Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
रूथ 2
रूथ व बवाजची शेतात भेट
नाओमीच्या पतीचा एक नातेवाईक होता, तो मनुष्य एलीमेलेखच्या कुळातील असून, त्याचे नावे बवाज होते.
आणि मोआबी रूथ नाओमीला म्हणाली, “ज्याची कृपादृष्टी माझ्यावर होईल अशा मनुष्याच्या शेतामध्ये जाऊन त्याच्यामागे राहिलेले धान्य वेचण्यासाठी मला जाऊ दे.”
नाओमी म्हणाली, “ठीक आहे, माझ्या मुली, तू जा.” तेव्हा ती गेली, तिने एका शेतात प्रवेश केला आणि कापणी करणाऱ्यांच्या मागे राहिलेले धान्य जमा करू लागली, संयोगाने ते शेत बवाजच्या मालकीचे होते, जो एलीमेलेखच्या कुळातील होता.
त्याचवेळेस बवाज बेथलेहेमातून आला आणि कापणी करणार्यांचे क्षेमकुशल विचारले, तो म्हणाला, “याहवेह तुम्हाबरोबर असो!”
त्यांनी प्रत्युत्तर दिले, “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो!”
बवाजाने त्याच्या कापणी करणाऱ्यांच्या मुकादमास विचारले, “ती तरुण स्त्री कोणाची आहे?”
त्या मुकादमाने उत्तर दिले, “ती मोआबी आहे, ती मोआब देशातून नाओमी बरोबर आली आहे. ती मला म्हणाली, ‘कृपा करून कापणी करणार्यांच्यामागे पेंढ्यांमधून राहिलेले धान्य जमा करून गोळा करू द्या.’ ती सकाळीच शेतामध्ये आली आणि थोडाच वेळ छताखाली विश्रांती घेऊन आतापर्यंत येथेच आहे.”
तेव्हा बवाज रूथला म्हणाला, “माझ्या मुली, माझे ऐक. धान्य वेचण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात जाऊ नकोस आणि येथून दूर जाऊ नकोस. माझ्यासाठी काम करणार्या स्त्रियांबरोबर इथेच राहा. ज्या शेतात माणसे कापणीचे काम करीत आहेत तिकडे लक्ष ठेव आणि या स्त्रियांच्या बरोबरीने त्यांच्यामागे जात राहा. तुला त्रास न देण्याबद्दल मी माणसांना सांगून ठेवले आहे. जेव्हा तुला तहान लागेल, तेव्हा तू जाऊन माणसांनी भरून ठेवलेल्या या रांजणातील पाणी पीत जा.”
त्यावर तिने तिचे मुख जमिनीकडे खाली लवून ते मान्य केले. ती त्याला म्हणाली, “मी एक परदेशी असूनही तुम्ही माझ्यावर एवढी कृपादृष्टी का बरे दाखवित आहात?”
बवाज म्हणाला, “तुझ्या पतीच्या निधनानंतर तू तुझ्या सासूसाठी जे काही केले ते सर्व मला सांगण्यात आलेले आहे—कशाप्रकारे तू तुझ्या वडिलांकडे आणि आईकडे आणि तुझ्या गावाकडे जाण्याचे मान्य केले नाहीस आणि अशा लोकांबरोबर राहण्यास आली आहेस की, ज्यांना तू ओळखत नाही. तू जे काही केले आहेस त्याचे फळ याहवेह तुला देतील. याहवेह इस्राएलांचे परमेश्वर ज्यांच्या पंखाखाली आश्रय घेण्यास तू आली आहेस, त्यांच्याद्वारे तुला भरपूर मजुरी मिळो.”
तेव्हा ती म्हणाली, “हे स्वामी, तुमच्याकडून माझ्यावर सतत कृपा होत रहावी, जरी मी तुमच्या एखाद्या नोकरांपैकी नाही तरी तुमच्या या दासीबरोबर दयाळूपणाने बोलण्याने मला समाधान झाले आहे.”
भोजनाच्या वेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये. थोडी भाकरी घे आणि द्राक्षाच्या सिरक्यामध्ये बुडवून खा.”
जेव्हा ती कापणी करणाऱ्याबरोबर खाली बसली, तेव्हा त्याने तिला थोडे भाजलेले धान्य दिले. तिने तिला हवे तेवढे खाल्ले आणि थोडेसे राहिले होते. जेव्हा ती उरलेले धान्य जमा करण्यास उठली, तेव्हा बवाजाने त्याच्या माणसांना आज्ञा दिल्या, “तिला पेंढ्यांमधून राहिलेले धान्य गोळा करू द्या आणि तिला मनाई करू नका. उलट पेंढ्यांतून काही ताटे ओढून तिला वेचण्यासाठी पडू द्या, आणि तिला धमकावू नका.”
अशाप्रकारे रूथने शेतात संध्याकाळपर्यंत धान्य वेचले. नंतर तिने गोळा केलेल्या जवाची झोडपणी केली आणि ते एकूण एक एफा1 भरले. ते घेऊन ती नगरात गेली आणि तिच्या सासूने पाहिले की तिने किती गोळा केले आहे. रूथने खाऊन राहिलेले अन्नसुद्धा आणले आणि ते तिला दिले.
तिच्या सासूने तिला विचारले, “धान्य गोळा करण्यासाठी आज तू कुठे गेली होतीस? तू कुठे काम केलेस? ज्याने तुझी एवढी काळजी घेतली, तो मनुष्य आशीर्वादित असो!”
तेव्हा रूथने तिच्या सासूला त्याच्याबद्दल सांगितले ज्याच्या ठिकाणी ती काम करीत होती. ती म्हणाली, “ज्या माणसाबरोबर मी आज काम केले त्याचे नाव बवाज आहे,”
नाओमी तिच्या सुनेला म्हणाली, “याहवेह त्याला आशीर्वादित करो! त्यांनी जिवंतांना आणि मृतांना त्यांचा चांगुलपणा दाखविणे थांबविले नाही.” ती पुढे म्हणाली, “तो मनुष्य आपला जवळचा नातेवाईक आहे; तो आम्हाला सोडविणाऱ्यांपैकी2 एक आहे.”
तेव्हा मोआबी रूथ म्हणाली, “तो मला असेही म्हणाला की, ‘जोपर्यंत ते माझ्या संपूर्ण धान्याची कापणी करीत आहेत, तोपर्यंत माझ्या कामकऱ्यांबरोबर राहा.’ ”
नाओमी तिची सून रूथला म्हणाली, “माझ्या मुली, त्याच्यासाठी काम करणाऱ्या स्त्रियांबरोबर जाणे हे तुझ्यासाठी हिताचे होईल, कारण दुसर्या कोणाच्याही शेतात तुझ्यावर अत्याचार होण्याची शक्यता आहे.”
म्हणून जव आणि गव्हाची कापणी संपेपर्यंत रूथ जव गोळा करीत बवाजच्या स्त्रियांच्या जवळच राहिली. ती तिच्या सासूसह राहिली.
Source notes (2)
- Footnote अंदाजे 13 कि.ग्रॅ.
- Footnote म्हणजे सोडविणारा गंभीर परिस्थितीत असलेल्या नातेवाईकाला त्यातून सोडविण्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीसाठी वापरला जाणारा शब्द ( लेवी 25:25‑55 पाहा).
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.