Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

मार्क 9

येशूचे रूपांतर

मत्त. 16:28-17:13; लूक 9:27-39; 2 पेत्र. 1:16-18

येशू त्या लोकांस म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे असलेले काही असे आहेत की, ज्यांना देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत मरणाचा अनुभव येणार नाही.” सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर नेले आणि तेथे त्यांच्यासमोर त्याचे रूपांतर झाले. त्याची वस्त्रे चमकदार, अत्यंत पांढरी शुभ्र, इतकी की तशी पृथ्वीवरील कोणत्याही परिटाला शुभ्र करता येणार नाहीत, अशी झाली होती. तेव्हा एलीया व मोशे त्याच्याबरोबर प्रकट झाले, ते येशूबरोबर संभाषण करीत होते. पेत्र येशूला म्हणाला, “रब्बी, आपण येथे आहोत हे चांगले आहे. आपण तीन मंडप बनवू. एक आपणासाठी, एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.” पेत्र असे बोलला कारण काय बोलावे ते त्यास समजेना कारण ते भयभीत झाले होते. तेव्हा एक ढग आला आणि त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून एक वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे याचे तुम्ही ऐका.” अचानक, त्यांनी एकदम सभोवती पाहीले तेव्हा त्यांना येशूशिवाय कोणीही दिसले नाही.

ते डोंगरावरून खाली येत असता, येशूने त्यांना आज्ञा केली की, “तुम्ही जे पाहीले आहे ते मनुष्याचा पुत्र मरण पावलेल्यातून उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.” म्हणून त्यांनीही गोष्ट त्यांच्यातच ठेवली, परंतु ते मरण पावलेल्यातून उठणे याचा अर्थ काय याविषयी आपसात चर्चा करीत होते. त्यांनी येशूला विचारले, “प्रथम एलीया आला पाहिजे असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणातात?” तो त्यांना म्हणाला, “होय, एलीया पहिल्याने येऊन सर्वकाही व्यवस्थितपणे करतो हे खरे आहे. परंतु मनुष्याच्या पुत्राविषयी त्याने पुष्कळ दुःखे सोसावीत व नाकारले जावे असे पवित्र शास्त्रात का लिहिले आहे? मी तुम्हास सांगतो, एलीया आलाच आहे आणि त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणे, त्यांना पाहिजे तसे त्यांनी त्याचे केले.”

शिष्य भूतग्रस्त मुलाला बरे करण्यास असमर्थ

मत्त. 17:14-21; लूक 9:37-42

नंतर ते शिष्यांजवळ आले, तेव्हा त्यांना त्यांच्याभोवती मोठा लोकसमुदाय आहे आणि नियमशास्त्राचे शिक्षक त्याच्याशी वाद करत आहेत असे त्यांना दिसले. सर्व लोक येशूला पाहताच आश्चर्यचकित झाले आणि ते त्याचे स्वागत करण्यासाठी धावले. येशूने शिष्यांना विचारले, “तुम्ही त्यांच्याशी कसला वाद घालीत आहात?” तेव्हा समुदायातील एकाने त्यास उत्तर दिले, “गुरुजी, मी माझ्या मुलाला आपणाकडे आणले. त्यास दुष्ट आत्मा लागला असून तो बोलू शकत नाही. आणि जेव्हा तो त्यास धरतो तेव्हा त्यास खाली आपटतो व तोंडाला फेस आणतो, दात चावतो व नंतर ताठ होतो. मी आपल्या शिष्यांना त्यास काढावायास सांगितले परंतु ते काढू शकले नाहीत.”

येशू भूतग्रस्त मुलाला बरे करतो

येशू त्यांना म्हणाला, “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार? मी तुमच्याबरोबर कोठवर सहन करू? मुलाला इकडे आणा.” नंतर त्यांनी मुलाला येशूकडे आणले आणि जेव्हा त्या दुष्ट आत्म्याने येशूकडे पाहिले तेव्हा लगेच त्या मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. नंतर येशूने त्याच्या वडिलांना विचारले, “किती काळ हा असा आहे?” वडीलांनी उत्तर दिले, “बाळपणापासून हा असा आहे. पुष्कळदा ठार करण्यासाठी त्याने त्यास अग्नीत किंवा पाण्यात टाकले. जर आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हास मदत करा.” येशू त्यास म्हणाला, “शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्याला सर्वकाही शक्य आहे.” तेव्हा लागलेच मुलाचे वडील मोठ्याने ओरडून म्हणाले, “मी विश्वास करतो, माझा अविश्वास घालवून टाका.” येशूने लोकसमुदाय त्याच्याकडे धावत येत आहे असे पाहिले तेव्हा येशू त्या दुष्ट आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो की, याच्यातून बाहेर नीघ आणि पुन्हा कधीही याच्यात शिरू नको.” नंतर तो ओरडून व त्यास अगदी पिळून बाहेर निघाला व मुलगा मृतासारखा झाला आणि लोकांस वाटले, तो मरण पावला. परंतु येशूने त्यास हातास धरून त्यास उठवले आणि तो उभा राहिला.

नंतर येशू घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्यास एकांतात विचारले, “आम्ही तो अशुद्ध आत्मा का काढू शकलो नाही?” येशू त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचून 1दुसऱ्या कशानेही निघणे शक्य नाही.”

आपल्या मृत्युबद्दल येशूने दुसऱ्यांदा केलेले भविष्य

मत्त. 17:22-23; लूक 9:43-45

ते तेथून निघाले आणि गालील प्रांतातून प्रवास करीत चालले होते. हे कोणालाही कळू नये अशी येशूची इच्छा होती. कारण तो आपल्या शिष्यांना शिकवीत होता. तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून मनुष्यांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्यास ठार मारतील. परंतु मारला गेल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी उठेल.” पण या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही आणि त्याविषयी त्यास विचारण्यास ते भीत होते.

नम्रतेविषयी धडा

मत्त. 18:1-5; लूक 9:46-48

पुढे ते कफर्णहूमास आले. येशू घरात असता त्याने त्यांना विचारले, “वाटेत तुम्ही कशाविषयी चर्चा करीत होता?” परंतु ते गप्प राहिले कारण वाटेत त्यांनी सर्वांत मोठा कोण याविषयी चर्चा चालली होती. मग येशू खाली बसला, त्याने बाराजणांना बोलावून त्यांना म्हटले, “जर कोणाला पहिले व्हावयाचे असेल तर त्याने सर्वात शेवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे.” मग येशूने एक बालकास घेऊन त्यांच्यामध्ये उभे केले व त्यांना म्हणाला? “जो कोणी या लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी मला स्वीकारतो तो केवळ माझाच स्वीकार करतो असे नाही तर ज्याने मला पाठवले त्याचाही स्वीकार करतो.”

सहिष्णुतेची शिकवण

मत्त. 10:40-42; लूक 9:49-50

योहान येशूला म्हणाला, “गुरुजी, आम्ही एकाला आपल्या नावाने भूते काढताना पाहिले आणि आम्ही त्यास मना केले, कारण तो आपल्यापैकी नव्हता.” परंतु येशू म्हणाला, “त्याला मना करू नका, कारण जो कोणी माझ्या नावाने चमत्कार करतो तो नंतर माझ्याविषयी वाईट बोलू शकणार नाही. जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. मी तुम्हास खरे सांगतो, ख्रिस्ताचे म्हणून तुम्हास जो कोणी एक प्याला पाणी देईल तो नक्कीच आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही.”

इतरांना अडखळवण्याविरूद्ध इशारा

माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी देवापासून परावृत्त करील, त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्यास समुद्रात फेकून देणे हे त्याच्यासाठी बरे आहे. जर तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा एक हात नसून जीवनात जाणे बरे. आणि जर तुझा पाय तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो काढून टाक. दोन पाय असून नरकात फेकले जावे यापेक्षा लंगडे होऊन जीवनात गेलेले बरे. जर तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो काढून टाक. दोन डोळे असून जेथे त्यांना खाणारे किडे मरत नाहीत आणि अग्नी विझत नाही अशा नरकात फेकले जावे यापेक्षा एक डोळा असून देवाच्या राज्यात जाणे हे बरे कारण प्रत्येकाची अग्नीने परीक्षा घेतली जाईल. “मीठ चांगले आहे. जर मीठाने त्याचा खारटपणा घालविला तर ते पुन्हा कसे खारट कराल. तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या आणि एकमेकांबरोबर शांतीने रहा.”

Source notes (1)
  1. Footnote उपवास प्रार्थनेवाचून

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.