Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
गणना 10
चांदीचे कर्णे
याहवेह मोशेला म्हणाले: “तू घडीव चांदीचे दोन कर्णे घडवून घे आणि समुदायाला एकत्र जमविण्यासाठी आणि छावण्या पुढे प्रवासास निघण्यासाठी त्यांचा उपयोग कर. दोन्ही कर्णे वाजविले म्हणजे सर्व समुदायाने सभामंडपाच्या प्रवेशव्दाराजवळ तुझ्यापुढे एकत्र जमावे. जर एकच कर्णा वाजविला, तर इस्राएली कुलप्रमुखांनी तुझ्यापुढे जमावे. जेव्हा कर्ण्याचा मोठा गजर केला म्हणजे पूर्वेकडे तळ दिलेल्या वंशानी पुढे निघावे. दुसरा गजर केला म्हणजे दक्षिणेकडील वंशानी निघावे. तो गजर पुढे निघण्यासाठी संकेत असा राहील जेव्हा समुदाय जमा करावयाचा असेल तेव्हा कर्णा वाजवा, परंतु पुढे जाण्याच्या संकेताने नव्हे.
“अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनीच कर्णे वाजवावे. हा तुम्हाला व येणार्या तुमच्या पिढ्यांसाठी सर्वकाळचा नियम असावा. जेव्हा तुम्ही तुमच्याच देशात तुमच्यावर जुलूम करणार्या तुमच्या शत्रूविरुद्ध युद्ध करण्यास जाता, तेव्हा तुम्ही कर्ण्याचा गजर करा. तेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुमचे स्मरण करतील व तुमच्या शत्रूपासून तुम्हाला सोडविले जाईल. तुमच्या आनंदाच्या प्रसंगी; तुमचे नेमलेले सण व महिन्याच्या आरंभीची मेजवानी, जेव्हा तुम्ही आपली होमार्पणे व शांत्यर्पणे आणता, त्यावेळी सुद्धा तुम्ही कर्णे वाजवा आणि ते याहवेहसमोर तुमच्यासाठी स्मरणार्थ असेल. मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”
इस्राएली लोक सीनाय सोडतात
दुसर्या वर्षाच्या दुसर्या महिन्याच्या विसाव्या दिवशी कराराच्या नियमाच्या निवासमंडपावरून मेघ वरती घेतला गेला. तेव्हा इस्राएली लोक सीनायच्या रानातून निघाले आणि पारानाच्या रानात मेघ स्थिर होईपर्यंत एका ठिकाणातून दुसर्या ठिकाणी प्रवास करीत राहिले. याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेनुसार ते पहिल्या प्रवासास निघाले.
यहूदाह वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली प्रथम निघाला. अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन त्यांचा सेनापती होता. सूवाराचा पुत्र नथानेल हा इस्साखार वंशाच्या दलावर होता, आणि हेलोनाचा पुत्र एलियाब जबुलून वंशाच्या दलावर होता. मग निवासमंडप खाली उतरविला गेला आणि गेर्षोनी व मरारींनी निवासमंडप वाहून ते पुढे निघाले.
त्यानंतर रऊबेन वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली पुढे निघाला. शदेयुराचा पुत्र एलीसूर त्यांचा सेनापती होता. सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल हा शिमओन वंशाच्या दलावर होता. आणि देउएलाचा पुत्र एलीआसाफ हा गाद वंशाच्या दलावर होता. मग पवित्र वस्तू घेऊन कोहाथी लोक निघाले. म्हणजे ते पोहोचण्यापूर्वी निवासमंडप उभारला जावा.
एफ्राईम वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली पुढे निघाला. अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा त्यांचा सेनापती होता. पदहसूरचा पुत्र गमलीएल हा मनश्शेह वंशाच्या दलावर होता, आणि गिदोनाचा पुत्र अबीदान हा बिन्यामीन वंशाच्या दलावर होता.
शेवटी सर्व तुकड्यांच्या मागून रक्षक म्हणून, दान वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली निघाला. अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर त्यांच्या दलावर सेनापती होता. ओक्रानाचा पुत्र पगीयेल हा आशेर वंशाच्या दलावर होता, आणि एनानाचा पुत्र अहीरा हा नफताली वंशाच्या दलावर होता. पुढे निघताना इस्राएली दलांच्या प्रवासाचा हा क्रम होता.
आणि मोशेचा सासरा मिद्यानी रऊएलचा पुत्र होबाबला मोशे म्हणाला, “आम्ही त्या ठिकाणाकडे जात आहोत, ज्याविषयी याहवेहने सांगितले की, ‘मी ते तुम्हाला देईन.’ तू आमच्याबरोबर ये आणि आम्ही तुला चांगली वागणूक देऊ, कारण याहवेहने इस्राएली लोकांना उत्तम गोष्टींविषयी अभिवचन दिले आहे.”
तो त्याला म्हणाला, “नाही, मी येणार नाही; मी माझा देश आणि माझ्या लोकांकडे जात आहे.”
पण मोशे म्हणाला, “कृपा करून आम्हाला सोडू नकोस. रानात आम्ही कुठे तळ द्यावा याविषयी तुला माहिती आहे, आम्ही तुझ्या नजरेने पाहू. तू जर आमच्याबरोबर आलास, तर याहवेह आम्हाला ज्या चांगल्या गोष्टी देतील, त्यात तुलाही वाटा मिळेल.”
मग ते याहवेहचे पर्वत म्हणजेच सीनाय पर्वतापासून निघाले व तीन दिवसांचा प्रवास करीत गेले. याहवेहच्या कराराचा कोश त्यांच्या विसाव्याचे ठिकाण पाहण्यासाठी त्या तीन दिवसांचा प्रवास करीत त्यांच्यापुढे गेला. ते छावणीतून निघाले तेव्हा दिवसा याहवेहचा मेघ त्यांच्यावर होता.
जेव्हा कोश पुढे जात असे तेव्हा मोशे म्हणे,
“हे याहवेह, सक्रिय व्हा!
तुमच्या शत्रूंची पांगापांग होवो;
तुमचे वैरी तुमच्यापुढून पळून जावोत.”
जेव्हा कोश थांबत असे, तो म्हणे,
“हे याहवेह, परत या,
इस्राएलाच्या हजारो असंख्याकडे पुन्हा या.”
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.