Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

मार्क 12

कुळांचा दाखला

मग येशू त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागले: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला. त्याच्याभोवती भिंत बांधली, द्राक्षारसासाठी कुंड खणले आणि संरक्षणासाठी एक बुरूजही बांधला. मग द्राक्षमळा काही शेतकर्‍यांना भाड्याने देऊन तो दुसर्‍या ठिकाणी राहवयास गेला. हंगामाचे दिवस आल्यावर द्राक्षमळ्यातील फळातून काही मिळावे म्हणून त्याने आपला एक सेवक शेतकर्‍यांकडे पाठविला. परंतु त्यांनी त्या सेवकाला धरले, मार दिला आणि रिकाम्या हाताने माघारी पाठविले. त्याने दुसरा सेवक त्याच्याकडे पाठविला; पण त्यांनी त्या माणसाच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्याला अपमानास्पद वागणूक दिली. त्यानंतर त्याने आणखी एकाला पाठविले, त्याला तर त्यांनी ठारच केले आणि त्यानंतर अनेकांना पाठविले, त्यातील काहींना त्यांनी चोप दिला व इतरांना जिवे मारले.

“आता त्याच्याजवळ पाठविण्यासाठी केवळ ज्याच्यावर त्याची प्रीती होती तो त्याचा पुत्र राहिला होता. त्याने त्याला सर्वात शेवटी पाठविले, व तो म्हणाला की, ‘ते माझ्या पुत्राचा तरी मान राखतील.’

“पण शेतकर्‍यांनी मालकाच्या पुत्राला येतांना पाहिले, तेव्हा ते म्हणाले, ‘हा तर वारस आहे. चला, आपण त्याला ठार करू या, म्हणजे हे वतन आपलेच होईल.’ त्याप्रमाणे त्यांनी त्याला धरले आणि त्याचा वध करून त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले.

“द्राक्षमळ्याचा धनी काय करेल असे तुम्हाला वाटते? तो येईल आणि त्या भाडेकर्‍यांना मारून टाकेल आणि द्राक्षमळा दुसर्‍यांना देईल. धर्मशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय:

“ ‘जो दगड बांधणार्‍यांनी नापसंत केला,

तोच कोनशिला झाला आहे;

प्रभूने हे केले आहे,

आणि आमच्या दृष्टीने ते अद्भुत आहे.’1”

प्रमुख याजक, नियमशास्त्र शिक्षक आणि वडील येशूंना अटक करण्याचा मार्ग शोधू लागले, कारण तो दाखला त्यांच्याविरुद्ध सांगितला होता हे त्यांनी ओळखले. पण त्यांना लोकांची भीती वाटत होती; मग ते त्यांना सोडून निघून गेले.

कैसराला कर देणे

काही काळानंतर येशूंना शब्दात पकडावे, या उद्देशाने काही परूशी व हेरोदियांना पाठविण्यात आले. ते त्याच्याकडे आले व म्हणाले, “गुरुजी, तुम्ही प्रामाणिक व्यक्ती आहात हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही कोणाचे समर्थन करीत नाही, कोणाची पर्वा न करता, भेदभाव न करता, ते कोण आहेत याकडे लक्ष देत नाही व खरेपणाने परमेश्वराचा मार्ग शिकविता; तर आम्हाला सांगा, कैसराला कर2 देणे योग्य आहे की नाही? आम्ही कर भरावा की नाही?”

परंतु येशूंनी त्यांचे ढोंग ओळखले व ते म्हणाले, “तुम्ही मला सापळ्यात का पाडू पाहता? एक दिनार आणा आणि मला दाखवा.” त्याप्रमाणे त्यांना एक नाणे दिले आणि त्यांनी विचारले, “या नाण्यावर कोणाचा मुखवटा आणि कोणाचा लेख आहे?”

“कैसराचा” त्यांनी उत्तर दिले.

तेव्हा प्रभू येशू म्हणाले, “जे कैसराचे आहे ते कैसराला द्या आणि जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.”

तेव्हा ते त्यांच्याविषयी आश्चर्यचकित झाले.

पुनरुत्थानासमयी विवाह

मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदूकी, आपला प्रश्न घेऊन त्यांच्याकडे आले. त्यांनी विचारले, “गुरुजी, मोशेने आपल्यासाठी असे लिहिले आहे की, एखादा मनुष्य मूलबाळ न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी विवाह करून त्याच्यासाठी संतती वाढवावी. आता, सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले परंतु संतती न होता तो मरण पावला. मग दुसर्‍या भावाने विधवेशी लग्न केले, पण तोही काही मूलबाळ न होताच मरण पावला. तिसर्‍याचेही तसेच झाले. ते सातही भाऊ मूलबाळ न होता मरण पावले. सर्वांच्या शेवटी ती स्त्री मरण पावली. आता पुनरुत्थान होईल त्यावेळी ती स्त्री कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी विवाह केला होता?”

येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही चुकत नाहीत काय, कारण ना तुम्ही धर्मशास्त्र जाणता, नाही परमेश्वराचे सामर्थ्य ओळखता? जेव्हा मृत लोक उठतील, ते विवाह करत नाही किंवा विवाह करूनही देत नाही; तर ते स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतील. पण आता मृतांच्या पुनरुत्थानासंबंधी, मोशेच्या पुस्तकात जळत्या झुडूपांच्या संदर्भात वाचले नाही काय? परमेश्वराने त्याला असे सांगितले, ‘मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा3 परमेश्वर आहे?’ ते मृतांचे नसून जिवंतांचे परमेश्वर आहेत, तुम्ही फार मोठी चूक करत आहात.”

सर्वश्रेष्ठ आज्ञा

कोणी एक नियमशास्त्र शिक्षक तिथे आला व त्याने त्यांचा वाद ऐकला. येशूंनी योग्य उत्तर दिले आहे, हे पाहून त्याने येशूंना विचारले, “सर्व आज्ञांपैकी महत्त्वाची कोणती आहे?”

येशूंनी उत्तर दिले, “सर्वात महत्त्वाची आज्ञा ही आहे: ‘हे इस्राएला ऐक: प्रभू आपले परमेश्वर एकच प्रभू आहेत. प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा.’4 दुसरी ही आहे: ‘जशी तुम्ही स्वतःवर5 तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.’ या आज्ञांपेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.”

“योग्य बोललात, गुरुजी” त्या मनुष्याने उत्तर दिले, “परमेश्वर ‘एकच आहेत आणि त्यांच्याशिवाय दुसरे परमेश्वर नाहीत’ हे आपण बरोबर सांगितले आहे. त्यांच्यावर पूर्ण अंतःकरणाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करणे, हे सर्व प्रकारची होमार्पणे व बली वाहण्यापेक्षा फारच महत्त्वाचे आहे.”

त्याने सुज्ञतेने उत्तर दिले आहे हे पाहून येशू त्याला म्हणाले, “तू परमेश्वराच्या राज्यापासून दूर नाहीस.” आणि तेव्हापासून कोणी त्यांना आणखी प्रश्न विचारावयास धजले नाहीत.

ख्रिस्त कोणाचा पुत्र?

नंतर मंदिराच्या आवारात लोकांना शिक्षण देतांना, येशूंनी त्यांना विचारले, “ख्रिस्त, हा दावीदाचा पुत्र आहे, असे तुमचे नियमशास्त्र शिक्षक का म्हणतात?” कारण दावीद स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हणतो,

“ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले,

“मी तुझ्या शत्रूंना,

तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत,

तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’6

स्वतः दावीद त्यांना ‘प्रभू’ असे म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असू शकेल?”

जमलेला मोठा जमाव येशूंचे भाषण मोठ्या आनंदाने ऐकत होता.

नियमशास्त्र शिक्षकासंबंधी इशारा

येशू शिकवीत होते, ते म्हणाले, “या नियमशास्त्राच्या शिक्षकांबाबत खबरदारी बाळगा! त्यांना लांब झगे घालून बाजारात लोकांकडून आदरपूर्वक अभिवादन घेणे, सभागृहामध्ये आणि मेजवान्यामध्ये उत्तम व मानाच्या जागा मिळविणे फार आवडते. ते देखाव्यासाठी लांबलचक प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात, अशा लोकांना अधिक शिक्षा होईल.”

विधवेचे दान

येशू दानपात्रासमोर बसले आणि समुदाय मंदिरातील दानपात्रामध्ये आपले दान कसे टाकतात हे लक्षपूर्वक पाहत होते. पुष्कळ धनवान लोकांनी पुष्कळ दान टाकले. मग एक गरीब विधवा आली आणि या गरीब विधवेला तांब्याची दोन छोटी नाणी टाकताना त्यांनी पाहिले, ज्याची किंमत फक्त एक पैसा होती.

ते पाहून येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावून सांगितले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, या गरीब विधवेने दान पात्रात इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या संपत्तीतून थोडेसे दिले, पण हिने तर आपल्या गरिबीतून सर्व देऊन टाकले—जी तिची उपजीविका होती.”

Source notes (6)
  1. Footnote स्तोत्र 118:22, 23
  2. Footnote विशेष कर जो प्रजेवर लादला जातो, पण रोमी नागरिकांवर नाही.
  3. Footnote निर्ग 3:6
  4. Footnote अनु 6:4, 5
  5. Footnote लेवी 19:18
  6. Footnote स्तोत्र 110:1

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.