Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

नहूम 1

निनवेहविषयी भविष्यवाणी. एल्कोशवासी नहूमच्या दृष्टान्ताचे पुस्तक.

निनवेहविषयी याहवेहचा क्रोध

याहवेह ईर्ष्यावान व सूड घेणारे परमेश्वर आहेत;

याहवेह सूड घेणारे आणि क्रोधाने भरलेले आहेत.

त्यांच्या शत्रूंचा ते सूड घेतात

आणि आपला कोप त्यांच्याविरुद्ध मोकळा करतात.

याहवेह मंदक्रोध आहेत, पण अत्यंत सामर्थ्यशाली आहेत;

याहवेह दुष्टांना शिक्षा दिल्याशिवाय सोडत नाही.

त्यांचे मार्ग चक्रीवादळ व वादळामधून जातात.

ढग त्यांच्या पायाखालची धूळ आहेत.

ते समुद्रास फटकारतात आणि तो शुष्क होतो;

ते सर्व नद्यांना कोरडे करतात.

बाशान व कर्मेल मलूल होतात;

लबानोनचा मोहोर कोमेजतो.

त्यांच्यासमोर पर्वत कंपित होतात

व टेकड्या विरघळतात.

पृथ्वी आणि जग व त्यात राहणारे सर्वजण

त्यांच्या समक्षतेत थरकापतात.

संतप्त याहवेहपुढे कोणाचा निभाव लागेल?

त्यांचा क्रोध कोण सहन करू शकेल?

त्यांचा उग्र क्रोध अग्नीसारखा ओतला जातो;

त्यांच्यापुढे खडक ढासळून पडतात.

याहवेह चांगले आहेत,

संकटसमयी आश्रयस्थान आहेत.

त्यांच्यावर भरवसा ठेवणार्‍या प्रत्येकाची ते काळजी घेतात.

परंतु भयंकर महापुराने

ते निनवेहचा अंत करतील;

त्यांच्या शत्रूचा ते अंधकाराच्या साम्राज्यातही पाठलाग करतात.

याहवेहच्या विरुद्ध ते जे काही कारस्थान करतात1

त्याचा ते अंत करतील;

ते संकट दुसऱ्यांदा येणार नाही.

याहवेहचे शत्रू काटेरी झुडूपात गुंतून पडतील

आणि स्वतःचेच मद्य पिऊन ते धुंद होतील;

वाळलेल्या गवताप्रमाणे ते अग्नीमध्ये भस्म होतील.

हे निनवेह, तुमच्यापैकी कोण आहे

जो याहवेहविरुद्ध कट रचेल

आणि दुष्ट योजना करू शकेल?

याहवेह असे म्हणतात:

“यद्यपि त्यांना अनेक दोस्त राष्ट्र आहेत व ते असंख्य आहेत,

तरी ते नष्ट होतील व त्यांचे अस्तित्व नाहीसे होईल.

हे यहूदाह, मी जरी तुला पीडित केले,

तरी आता मी तुला पीडा देणार नाही.

आता मी तुमच्या मानेवरील जू मोडून टाकीन

आणि तुमच्या शृंखला तोडून टाकीन.”

हे निनवेह, याहवेहने तुझ्याविषयी आज्ञा दिली आहे:

“तुझे नाव पुढे चालविणारी कोणीही संतती राहणार नाही.

आणि जी तुझ्या दैवताच्या मंदिरात आहेत

ती तुझी दैवते आणि मूर्ती मी नष्ट करेन.

मी तुझी कबर तयार करेन,

कारण तू तिरस्करणीय आहेस.”

पाहा, पर्वतांवरून संदेशवाहक येत आहेत,

ज्यांची पावले एक शुभवार्ता आणत आहेत,

जे शांतीची घोषणा करतात!

हे यहूदाह, तू तुझे सण साजरे कर,

आणि तुझे नवस फेड.

कारण आता कोणी दुष्ट लोक तुझ्यावर आक्रमण करणार नाहीत;

त्यांचा कायमचा उच्छेद होईल.

Source notes (1)
  1. Footnote किंवा तुम्ही जे शत्रू ते याहवेहविरुद्ध काय कट रचता?

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.