Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

इब्री 7

मलकीसदेक

उत्प. 14:17-20

हा मलकीसदेक शालेमाचा राजा व तो सर्वोच्च देवाचा याजक होता. अब्राहाम राजांचा पराभव करून परत येत असताना मलकीसदेक त्यास भेटला. मलकीसदेकाने त्यास आशीर्वाद दिला. व अब्राहामाने आपल्या सर्वस्वाचा दहावा भाग मलकीसदेकाला दिला. मलकीसदेकाच्या नावाचा अर्थ “नीतिमत्त्वाचा राजा” त्याचप्रमाणे तो शालेमाचा राजा असल्याने त्याचा अर्थ “शांतीचा राजा” असा होतो. मलकीसदेकाचे आईवडील किंवा त्याचे पूर्वज, त्याचा जन्म किंवा मृत्युची नोंद आढळत नाही. देवपुत्रा प्रमाणे तो मिळताजुळता असल्यामुळे तो देखील अनंतकाळासाठी याजकच राहणार आहे.

यावरुन तुम्ही ध्यानात घ्या, मलकीसदेक किती महान पुरूष होता! मूळ पुरूष अब्राहाम यानेसुद्धा आपल्या लुटीतील दहावा भाग त्यास दिला. आणि लेवीचे वंशज जे याजक झाले त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रातील आज्ञेप्रमाणे इस्त्राइल लोकांपासून म्हणजे अब्राहामाच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवापासून, नियमशास्त्राप्रमाणे दशांश गोळा करावा. मलकीसदेक लेव्यांच्या वंशजांपैकी नव्हता, पण तरीही त्याने अब्राहामाकडून दशमांश घेतला आणि ज्याला देवाकडून अभिवचन मिळाले होते, त्यास त्याने आशीर्वाद दिला. यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही की, श्रेष्ठ व्यक्ती कनिष्ठाला आशीर्वाद देते. एका बाबतीत म्हणजे जो मनुष्य मरतो तो दशमांश गोळा करतो, पण दुसऱ्या बाबतीत म्हणजे मलकीसदेकाच्या बाबतीत, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे दशमांश अशा व्यक्तीने घेतला की जी अजूनही जिवंत आहे. एखादा असेही म्हणू शकतो की, लेवी जे दशमांश गोळा करतात, प्रत्यक्षात तेही अब्राहामाद्वारे मलकीसदेकाला दशमांश देतात. कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला त्यावेळी लेवी जणू त्याचा पूर्वज अब्राहाम याच्या शरीरात बीजरुपाने होता.

नवीन याजकाची गरज

स्तोत्र. 110:4

लेवीय वंशजांच्या याजकीय पद्धतीने लोकांस नियमशास्त्र दिले गेले, पण तशा प्रकारच्या याजकीय पद्धतीने लोक धार्मिकदृष्ट्या परिपूर्ण बनू शकले नसते. म्हणून आणखी एका याजकाच्या येण्याची आवश्यकता होती. तो अहरोनासारखा नसून मलकीसदेकासारखा हवा होता. कारण जेव्हा याजकपण बदलते तेव्हा नियमशास्त्रसुद्धा अवश्य बदलते. कारण या सर्व गोष्टी ज्याच्याबद्दल सांगितल्या आहेत, तो लेवी वंशापेक्षा वेगळ्या वंशाचा आहे व त्याच्या वंशातील कोणीही वेदीजवळ अशा प्रकारची याजकीय सेवा केलेली नाही. हे स्पष्ट आहे की, आमचा प्रभू यहूदा वंशातील होता आणि या वंशासंबंधी याजकपणाबद्दल मोशेने काहीही सांगितले नाही. आणि जेव्हा या दुसऱ्या प्रकारचा नवीन याजक मलकीसदेकासारखा येतो तेव्हाही गोष्ट आणखी स्पष्ट होते. मानवी नियमशास्त्राच्या हुकूमाने त्यास याजक करण्यात आले नव्हते तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याच्या आधारे त्यास याजक करण्यात आले. कारण अशाप्रकारे त्याच्याविषयी शास्त्रवचन साक्ष देते

“तू मलकीसदेकासारखा

युगानुयुगासाठी याजक आहेस.”

जुना नियम बाजूला ठेवण्यात आला आहे, कारण तो दुबळा व निरुपयोगी होता. कारण नियमशास्त्रामुळे कोणतीच गोष्ट पूर्ण झाली नाही आणि आता अधिक चांगली आशा आम्हास देण्यात आली आहे, जिच्यामुळे आम्ही देवाजवळ येतो. हे सुद्धा महत्त्वाचे आहे की देवाने येशूला मुख्य याजक करताना शपथेशिवाय केले नाही. जेव्हा इतरांना याजक करण्यात आले तेव्हा ते शपथेवाचून याजक झाले आहेत पण येशू जेव्हा याजक बनला, तेव्हा तो शपथेने बनला. ज्याने त्यास सांगितले की,

‘प्रभूने शपथ वाहिली आहे आणि तो आपले मन बदलणार नाही,

तू युगानुयुगाचा याजक आहेस.’

याचा अर्थ असा की, येशू हा अधिक चांगल्या कराराची खात्री आहे तसेच, इतर पुष्कळ मुख्य याजक होते. परंतु मरणामुळे निरंतर ते याजकपद चालवू शकले नाही. त्याचे याजकपद कायमचे आहे, कारण तो ‘युगानुयुग’ राहतो. म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे.

म्हणून अगदी असाच महायाजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुद्ध आहे, तो पाप्यांपासून वेगळा केलेला आहे. त्यास आकाशाहूनही उंच केलेले आहे. जे मुख्य याजक पहिल्यांदा त्यांच्या स्वतःच्या पापांसाठी व मग लोकांच्या पापांसाठी जसे अर्पण करतात तसे त्यास करण्याची गरज नाही. त्याने जेव्हा स्वतःला अर्पण केले त्याचवेळी एकदाच व कायमचेच अर्पण केले आहे. कारण नियमशास्त्र मानवी दुर्बलता असलेल्या मनुष्याची मुख्य याजक म्हणून नेमणूक करते. पण नियमशास्त्रानंतर शपथेचे वचन “युगानुयुग” देण्यात आल्यामुळे देवाचा पुत्र हा अनंतकाळासाठी परिपूर्ण असा मुख्य याजक झाला.

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.