Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
मत्तय 3
बाप्तिस्मा करणारा योहान मार्ग तयार करतो
त्याच दिवसात, बाप्तिस्मा करणारा योहान आला व यहूदीयाच्या अरण्यात गेला व लोकांना संदेश देऊ लागला, व म्हणाला, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” तो हाच आहे ज्याच्याबद्दल संदेष्टा यशायाह बोलला होता:
“अरण्यात घोषणा करणार्या एकाची वाणी झाली,
‘प्रभूसाठी मार्ग तयार करा,
त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.’ ”1
योहानाचा पोशाख उंटाच्या केसांपासून तयार केलेला आणि त्याच्या कंबरेला चामड्याचा पट्टा बांधलेला होता. त्याचे भोजन टोळ आणि रानमध होते. यरुशलेम, सर्व यहूदीया आणि यार्देन प्रांतातील प्रत्येक भागातून लोक त्यांच्याकडे आले. त्यांनी पापे कबूल केल्यानंतर यार्देन नदीमध्ये योहानाकडून त्यांचा बाप्तिस्मा केला जात असे.
परंतु पुष्कळ परूशी2 व सदूकी3 लोक त्यांच्याकडे बाप्तिस्मा घेण्याच्या विचाराने येऊ लागले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अहो सापांच्या पिलांनो, येणार्या क्रोधापासून पळून जाण्यास तुम्हाला कोणी सावध केले? जा, पश्चात्तापाला साजेल अशी फळे द्या. आमचा पिता तर अब्राहाम आहे असे आपल्या मनात म्हणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वर या दगडांपासून देखील अब्राहामासाठी संतती निर्माण करण्यास समर्थ आहे. कुर्हाड झाडांच्या मुळावर आधी ठेवलेली आहे, आणि प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल आणि अग्नीत टाकण्यात येईल.”
योहान म्हणाला, “पश्चात्तापासाठी मी तुमचा पाण्याने4 बाप्तिस्मा करतो, परंतु ज्यांची पादत्राणे वाहण्यासही माझी पात्रता नाही,5 जे माझ्यापेक्षा फार सामर्थ्यवान आहेत, असे दुसरे कोणीतरी येत आहे. ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करतील. खळे स्वच्छ करण्यास त्यांच्या हातात धान्य पाखडण्याचे सूप आहे, ते गहू कोठारात साठवतील आणि न विझणार्या अग्नीमध्ये भुसा जाळून टाकतील.”
येशूंचा बाप्तिस्मा
तेव्हा योहानाकडून बाप्तिस्मा घ्यावा यासाठी येशू गालील प्रांतामधून यार्देन नदीवर आले. पण योहान त्यांना नकार देत म्हणाला, “वास्तविक मीच तुमच्या हातून बाप्तिस्मा घेतला पाहिजे, मग तुम्ही माझ्याकडे बाप्तिस्मा घेण्यास का आलात?”
येशू त्याला म्हणाले, “आता असेच होऊ दे, कारण सर्व नीतिमत्व अशाप्रकारे पूर्ण करणे आपल्याला योग्य आहे.” तेव्हा योहानाने त्यांचा बाप्तिस्मा केला.
येशूंचा बाप्तिस्मा झाल्याबरोबर ते पाण्यातून वर आले. त्याक्षणीच स्वर्ग उघडला आणि त्यांनी परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा आपल्यावर उतरतांना आणि स्थिरावताना पाहिला; आणि स्वर्गातून वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र; त्याच्यावर मी संतुष्ट आहे.”
Source notes (5)
- Footnote यश 40:3
- Footnote परूशी अर्थात् कडक यहूदी, मोशेचे नियमशास्त्र पाळणारे
- Footnote सदूकी अर्थात् पुनरुत्थान व देवदूत यावर विश्वास ठेवीत नव्हते
- Footnote किंवा पाण्यात
- Footnote त्या काळात मालकाचे पादत्राण वाहण्याचे काम गुलामाचे होते मार्क 1:7
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.