Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

प्रकटीकरण 1

प्रस्तावना

ज्यागोष्टी लवकरच निश्चितच घडून येणार आहेत, त्या आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी परमेश्वराने हे प्रकटीकरण येशू ख्रिस्ताला दिले. त्यांनी आपल्या दूताला पाठवून आपला सेवक योहानाला ते कळविले. योहानाने जे सर्व पाहिले त्याविषयी साक्ष दिली—ती म्हणजे, परमेश्वराचे वचन आणि येशू ख्रिस्ताची साक्ष. जो कोणी या भविष्यकथनाचे मोठ्याने वाचन करतो तो धन्य, जे लोक ते ऐकतात आणि यात लिहिल्याप्रमाणे पालन करतात ते धन्य, कारण वेळ जवळ आली आहे.

शुभेच्छा आणि ईशगान

योहानाकडून,

आशिया प्रांतातील सात मंडळ्यास:

जे आहेत आणि जे होते आणि जे येणार आहेत आणि त्यांच्या सिंहासनासमोर असणाऱ्या सात आत्म्यांपासून तुम्हास कृपा आणि शांती असो आणि जे विश्वसनीय साक्षीदार, मृतातील प्रथमफळ आणि पृथ्वीवरील राजांचे शासक आहेत त्या येशू ख्रिस्तापासून तुम्हास कृपा आणि शांती लाभो.

त्यांना, जे आमच्यावर प्रीती करतात आणि ज्यांच्या रक्ताद्वारे आमची पापांपासून सुटका झाली आहे आणि ज्या येशूंनी परमेश्वराची व त्यांच्या पित्याची सेवा करण्यासाठी आमची त्यांचे राज्य व याजक म्हणून निवड केली आहे, त्यांना सदासर्वकाळ गौरव व सामर्थ्य असो! आमेन.

“पाहा, ते मेघारूढ होऊन येत आहेत,”

आणि “प्रत्येक नेत्र त्यांना पाहील,1

स्वतः त्याला भोसकणारेही त्यांच्याकडे पाहतील”

आणि तेव्हा पृथ्वीवरील सर्व लोक “त्यांच्यामुळे शोक करतील.”2

असेच होणार! आमेन.

प्रभू परमेश्वर म्हणतात, “मीच अल्फा व ओमेगा3, जे होते आणि जे येणार आहेत, ते सर्वसमर्थ परमेश्वर आहेत.”

योहानाचा ख्रिस्ताविषयी दृष्टान्त

मी योहान, तुमचा बंधू, येशूंच्या दुःखात, राज्यात व धीरात तुमचा सहभागी असलेला, परमेश्वराच्या वचनामुळे आणि येशूंच्या साक्षीमुळे पत्मोस नावाच्या बेटावर शिक्षा भोगीत होतो. प्रभूच्या दिवशी मी आत्म्यात संचारलो आणि मी माझ्यामागे रणशिंगाच्या आवाजासारखा मोठा आवाज ऐकला. तो म्हणाला: “तुला जे दिसते, ते एका ग्रंथपटावर लिहून काढ आणि ते इफिस, स्मुर्णा, पर्गमम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया या सात मंडळ्यांना पाठव.”

माझ्याशी कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळलो, आणि जेव्हा मी मागे वळलो तेव्हा तिथे सोन्याच्या सात समया असल्याचे मला दिसले. त्या समयांच्या मध्यभागी मानवपुत्रासारखा दिसणारा कोणी एक उभा होता. त्यांनी पायघोळ वस्त्र घातले होते व छातीवर सोन्याचा पट्टा बांधला होता. त्यांच्या डोक्यावरील केस पांढर्‍या लोकरीसमान, बर्फासारखे शुभ्र होते आणि त्यांचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे भेदक होते. त्यांचे पाय जणू काही भट्टीतून शुद्ध केलेल्या चकचकीत सोनपितळ्यासारखे होते आणि त्यांची वाणी गर्जना करणार्‍या धबधब्यासारखी होती. त्यांनी त्यांच्या उजव्या हातात सात तारे धरले होते आणि त्यांच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. त्यांचा चेहरा मध्यान्ह्याच्या सूर्यप्रकाशा इतका तेजस्वी होता.

त्यांना पाहताक्षणीच मी त्यांच्या पायाशी मृतवत होऊन पडलो. पण त्यांनी आपला उजवा हात माझ्यावर ठेऊन म्हटले, “भिऊ नको! मी पहिला व शेवटचा, जिवंत असलेला तो मीच आहे; मी मृत होतो आणि पाहा, आता मी सदासर्वकाळ जिवंत आहे! आणि मृत्यूच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.

“तर तू जे पाहिले, जे आता आहे आणि यानंतर घडणार आहे, ते सर्व लिहून ठेव. तू माझ्या उजव्या हातात पाहिलेल्या सात तार्‍यांचे व सोन्याच्या सात समयांचे रहस्य हे आहे: हे सात तारे म्हणजे सात मंडळ्यांचे देवदूत4 आणि सोन्याच्या सात समया म्हणजे सात मंडळ्या आहेत.”

Source notes (4)
  1. Footnote दानी 7:13
  2. Footnote जख 12:10
  3. Footnote म्हणजे प्रारंभ आणि शेवट
  4. Footnote किंवा संदेष्टे

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.