Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

मार्क 7

जे विटाळविते

परूशी आणि यरुशलेम नगरातून आलेले नियमशास्त्राचे काही शिक्षक येशूंच्या भोवती गोळा झाले. येशूंचे काही शिष्य अशुद्ध हाताने, म्हणजे हात न धुताच जेवतात, असे त्यांनी पाहिले होते. परूशी आणि सर्व यहूदी लोक, वाडवडीलांच्या परंपरेस अनुसरून आपले हात विधिपूर्वक धुतल्याशिवाय कधीही जेवत नसत. ज्यावेळी ते बाजारातून घरी येत, त्या त्यावेळेस हात धुतल्याशिवाय ते जेवत नसत. भांडी, पातेली, ताटे वगैरे1 धुण्यासंबंधीच्या अनेक रूढी ते पाळीत असत.

या कारणामुळे परूशी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूंना विचारले, “तुमचे शिष्य आपल्या वाडवडीलांच्या परंपरे प्रमाणे का वागत नाहीत व ते आपले हात अशुद्ध असताना का जेवतात?”

त्यांनी उत्तर दिले, “यशायाह संदेष्ट्याने तुमच्या ढोंगीपणाचे अचूक वर्णन केले आहे; कारण असे लिहिलेले आहे:

“ ‘हे लोक त्यांच्या ओठांनी माझा सन्मान करतात,

पण त्यांची हृदये माझ्यापासून दूर आहेत.

माझी उपासना ते व्यर्थपणे करतात;

त्यांची शिकवण केवळ मानवी नियम2 आहेत.’

तुम्ही परमेश्वराने दिलेल्या आज्ञा टाळता आणि मनुष्याच्या परंपरेला चिटकून बसता.”

आणि पुढे ते म्हणाले, “तुमच्या रीती पाळण्यासाठी, परमेश्वराच्या आज्ञा टाळण्याचा सुलभ मार्ग तुम्हाला माहीत आहे! मोशे म्हणाला, ‘तुझ्या आईवडिलांचा मान राख,’3 आणि ‘जो कोणी आपल्या वडिलांना किंवा आईला शाप देतो तो मरणदंडास पात्र व्हावा.’4 परंतु तुम्ही म्हणता, जर कोणी असे घोषित करतो की, आईवडिलांना करत असलेली मदत, ही ‘परमेश्वराला समर्पित’ आहे ते अर्पण आहे— त्यामुळे तुम्ही त्यांना आईवडिलांसाठी काहीही करण्यास मनाई करता. या ज्या तुमच्या परंपरा पूर्वजांपासून चालत आलेल्या आहेत, त्यासाठी तुम्ही परमेश्वराचे वचन रद्द करता आणि अशा प्रकारच्या पुष्कळच गोष्टी तुम्ही करता.”

येशूने परत गर्दीतील लोकांना आपल्याकडे बोलाविले आणि म्हटले, “तुम्ही माझे ऐका आणि हे समजून घ्या. अशी कोणतीच गोष्ट नाही की जी बाहेरून मनुष्यामध्ये प्रवेश करून त्याला अशुद्ध करू शकेल. वास्तविक मनुष्यामधून जे बाहेर पडते, तेच त्याला अशुद्ध करते. ज्याला ऐकावयास कान आहेत, तो ऐको.”5

गर्दीतून निघून घरी गेल्यावर, शिष्यांनी त्यांना दाखल्याचा अर्थ विचारला. “तुम्ही इतके मतिमंद आहात काय?” त्यांनी विचारले, “जे काही मनुष्यामध्ये बाहेरून शिरते ते त्याला अशुद्ध करू शकत नाही, हे तुम्ही पाहू शकत नाही काय? ते त्यांच्या हृदयात जात नाही पण पोटात उतरते आणि नंतर शरीरातून बाहेर पडते.” या म्हणण्यावरून सर्व अन्न शुद्ध आहे, असे येशूंनी जाहीर केले.

ते पुढे म्हणाले, “मनुष्यामधून जे बाहेर पडते तेच मनुष्याला अशुद्ध करते. कारण आतून, मनुष्याच्या हृदयातून, दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, लैंगिक पापे, बदफैलीपणा, दुष्कृत्ये, फसवेगिरी, कामातुरपणा, मत्सर, निंदा, गर्विष्ठपणा आणि मूर्खपणा या सर्व अमंगळ गोष्टी आतून निघतात आणि मनुष्याला अशुद्ध करतात.”

येशू एका सुरफुनीकी स्त्रीच्या विश्वासाचा मान राखतात

नंतर येशूंनी ते स्थान सोडले आणि ते सोर आणि सीदोन6 या प्रांतात गेले. ते एका घरात गेले आणि हे कोणाला कळू नये अशी त्यांची इच्छा होती; परंतु त्यांची उपस्थिती लपून राहू शकली नाही. त्यांच्याविषयी ऐकताच, एक स्त्री जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्म्याने पछाडले होते, त्यांच्याकडे आली आणि त्यांच्या पाया पडली. आपल्या कन्येला दुरात्म्याच्या तावडीतून सोडवावे, अशी तिने त्यांच्याजवळ विनंती केली. ती स्त्री ग्रीक असून सुरफुनीकी प्रांतात जन्मली होती.

“प्रथम लेकरांना जेवढे पाहिजे तेवढे खाऊ द्या,” ते म्हणाले, “मुलांची भाकर काढून कुत्र्यांना घालणे बरोबर नाही.”

“प्रभू” तिने प्रत्युत्तर दिले, “मुलांच्या मेजाखाली जे तुकडे पडतात ते कुत्रेही खातात.”

येशूंनी उद्गार काढले, “या उत्तरामुळे तू जाऊ शकतेस; दुरात्म्याने तुझ्या मुलीला सोडले आहे.”

ती घरी आली त्यावेळी तिला तिची मुलगी बाजेवर झोपलेली आढळली आणि दुरात्मा तिच्यामधून निघून गेला होता.

येशू एका बहिर्‍या व मुक्या मनुष्याला बरे करतात

सोर सोडून येशू सीदोन प्रांतामधून गेले आणि तिथून दकापलीस7 रस्त्याने ते पुन्हा गालील समुद्राकडे आले. तिथे काही लोकांनी एका बहिर्‍या आणि बोबड्या अशा मनुष्याला त्यांच्याकडे आणले. येशूंनी त्याच्यावर हात ठेवून त्याला बरे करावे अशी लोकांनी येशूंना विनंती केली.

येशूंनी त्याला गर्दीतून बाजूला नेले. त्याच्या कानात त्यांनी बोटे घातली. नंतर ते थुंकले आणि त्या मनुष्याच्या जिभेला केला. मग स्वर्गाकडे दृष्टी लावून व एक निःश्वास सोडून ते म्हणाले, “इप्फाता” म्हणजे, “मोकळा हो” ताबडतोब त्या मनुष्याचे कान उघडले व त्याच्या जिभेचे बंधन मोकळे झाले आणि त्याला स्पष्ट बोलता येऊ लागले.

याविषयी कोणाला सांगू नका, असे येशूंनी निक्षून सांगितले. परंतु ते जसे सांगत गेले तशी ही बातमी अधिकच प्रसिद्ध होत गेली. लोक कमालीचे आश्चर्यचकित झाले होते. ते म्हणाले, “त्यांनी सर्वकाही उत्कृष्ट केले आहे. ते बहिर्‍यांना ऐकण्यास व मुक्यांना बोलावयास लावतात.”

Source notes (7)
  1. Footnote काही हस्तलिखितांमध्ये आणि जेवणाचे पलंग
  2. Footnote यश 29:13
  3. Footnote निर्ग 20:12; अनु 5:16
  4. Footnote निर्ग 21:17; लेवी 20:9
  5. Footnote हे वचन काही प्राचीन हस्तलिखितांमध्ये आढळत नाही
  6. Footnote पुष्कळ जुन्या प्रतींमध्ये सोर आणि सीदोन
  7. Footnote दहा गावे

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.