Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

फिलिप्पैकरांस 2

ख्रिस्ताच्या नम्रतेचे अनुकरण

यास्तव ख्रिस्ताच्या ठायी ऐक्यता असल्यामुळे काही उत्तेजन, त्यांच्या प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, जर काही करुणा व कळवळा आहे, तर तुम्ही एकमेकांशी सहमत होणारे, सारखीच प्रीती करणारे आणि एका आत्म्याचे व एकमनाचे होऊन माझा आनंद परिपूर्ण करा. स्वार्थी महत्त्वाकांक्षा, किंवा बढाई मारण्याच्या हेतूंनी तुम्ही काहीही करू नये, तर प्रत्येकाने नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ मानावे. तुम्ही केवळ स्वतःचेच हित नव्हे, तर इतरांचेही हित पाहावे.

ख्रिस्त येशूंमध्ये जी मनोवृत्ती होती, तीच वृत्ती तुम्ही एकमेकांच्या संबंधात बाळगा:

ते खुद्द परमेश्वराच्या स्वरुपाचे असूनही

त्यांनी स्वतःस परमेश्वरासमान केले नाही

व परमेश्वरासम असण्याचा लाभ त्यांनी घेतला नाही;

उलट, त्यांनी स्वतःला रिक्त केले

आणि दासाचे स्वरूप घेऊन,

मनुष्यांच्या प्रतिरूपाचे झाले.

मानवी रूप धारण करून

त्यांनी स्वतःस लीन केले,

येथपर्यंत की आज्ञापालन करून ते मरावयास,

आणि तेही क्रूसावरील मरण पत्करण्यास तयार झाले.

म्हणून परमेश्वराने त्यांना अत्युच्च स्थानी ठेवले

आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्यांना दिले;

यासाठी की येशूंच्या नावाने प्रत्येक गुडघा टेकला जावा,

स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली,

परमेश्वर पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीभ कबूल करेल

की येशू ख्रिस्त हेच प्रभू आहेत.

सर्वकाही कुरकुर न करता करा

यास्तव, प्रिय मित्रांनो, मी तिथे तुम्हाबरोबर असताना आणि याहीपेक्षा माझ्या अनुपस्थितीत तुम्ही नेहमीच आज्ञापालन केले आहे, म्हणून तुमच्या तारणाचे कार्य भयात व कापत साधून घ्या. कारण परमेश्वर आहेत, की ज्यांनी आपल्या उत्तम योजनेसाठी तुमच्यामध्ये इच्छा करणे व कृती करणे साधले आहे.

जे काही कराल ते सर्व कुरकुर व वादविवाद न करता करा, म्हणजे, “तुम्ही या दुष्ट आणि कुटिल आणि हेकेखोर पिढीत दोषरहित व शुद्ध राहून परमेश्वराची लेकरे”1 म्हणून त्यांच्यामध्ये आकाशातील तार्‍यांप्रमाणे चमकाल. तुम्ही जीवनाचे वचन मजबूत धरून ठेवले आहे म्हणून ख्रिस्ताच्या दिवशी माझी धाव व श्रम व्यर्थ झाले नाही याचा मला अभिमान बाळगता येईल. तुमच्या विश्वासाची सेवा आणि यज्ञ यावर मी स्वतः पेयार्पण म्हणून अर्पण केला जात आहे तरी मीही तुमच्याबरोबर आनंद करेन. त्याचप्रमाणे तुम्हीही उल्हासित व्हावे आणि माझ्याबरोबर आनंद करावा.

तीमथ्य व एपफ्रदीत

मला प्रभू येशूंमध्ये आशा आहे की, मी लवकरच तीमथ्याला तुमच्याकडे पाठवेन; म्हणजे तुमची बातमी ऐकून मीही उल्हासित होईन. तुमचा खरा हितचिंतक तीमथ्यासारखा दुसरा कोणी नाही. इतर प्रत्येकजण स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी पाहतात, येशू ख्रिस्ताच्या नाही. शुभवार्तेच्या कार्यात तीमथ्याने मला जसा पुत्र आपल्या पित्यास करतो, तसे साहाय्य करून स्वतःस सिद्ध केले हे तुम्हाला माहीत आहे. माझ्या सर्वगोष्टी व्यवस्थित होताच, त्याला तुमच्याकडे लवकर पाठविता येईल अशी मला आशा आहे; आणि मीही स्वतः लवकर येईन, असा प्रभूवर माझा भरवसा आहे.

मध्यंतरी मला वाटले की मी एपफ्रदीत हा माझा भाऊ, सहकारी, सहसैनिक आणि तुमचा संदेशवाहक याला तुमच्याकडे परत पाठवावे. माझ्या गरजेच्यावेळी मला साहाय्य करण्यासाठी तुम्ही त्याला पाठविले होते. कारण त्याच्या आजाराची वार्ता तुम्ही ऐकली म्हणून तुम्हा सर्वांना भेटावयास तो उत्सुक व चिंताक्रांत झालेला आहे; आणि खरोखरच तो आजारी पडला, अंदाजे मरणोन्मुख झाला होता, पण परमेश्वराने त्याच्यावर आणि माझ्यावरही दया करून मला दुःखावर दुःख होण्यापासून वाचविले. म्हणूनच त्याला तुमच्याकडे परत पाठविण्यास मी अधिकच उत्सुक आहे. कारण त्याला पाहून तुम्हाला आनंद वाटेल आणि माझी चिंताही कमी होईल. प्रभूमध्ये मोठ्या आनंदाने त्याचे स्वागत करून त्याच्यासारख्यांचा सत्कार करा. कारण ख्रिस्ताच्या सेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व त्याला अंदाजे मरण आलेच होते, माझ्यासाठी तुम्हाला ज्यागोष्टी करता आल्या नाहीत त्या त्याने केल्या.

Source notes (1)
  1. Footnote अनु 32:5

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.