Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

मत्त. 14

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा मृत्यू

मार्क 6:14-29; लूक 9:7-9

त्यावेळी चौथाई देशांचा राजा हेरोदाने येशूची किर्ती ऐकली. तेव्हा त्याने आपल्या चाकरांना म्हटले, “येशू हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे. त्यास मरण पावलेल्यातून उठविण्यात आले आहे म्हणून याच्याठायी सामर्थ्य कार्य करीत आहे.” हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानाला अटक करून तुरूंगात टाकले होते. कारण योहान त्यास सांगत होता, “तू तिला पत्नी बनवावे हे देवाच्या नियमशास्त्राच्या योग्य नाही.” हेरोद त्यास मारावयास पाहत होता, पण तो लोकांस भीत होता कारण लोकांचा असा विश्वास होता की, योहान संदेष्टा आहे. हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारात नाच करून हेरोदाला खूश केले. त्यामुळे त्याने शपथ वाहून ती जे काही मागेल ते देण्याचे अभिवचन तिला दिले. तिच्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणारा योहानाचे शीर तबकात घालून मला इथे आणून द्या.” हेरोद राजाला फार वाईट वाटले. तरी त्याने आपल्या शपथपूर्वक दिलेल्या वचनामुळे व आमंत्रित लोकांमुळे ते द्यावयाची आज्ञा केली. आणि त्याने तुरुंगात माणसे पाठवून योहानाचे शीर उडवले. मग त्यांनी त्याचे शीर तबकात घालून त्या मुलीला आणून दिले. तिने ते आपल्या आईकडे आणले. मग त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्यास पुरले आणि त्यांनी जाऊन जे घडले ते येशूला सांगितले.

पाच हजारांना भोजन

मार्क 6:30-44; लूक 9:10-17; योहा. 6:1-14

मग ते ऐकून येशू तेथून होडीत बसून निवांत जागी निघून गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरांतून त्याच्यामागे पायीपायी गेले. मग जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्यास त्यांच्याविषयी कळवळा आला व जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले. मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “ही अरण्यातील जागा आहे आणि भोजनाची वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावामध्ये जाऊन स्वतःकरता अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.” परंतु येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना काही खायला द्या.” ते त्यास म्हणाले, आमच्याजवळ केवळ “पाच भाकरी व दोन मासे आहेत.” तो म्हणाला, “ते माझ्याकडे आणा.” मग लोकांस गवतावर बसण्याची आज्ञा केली. त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर आकाशाकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या. ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरून घेतल्या. जेवणारे सुमारे पाच हजार पुरूष होते. शिवाय स्त्रिया व मुले होतीच.

येशू समुद्रावरून चालतो

मार्क 6:45-52; योहा. 6:15-21

मी लोकसमुदायास निरोप देत आहे तो तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लगेच शिष्यांना पाठवून दिले. लोकांस पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकांत ठिकाणी डोंगरावर गेला, रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता. पण तारू सरोवरामध्ये होते. इकडे वारा विरूद्ध दिशेने वाहत असल्यामुळे तारू लाटांनी हेलकावत होते व त्यामुळे ते त्याच्यावर ताबा ठेवू शकत नव्हते. तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी1 येशू त्याच्याकडे आला. तो पाण्यावरून चालत होता. शिष्य त्यास पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, हे “भूत आहे.” आणि ते भिऊन ओरडले पण येशू लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, मी आहे; भिऊ नका.”

पेत्र म्हणाला, प्रभूजी जर आपण असाल तर मला पाण्यावरून आपणाकडे येण्यास सांगा. येशू म्हणाला, “ये.” मग पेत्र तारवातून उतरून व पाण्यावर चालत येशूकडे जाऊ लागला. पण तो पाण्यावर चालत असताना जोराचा वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला “प्रभूजी, मला वाचवा.” आणि लगेच येशूने आपला हात पुढे करून त्यास धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?” मग येशू व पेत्र होडीत गेल्यावर वारा थांबला. तेव्हा जे शिष्य होडीत होते ते त्यास नमन करून म्हणाले, “तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात.”

नंतर ते पलीकडे गनेसरेताच्या भागात गेले. तेथील लोकांनी येशूला ओळखून व सभोवतालच्या सर्व प्रदेशात निरोप पाठवला व त्यांनी सर्व प्रकारच्या आजाऱ्यांस त्याच्याकडे आणले. आणि आम्हास आपल्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करू द्यावा, अशी विनंती केली, तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.

Source notes (1)
  1. Footnote म्हणजे पहाटे तीन वाजता

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.