळ करणाऱ्या जमावाला पाहीले, तो म्हणाला, “वाट सोडा, कारण मुलगी मरण पावलेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्यास हसू लागले. मग त्या जमावाला बाहेर पाठवल्यावर त्याने आत जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती मुलगी उठली. आणि ही बातमी त्या सर्व प्रांतात पसरली.
दोन आंधळे
तेव्हा येशू तेथून जात असता दोन आंधळे त्याच्यामागे ओरडत चालले. म्हणू लागले, “हे दाविदाच्या पुत्रा, आम्हावर दया कर.” येशू त्या घरात गेला तेव्हा ते आंधळेही त्याच्याकडे त्याच्यामागे आत आले. त्याने त्यांना विचारले, “मी तुम्हास दृष्टी देऊ शकेन असा तुमचा विश्वास आहे का?” “होय, प्रभू,” त्यांनी उत्तर दिले. मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्यासोबत घडो.” आणि त्यांना पुन्हा दृष्टी आली. येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.” परंतु ते बाहेर गेले आणि त्यांनी त्या सर्व प्रदेशात त्याची किर्ती गाजवली.
मुका भूतग्रस्त
मग ते दोघे तेथून निघून जात असताना लोकांनी एका मुक्या, भूतबाधा झालेल्या मनुष्यास येशूकडे आणले. जेव्हा येशूने भूत काढून टाकले तेव्हा पूर्वी मुका असलेला तो मनुष्य बोलू लागला. लोकांस याचे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “इस्राएलामध्ये यापूर्वी असे घडलेले कधीही पाहण्यात आले नव्हते.” परंतु परूशी म्हणाले, “हा भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भूते काढतो.”
येशू त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देत व राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्वप्रकारचे रोग व सर्वप्रकारचे आजार बरे करत, प्रत्येक नगरातून व प्रत्येक गावातून फिरला.
ख्रिस्ताला आलेला लोकांचा कळवळा
लूक 10:2, 3
आणि जेव्हा त्याने लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्यास त्यांचा कळवळा आला कारण ते चिंताक्रांत व गोंधळलेले होते व मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते. तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “पीक खरोखर फार आहे, पण कामकरी थोडे आहेत. म्हणून पिकाच्या धन्याकडे प्रार्थना करा की, त्याने आपल्या पिकाची कापणी करायला कामकरी पाठवावेत.”
Source notes (1)
- Footnote मुळांतः बुधली म्हणजे कातड्याने बनवलेली द्रक्षरस साठवण्याची पिशवी
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.