Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
रोमकरांस 13
वरिष्ठ अधिकार्यांच्या अधीन असणे
प्रत्येकाने प्रशासकीय अधिकार्यांच्या अधीन असावे, कारण परमेश्वराने जो नेमून दिला नाही, असा अधिकारच नाही. जे अधिकारी आहेत, ते स्वतः परमेश्वराने नेमलेले आहेत. यास्तव, जो अधिकारी व्यवस्थेविरुद्ध बंड करतो, तो परमेश्वराने स्थापित केलेल्या व्यवस्थेविरुद्ध बंड करीत असतो आणि जे असे करतात, ते स्वतःवर दंड ओढवून घेतील. जे योग्य गोष्टी करतात, त्यांना राज्यकर्त्यांची भीती वाटत नाही, परंतु जे अयोग्य करतात त्यांनाच त्याची भीती वाटते. जे अधिकारी आहेत त्यांच्या भयापासून मुक्त असावे, अशी तुमची इच्छा आहे काय? तर मग योग्य तेच करा, म्हणजे तो तुमची प्रशंसा करेल. कारण तुमचे हित करण्यासाठी तो परमेश्वराचा नेमलेला सेवक आहे. परंतु तुम्ही अयोग्य केले, तर त्याची भीती बाळगा, कारण तो तलवार व्यर्थ धारण करीत नाही. अयोग्य करणार्याला शासन करण्यासाठी तो परमेश्वराचा सेवक, न्यायनीतीचा कारभारी आहे. यास्तव केवळ संभवनीय दंडाकरिताच नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळे अधिकार्यांच्या अधीन राहणे आवश्यक आहे.
याकारणास्तव तुम्ही करही देता; कारण अधिकारी परमेश्वराचे सेवक आहेत आणि त्यांना पूर्णवेळ सेवा करणे आवश्यक आहे. प्रत्येकाला त्याचे जे काही देणे असेल, ते द्या: जर कर द्यायचे तिथे कर द्या, महसूल असेल तर महसूल द्या. आणि जिथे सन्मान तिथे सन्मान, जिथे आदर तिथे आदर द्या.
प्रीती नियम पूर्ण करते
इतरांवर प्रीती करण्याशिवाय कोणाचे ॠणी राहू नका, कारण जो कोणी दुसर्यांवर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्ण केले आहे. या आज्ञा आहेत, “तू व्यभिचार करू नको,” “तू खून करू नको,” “तू चोरी करू नको,” “तू लोभ धरू नको,”1 आणि इतर दुसर्या कोणत्याही आज्ञा असतील तरी, “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा,”2 या एका आज्ञेत सर्व आज्ञा समाविष्ट आहेत. प्रीती शेजार्याचे काही वाईट करीत नाही, म्हणूनच ती नियमशास्त्राची परिपूर्ती करते.
तो दिवस समीप आला आहे
आणखी हे करा, सध्याचा समय ओळखून घ्या: झोपेतून उठण्याची वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या अधिक जवळ आले आहे. रात्र संपत आली आहे; दिवस लवकरच येऊन ठेपेल, म्हणून अंधाराची कृत्ये सोडून द्या आणि प्रकाशाचे शस्त्रधारण करा. दिवस आहे तोपर्यंत आपली वागणूक सभ्य असू द्या. दंगलीत, मद्याच्या धुंदीत, लैंगिक अनैतिकतेत, कामासक्तीत, कलहात व मत्सरात आपला वेळ व्यर्थ दवडू नका. यापेक्षा, प्रभू येशू ख्रिस्तांना परिधान करा व देहाच्या वासनांचा उपभोग घेण्याचा विचार करू नका.
Source notes (2)
- Footnote निर्ग 20:13‑15, 17; अनु 5:17‑19, 21
- Footnote लेवी 19:18
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.