Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 इति 16

बेन-हदादाबरोबर आसाने केलेला सलोखा

1 राजे 15:16-22

आसाच्या राज्याच्या छत्तिसाव्या वर्षी इस्राएलाचा राजा बाशाने यहूदावर स्वारी केली. बाशा हा इस्राएलचा राजा रामा हे नगर निवडून त्याने त्याची मजबुती केली. यहूदाचा राजा आसा याच्याकडे कोणालाही येण्याजाण्याला प्रतिबंध व्हावा हा त्याचा त्यामागचा हेतू होता. तेव्हा आसाने परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारातून व राजमहालातून सोने आणि चांदी काढून घेतली. अरामाचा राजा बेन-हदाद दिमिष्काला राहत होता. आसाने त्याच्याकडे सोने, आणि चांदी पाठवून त्यास निरोप पाठवला, “आपण आपसात एक करार करू आपल्या दोघांच्या पित्यामध्येही तसा करार केलेला होता मी माझ्याकडचे सोने व रुपे तुझ्याकडे पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याबरोबरचा तुझा करार मोड म्हणजे तो माझ्याकडे पाठ फिरवेल आणि मला त्रस्त करणार नाही.” बेन-हदाद आसाच्या गोष्टीशी सहमत झाला. त्याने इस्राएली नगरांवर आपले सैन्याचे सरदार पाठवले. त्या सरदारांनी ईयोन, दान आबेल-मईम या नगरांवर हल्ला केला कोठारे असलेल्या नफतालीच्या नगरांवरही त्यांनी चढाई केली. या चढायांचे वृत्त बाशाच्या कानावर गेले. तेव्हा त्याने रामा शहराच्या मजबुतीचे काम अर्धवट सोडून दिले. राजा आसाने मग सर्व यहूदी लोकांना बोलावले. बाशा ने रामा नगर बांधण्यासाठी वापरलेले दगड, लाकूड ही सामग्री हस्तगत केली. त्यांनी ती गिबा आणि मिस्पा या नगरांच्या बांधकामासाठी वापरली. यावेळी हनानी नावाचा द्रष्टा यहूदाचा राजा आसा याच्याकडे आला व त्यास म्हणाला, “आसा तू मदतीसाठी तुझ्या परमेश्वर देवावर भरवंसा न ठेवता अरामाच्या राजावर अवलंबून राहिलास. तू परमेश्वराचे साहाय्य घ्यायला हवे होतेस. पण तू परमेश्वराचा धावा केला नाहीस म्हणून अरामाचे सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे. कूशी आणि लुबी यांचे सैन्य तर केवढे बलाढ्य होते! त्यांच्याकडे कितीतरी रथ आणि स्वार होते पण तेव्हा तू परमेश्वरावर भरवंसा ठेवलास आणि परमेश्वराने तुला विजय मिळवून दिला. अखिल पृथ्वीवर परमेश्वराचे नेत्र निरीक्षण करीत असतात जे कोणी सरळ मनाने त्याच्याशी वर्ततात अशांना तो आपले पाठबळ देतो. पण तू मात्र मूर्खपणा केला आहेस. तेव्हा यापुढे तुला लढायांना तोंड द्यावे लागेल.” द्रष्ट्याच्या या बोलण्याचा आसास राग आला व क्रोधाच्या भरात त्याने त्यास तुरुंगात डांबले. याच काळात आसा काही लोकांशी फार निर्दयतेने वागला. आसाची सर्व कृत्ये इस्राएल व यहूदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत. आपल्या राज्याच्या एकोणचाळीसाव्या वर्षी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला. त्याचा आजार खूप बळावला तरी त्याने दुखण्यात परमेश्वराचा धावा केला नाही. त्याने वैद्यांकरवी इलाज करून घेतला. आपल्या कारकिर्दीच्या एक्केचाळीसाव्या वर्षी आसा मरण पावला व आपल्या पूर्वजांबरोबर त्याने चिरविश्रांती घेतली. दावीद नगरात त्याने आधीच स्वत:साठी करून घेतलेल्या कबरीत लोकांनी त्याचे दफन केले. विविध सुवासिक द्रव्ये आणि मसाले घातलेल्या बिछान्यावर लोकांनी त्यास ठेवले. त्याच्या सन्मानाप्रीत्यर्थ त्यांनी मोठा जाळ केला.

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.