Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

दानि 1

दानिएलाचे शिक्षण व त्याचे सोबती

यहूदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने यरूशलेमेवर चढाई करून त्यांची रसद बंद करण्यासाठी यरूशलेमेला वेढा दिला. परमेश्वराने नबुखद्रेनेस्सर राजास यहूदाचा राजा यहोयाकीमवर विजय दिला आणि त्यास परमेश्वराच्या घरातील काही वस्तू दिल्या त्याने त्या शिनार येथे त्याच्या देवाच्या घरासाठी आणल्या आणि त्या पवित्र वस्तू त्याने त्याच्या देवाच्या भांडारात ठेवल्या.

राजा आपला प्रमुख अधिकारी अश्पनज यास म्हणाला की इस्राएलाचे काही लोक, जे राज कुळातले आणि उच्चकुलीन आहेत त्यास माझ्याकडे घेवून ये. ज्यांच्या अंगी काही कलंक नाही असे निष्पाप, सुरुप, कौशल्यपुर्णतेने चतुर, ज्ञानाने परिपूर्ण आणि शक्तीवान आणि राजाच्या महलामध्ये सेवा करण्यास पात्र तेथे त्यांना खास्द्यांची शिक्षण व भाषा शिकवायला त्याने त्यास सांगितले. राज्याच्या मिष्ठान्नातून व तो पीत असे त्या द्राक्षरसातून तो त्यांचा रोज वाटा नेमून दिला. असे त्या तरुणांना तीन वर्षाचे प्रशिक्षण देण्यात यावे. त्यानंतर त्यांनी राजाची सेवा करावी.

त्या लोकांमध्ये दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या हे यहूदा वंशाचे होते. प्रमुख अधिकाऱ्याने त्यांना, दानीएलास बेल्टशस्सर, हनन्यास शद्रख, मीशाएलास मेशख, अजऱ्यास अबेदनगो, नावे दिली.

पण दानीएलाने आपल्या मनात ठरवले की, तो स्वत:ला राजाच्या अन्नाने किंवा त्याच्या पिण्याच्या द्राक्षरसानें विटाळविणार नाही; म्हणून त्याने षंढांच्या अधिकाऱ्याला विनंती केली की, मी आपणाला विटाळवू नये. आता देवाने दानीएलावर प्रमुख अधिकाऱ्याची कृपा आणि दया व्हावी असे केले. प्रमुख अधिकारी दानीएलास म्हणाला, “मला माझा स्वामी, राजांचे भय आहे त्याने तुम्ही काय खावे व काय प्यावे ह्याची आज्ञा केली आहे, तुमच्या वयाच्या इतर तरुणांपेक्षा तुम्ही अधिक वाईट का दिसावे? तुमच्यामुळे तो माझे डोके छाटून टाकेल.”

मग प्रमुख अधिकाऱ्याने दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या हयावर नेमून दिलेल्या कारभाऱ्याशी दानीएल बोलला. तो म्हणाला, “आपल्या दासांची दहा दिवस कसोटी पहा, आम्हास फक्त् शाकभोजन व पिण्यास पाणी दे. नंतर आमचे बाहयरुप व त्या तरुणांचे बाहयरुप व जे राजाचे मिष्ठान्न खात आहेत त्या तरुणांचे बाह्यरुप, त्यांची तुलना कर आणि तुझ्या नजरेस येईल तसे तुझ्या दासास कर.”

मग तो कारभारी हे करण्यास मान्य झाला दहा दिवसानी त्याने त्यांची पाहणी केली. दहा दिवसाच्या शेवटी त्यांचे बाह्यरुप जे राजाचे मिष्ठान्न खात अधिक निरोगी आणि धष्टपुष्ट दिसू लागले. मग कारभाऱ्याने त्यांचे मिष्ठान्न आणि त्यांचा द्राक्षरस काढून त्यास फक्त शाकभोजन दिले.

मग या चार तरुणास देवाने ज्ञान आणि सर्व प्रकारच्या शास्त्रांचा समज आणि शहाणपण दिले, आणि दानीएलास सर्व प्रकारचे स्वप्न व दृष्टांत उलगडत असत. राजाने ठरवून दिलेल्या काळाच्या समाप्तीनंतर प्रमुख अधिकारी त्यांना नबुखद्नेस्सर राजासमोर घेऊन आला.

राजा त्यांच्याशी बोलला, त्या सर्व समुदायामध्ये दानीएल हनन्या, मीशाएल, व अजऱ्या यांच्या तोडीचा दुसरा कोणीच नव्हता. ते राजासमोर त्याच्या सेवेस राहू लागले. ज्ञानाच्या आणि शहाणपणाच्या बाबतीत राजाने त्यांना जे काही विचारले त्यामध्ये ते, सर्व जादूगार, भूतविद्या करणारे हयांच्यापेक्षा ते दहापट उत्तम असे संपूर्ण राज्यात राजाला आढळून आले. कोरेश राजाच्या कारकिर्दीत पहिल्या वर्षापर्यंत दानीएल तेथे राहीला.

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.