Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

मत्तय 8

कुष्ठरोग्यास बरे करणे

येशू डोंगरावरून खाली आले, तेव्हा मोठा लोकसमुदाय त्यांच्यामागे चालू लागला. एक कुष्ठरोगी1 येशूंकडे आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “प्रभू, तुमची इच्छा असल्यास मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात.”

येशूंनी आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, “माझी इच्छा आहे. शुद्ध हो!” तत्काळ त्याच्या कुष्ठरोगापासून तो शुद्ध झाला. मग येशू त्याला म्हणाले, “हे कोणाला सांगू नकोस. परंतु जा, स्वतःस याजकाला दाखव व कुष्ठरोग बरे झाल्यानंतर शुद्धीकरणाचे प्रमाण म्हणून मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे जे अर्पण करावयाचे असते, ते कर.”

शताधिपतीचा विश्वास

येशूंनी कफर्णहूममध्ये प्रवेश केला. तेव्हा एका रोमी शताधिपतीने2 त्यांच्याकडे येऊन त्यांना विनंती केली, “प्रभू, माझा नोकर घरी पक्षघाताने आजारी असून वेदनांनी तळमळत आहे.”

येशूने त्याला म्हटले, “मी येऊन त्याला बरे करू का?”

तेव्हा तो शताधिपती म्हणाला, “प्रभू, तुम्ही माझ्या छप्पराखाली यावे यास मी योग्य नाही, शब्द मात्र बोला, म्हणजे माझा नोकर बरा होईल. कारण मी स्वतः अधिकाराच्या अधीन असलेला मनुष्य असून माझ्या अधिकाराखाली सैनिक आहेत. मी एकाला, ‘जा,’ म्हटले की तो जातो आणि दुसर्‍याला, ‘ये,’ म्हटले की तो येतो आणि माझ्या नोकराला, ‘हे कर,’ अथवा ‘ते कर,’ असे म्हटले तर तो ते करतो.”

येशूंनी हे ऐकले, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि समुदायाला म्हणाले, “मी तुम्हाला सत्य सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलातील कोणामध्येही आढळला नाही. मी तुम्हाला सांगतो की, अनेकजण पूर्व आणि पश्चिमेकडून येतील, आणि स्वर्गीय राज्यात चाललेल्या मेजवानीत, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याबरोबर आपल्या जागा घेतील. परंतु राज्याची प्रजा बाहेर अंधकारात टाकली जाईल, जिथे रडणे आणि दातखाणे असेल.”

नंतर येशू त्या शताधिपतीला म्हणाले, “जा! जसा तू विश्वास ठेवलास, तसेच होवो.” आणि त्याच घटकेस त्याचा नोकर बरा झाला.

येशू अनेकांना बरे करतात

येशू पेत्राच्या घरी आले, तेव्हा त्यांनी पेत्राची सासू तापाने फणफणली असून अंथरुणावर पडून होती असे पाहिले. तेव्हा येशूंनी हात धरून तिला उठविले आणि त्यांनी स्पर्श करताच तिचा ताप गेला; ती उठली आणि त्यांची सेवा केली.

संध्याकाळ झाल्यावर अनेक भूतग्रस्तांना त्यांच्याकडे आणण्यात आले आणि केवळ त्यांच्या शब्दाने त्या दुष्ट आत्म्यांना येशूंनी हाकलून दिले आणि सर्व रोग्यांना बरे केले. यशायाह संदेष्ट्याद्वारे जे म्हटले गेले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले:

“त्याने आमचे विकार स्वतःवर घेतले

आणि आमचे रोग वाहिले.”3

येशूंचे अनुयायी होण्याची किंमत

येशूंनी आपल्या भोवताली जमलेली गर्दी पाहिली तेव्हा शिष्यांना आज्ञा करून ते म्हणाले, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ.” तेवढ्यात एक नियमशास्त्र शिक्षक येशूंकडे येऊन म्हणाला, “आपण जिथे कुठे जाल, तिथे मी तुमच्यामागे येईन.”

येशूंनी उत्तर दिले, “कोल्ह्यांना बिळे आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, परंतु मानवपुत्राला4 डोके टेकण्यासही जागा नाही.”

त्यांच्या शिष्यांपैकी दुसर्‍या एकाने म्हटले, “प्रभूजी, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरावयास जाऊ द्या.”

येशूंनी त्याला म्हटले, “मला अनुसर आणि जे मेलेले आहेत, त्यांना आपल्या मृतांना मूठमाती देऊ दे.”

येशू वादळ शांत करतात

मग त्यांचे शिष्य होडीत बसून त्यांच्याबरोबर गेले. तेव्हा, एकाएकी सरोवरात भयंकर वादळ सुटले, लाटा होडीवर आदळू लागल्या व त्यांची होडी बुडू लागली. पण येशू झोपी गेले होते. तेव्हा शिष्यांनी त्यांना उठविले आणि ते त्यांना म्हणाले, “प्रभूजी, आम्हाला वाचवा! आपण सर्वजण बुडत आहोत!”

येशू त्यांना म्हणाले, “अहो, अल्पविश्वासी, तुम्ही इतके का घाबरला?” मग ते उठले आणि त्यांनी वार्‍याला व लाटांना धमकाविले आणि सर्वकाही शांत झाले.

ते पाहून शिष्य चकित झाले आणि एकमेकास म्हणू लागले: “हे कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहेत? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात!”

दोन भूतग्रस्तांना बरे करणे

सरोवराच्या पलीकडे गदरेकरांच्या5 देशात येशू आले, तेव्हा भुताने पछाडलेले दोन मनुष्य कबरस्तानातून धावत आले व त्यांना भेटले. ती माणसे इतकी हिंसक होती की त्या परिसरातून कोणालाही जाणे शक्य नव्हते. येशूंना पाहून ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “हे परमेश्वराच्या पुत्रा, तुम्हाला आमच्याशी काय काम? ठरलेल्या वेळेपूर्वीच तुम्ही आम्हाला छळण्यास आले आहे का?”

दूर अंतरावर डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. भुतांनी येशूंना विनंती केली, “तुम्ही आम्हाला हाकलून देणार असाल तर आम्हाला डुकरांमध्ये जाण्याची परवानगी द्या.”

येशू म्हणाले, “जा.” तत्काळ भुते बाहेर आली आणि डुकरांमध्ये शिरली व तो सर्व कळप डोंगराच्या कडेने धावत सुटला आणि सरोवराच्या पाण्यात बुडून मेला. डुकरांचे कळप राखणारे जवळच्या नगरात धावत गेले आणि त्यांनी ही बातमी सर्वांना सांगितली. भुतग्रस्तांच्या बाबतीत काय घडले हे त्यांनी लोकांना सांगितले. तेव्हा नगरातील सर्व लोक येशूंना भेटण्यास गेले आणि त्यांना भेटल्यावर, त्यांच्या भागातून निघून जावे अशी येशूंना विनंती केली.

Source notes (5)
  1. Footnote कुष्ठरोग कातडीच्या वेगवेगळ्या आजारासाठी हा शब्द वापरला जात असे
  2. Footnote शताधिपती अर्थात् शंभर सैनिकांचे नेतृत्व करणारा
  3. Footnote यश 53:4
  4. Footnote मानवपुत्र हे संबोधन येशूने स्वतःसाठी वापरले आहे
  5. Footnote गदरेकरांच्या किंवा गरसेकरांच्या

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.