Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
गणना 28
दैनंदिन अर्पणे
याहवेहने मोशेला म्हटले, “इस्राएली लोकांना ही आज्ञा दे व त्यांना सांग: ‘तुम्ही मला नेमलेल्या वेळी मला आवडेल असे सुवासिक अन्नार्पण मला निश्चितपणे सादर करावे.’ त्यांना सांग: ‘जे अन्नार्पण तुम्ही याहवेहला सादर करावे ते हे: एक वर्षाची दोन निर्दोष कोकरे, जी दररोज नियमितपणे होमार्पण म्हणून अर्पण करावी. एक कोकरू सकाळी व दुसरे संध्याकाळी अर्पण करावे. त्याबरोबर धान्यार्पणासाठी एक एफाचा दहावा भाग1 बारीक पीठ, कुटून काढलेल्या एक पाव हीन2 जैतुनाच्या तेलात मळून अर्पण करावे. सीनाय पर्वतावर स्थापित केलेले हे नियमितपणाचे होमार्पण याहवेहला आवडणारे सुवासिक अन्नार्पण आहे. त्याबरोबरचे पेयार्पण, एका कोकर्याबरोबर एक पाव आंबवलेले पेय असावे. हे पेयार्पण याहवेहसाठी पवित्रस्थानी ओतावे. दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे, सकाळच्या अर्पणाप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण यासहित अर्पण करावे. हे अन्नार्पण याहवेहसाठी सुवासिक अर्पण आहे.’ ”
शब्बाथाची अर्पणे
“शब्बाथ दिवशी एक वर्षाची दोन निर्दोष कोकरे, व त्याबरोबर पेयार्पण व जैतुनाच्या तेलात मळलेले एका एफाचे दोन दशांश3 बारीक पीठ धान्यार्पण असे अर्पण करावे. नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याशिवाय प्रत्येक शब्बाथ दिवसाचे हे होमार्पण आहे.
मासिक अर्पणे
“प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी दोन तरुण गोर्हे, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे होमार्पण म्हणून याहवेहसाठी अर्पण करावे, हे सर्व निर्दोष असावेत. प्रत्येक गोर्ह्याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश4 बारीक पीठ; आणि एका मेंढ्याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशांश बारीक पीठ; आणि प्रत्येक कोकर्याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशांश बारीक पीठ अर्पण करावे. हे होमार्पण सुवासिक अर्पण, अन्नार्पण म्हणून याहवेहसाठी सादर करावे. प्रत्येक गोर्ह्याबरोबर अर्धा हीन5 पेयार्पण; आणि प्रत्येक मेंढ्याबरोबर एकतृतीयांश हीन6, व प्रत्येक कोकर्याबरोबर एक पाव हीन7 द्राक्षारस आणावा. वर्षभरातील प्रत्येक पोर्णिमेच्या दिवशी करावयाचे हे मासिक होमार्पण आहे. नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याशिवाय एक बोकड पापार्पण म्हणून याहवेहला सादर करावा.
वल्हांडण
“ ‘पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्ही याहवेहचा वल्हांडण पाळावा. या महिन्याच्या पंधराव्या दिवशीही सण पाळावा; सात दिवस खमीर न घातलेली भाकर खावी. पहिल्या दिवशी एक पवित्र सभा भरवावी व कोणतेही नियमित कामे करू नये. याहवेहसाठी अन्नार्पण सादर करा, म्हणजेच दोन तरुण गोर्हे, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण करा, हे सर्व निर्दोष असावे. प्रत्येक गोर्ह्याबरोबर तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ व मेंढ्याबरोबर दोन दशांश असे धान्यार्पण करावे. व सात कोकर्यातील प्रत्येकासाठी, एफाचा एक दशांश अर्पावा. आणि तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून एक बोकड पापार्पण म्हणून अर्पावा. ही अर्पणे सकाळच्या नियमित होमार्पणाखेरीज असावीत. अशाप्रकारे सात दिवस दररोज याहवेहसाठी सुवास म्हणून हे अन्नार्पण करावे; नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याबरोबरच ही अर्पणे अर्पावीत. सातव्या दिवशी पवित्र सभा भरवावी आणि नियमित कामे करू नये.
आठवड्याचा सण
“ ‘प्रथमफळांच्या दिवशी, जेव्हा तुम्ही आठवड्याच्या सणाच्या वेळी याहवेहला नवीन धान्याचे अर्पण करता, तेव्हा पवित्र सभा बोलवा आणि नियमित कामे करू नका. याहवेहला सुवासिक होमार्पण म्हणून दोन तरुण गोर्हे, एक मेंढा व एक वर्षाची सात नरकोकरे अर्पण करा. प्रत्येक गोर्ह्याबरोबर तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ यांचे धान्यार्पण करावे; गोर्ह्याबरोबर दोन दशांश; आणि सात कोकर्यांकरिता प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे. तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून एक बोकड अर्पावा. नियमित होमार्पण व त्याचे धान्यार्पण याबरोबरच ही अर्पणे त्यांच्या पेयार्पणासह अर्पावीत. गुरे निर्दोष असतील याची खात्री करावी.
Source notes (7)
- Footnote अंदाजे1.6 कि.ग्रॅ.
- Footnote अंदाजे 1लीटर
- Footnote अंदाजे 3.2 कि.ग्रॅ.
- Footnote अंदाजे 5 कि.ग्रॅ.
- Footnote अंदाजे 1.9 लीटर
- Footnote अंदाजे 1.3 लीटर
- Footnote अंदाजे 1 लीटर
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.