Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

आमो 7

विनाशाचे तीन दृष्टांत: टोळ, अग्नी व ओळंबा

परमेश्वराने मला असे दाखविले की पाहा, वसंत ऋतुचे पीक वर येत असताच त्याने टोळ निर्माण केले. पहिल्या पिकाची राजाची कापणी झाल्यानंतरचे हे पीक होय. टोळांनी देशातील सर्व गवत खाऊन झाल्यानंतर मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, मी विनवणी करतो, आम्हास क्षमा कर. याकोब जगू शकणार नाही, कारण तो फारच लहान आहे.” मग ह्याबाबतीत परमेश्वराचे मन परिवर्तन झाले परमेश्वर म्हणाला, “ते घडणार नाही.” प्रभू परमेश्वराने, मला पुढील गोष्टी दाखविल्या, पाहा, परमेश्वर देवाने अग्नीला न्याय करण्यास बोलावले. त्याने महासागर कोरडा केला व भूमीही खाऊन टाकणार होता. पण मी म्हणालो, “हे परमेश्वर देवा, थांब, याकोब कसा वाचेल? करण तो खूपच लहान आहे.” मग परमेश्वराचे या गोष्टीबाबत हृदयपरिवर्तन झाले. प्रभू परमेश्वर म्हणाला, “हे ही घडणार नाही.” परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या. पाहा, परमेश्वर, त्याच्या हातात ओळंबा घेऊन एका भिंतीजवळ उभा होता. परमेश्वर मला म्हणाला, “आमोस, तुला काय दिसते?” मी म्हणालो ओळंबा, मग प्रभू म्हणाला, “पाहा, माझ्या मनुष्यांमध्ये, इस्राएलमध्ये मी ओळंबा धरीन. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही.

इसहाकाच्या उच्च स्थानाचा नाश होईल,

इस्राएलची पवित्र स्थाने धुळीला मिळतील,

आणि मी यराबाम घराण्यावर हल्ला करीन आणि त्यांना तलवारीने ठार मारीन.”

आमोस व अमस्या

बेथेल येथील याजक अमस्या ह्याने, “इस्राएलाचा राजा, यराबामाला निरोप पाठविला. आमोसाने इस्राएलाच्या घरामध्ये तुझ्याविरुध्द कट केला आहे. त्याचे सर्व शब्द देशाला सहन करवत नाही. कारण आमोस असे म्हणतो,

यराबाम तलवारीने मरेल,

आणि इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या देशातून कैदी म्हणून बाहेर नेले जाईल.”

अमस्या आमोसला म्हणाला, “अरे द्रष्ट्या, खाली यहूदात पळून जा आणि तेथेच भाकर खाऊन तुझे प्रवचन दे. पण यापुढे बेथेलमध्ये संदेश देऊ नकोस. कारण ही राजाचे पवित्रस्थान आहे व राज घराणे आहेत.” मग आमोस अमस्याला म्हणाला, “मी संदेष्टा नव्हतो व संदेष्ट्याचा मुलगाही नव्हतो. मी गुरांचे कळप राखणारा आणि उंबरांच्या झाडांची निगा राखणारा होतो. मी कळपामागे चालण्यातून परमेश्वराने मला बोलावून घेतले, आणि मला म्हटले, ‘जा, माझ्या लोकांस, इस्राएलाला, भविष्य सांग.’ म्हणून आता परमेश्वराचे वचन ऐक, ‘इस्राएलविरुध्द संदेश सांगू नकोस, इसहाकच्या घराण्याविरुध्द प्रवचन देऊ नकोस’ असे तू मला सांगतोस. पण परमेश्वर असे म्हणतो,

‘तुझी पत्नी गावची वेश्या होईल;

तुझी मुले-मुली तलवारीने मरतील,

तुझी भूमी सूत्राने विभागीत करण्यात येईल,

तू अपवित्र जागी1 मरशील,

इस्राएलाच्या लोकांस निश्चितच त्यांच्या देशातून कैदी म्हणून नेले जाईल.’”

Source notes (1)
  1. Footnote अन्य जातींच्या देशात

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.