Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

नीतिसूत्रे 5

व्यभिचाराविरुद्ध ताकीद

माझ्या मुला, माझ्या सुज्ञानाकडे लक्ष दे,

माझ्या अंतर्ज्ञानाच्या शब्दांकडे तुझे कान लाव;

म्हणजे विवेकबुद्धीने कसे वागावे हे तुला समजेल;

आणि तुझी जीभ ज्ञानाचे रक्षण करेल.

कारण वेश्येचे बोलणे मधासारखे गोड असते,

आणि तिचा संवाद तेलापेक्षा गुळगुळीत असतो;

परंतु शेवटी ती दवण्यासारखी कडू होते,

आणि दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते.

तिचे पाय मृत्यूकडे जातात;

तिची पावले सरळ अधोलोकी नेतात.

जीवनाच्या मार्गाचा ती विचारच करीत नाही;

तिचे मार्ग लक्ष्यहीनपणे भटकणारे आहेत, परंतु तिला ते माहीत नसते.

मग माझ्या मुलांनो, आता माझे ऐका;

माझ्या बोधवचनांकडे पाठ फिरवू नका.

तू तुझा मार्ग अशा स्त्रीपासून दूर ठेव,

तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस,

असे होऊ नये की, तू तुझा मान दुसर्‍यांना द्यावा

आणि तुझी प्रतिष्ठा क्रूर मनुष्याला मिळावी,

तुझ्या संपत्तीवर अपरिचित लोक मेजवानी करू नये

आणि तुझ्या परिश्रमाने दुसर्‍याचे घर समृद्ध होऊ नये.

तुझ्या जीवन अंती, जेव्हा तुझे मांस आणि शरीर झिजून जाईल

तेव्हा तू दुःखाने विव्हळशील.

तू म्हणशील, “अरेरे! मी शिस्तीचा किती तिरस्कार केला!

माझ्या अंतःकरणाने सुधारणा कशी फेटाळून लावली!

मी माझ्या शिक्षकांचे आज्ञापालन करत नसे

किंवा मला मार्गदर्शन करणार्‍यांकडे मी कानाडोळा करीत असे.

आणि म्हणून लवकरच मी परमेश्वराच्या लोकांच्या सभेपुढे

गंभीर अडचणीत आलो.”

तुझ्या स्वतःच्याच टाकीतील पाणी पी.

तुझ्या स्वतःच्या विहिरीतील वाहते पाणी पी.

तुझे पाण्याचे झरे भरून रस्त्यांवर वाहून जावेत काय,

तुझे पाण्याचे प्रवाह भर चौकात वाहावेत काय?

ते फक्त तुझ्यासाठीच असावेत,

अनोळख्यांबरोबर ते कधीच वाटली जाऊ नयेत.

तुझे पौरुषत्व आशीर्वादित होवो;

आपल्या तारुण्यातील पत्नीबरोबर आनंदाचा उपभोग घे.

प्रेमळ हरिणी सारखी, एक आकर्षक हरिणी अशी ती—

तिचे स्तन तुला नेहमीच तृप्त करोत,

तिच्या प्रेमाने तू नेहमी धुंद व्हावेस.

माझ्या मुला, तू दुसर्‍या मनुष्याच्या पत्नीबरोबर धुंद का व्हावेस?

आणि स्वैर स्त्रीला आलिंगन का द्यावेस?

कारण तुझे मार्ग याहवेहच्या दृष्टीसमोर आहेत,

आणि ते तुझ्या सर्व मार्गांचे परीक्षण करतात.

दुष्ट मनुष्याचा नाश स्वतःच्याच पातकांनी होतो;

त्याचीच पातके दोर बनून त्याला पाशात पकडून ठेवतात.

कारण शिस्त नसल्यामुळे त्यांना मरण येईल,

आणि स्वतःच्याच अतिमूर्खपणाने ते फसविले जातील.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.