Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

लूक 18

चिकाटी धरणार्‍या विधवेचा दाखला

नंतर येशूंनी आपल्या शिष्यांना सतत प्रार्थना करावी व ती ही चिकाटीने करावी यासाठी एक दाखला सांगितला. येशू म्हणाले, “एका शहरात परमेश्वराचे भय न बाळगणारा आणि कोणाची पर्वा न करणारा एक न्यायाधीश होता. त्या शहरातील एक विधवा आपली विनंती घेऊन वारंवार त्या न्यायाधीशाकडे येऊन म्हणत असे, ‘माझ्या शत्रूपासून मला न्याय द्या.’

“त्याने काही काळ लक्ष दिले नाही, परंतु शेवटी तो स्वतःशीच म्हणाला, ‘मी परमेश्वराला भीत नाही किंवा लोक काय म्हणतील याची काळजी करीत नाही, पण ही विधवा मला एकसारखी त्रास देत आहे. म्हणून तिला न्याय मिळाला पाहिजे, कारण ती सारखी येऊन मला त्रास करीत आहे!’ ”

नंतर प्रभू म्हणाले, “अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर परमेश्वराचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्यांना विनवण्या करतात, त्या लोकांना ते न्याय देणार नाहीत काय? ते त्यांच्यासंबंधी उशीर करतील काय? मी तुम्हाला सांगतो, ते त्यांना लवकर न्याय मिळेल याकडे लक्ष लावतील. यासाठी, जेव्हा मानवपुत्र परत येईल त्यावेळी त्यांना या पृथ्वीवर विश्वास आढळेल का?”

परूशी व जकातदार यांचा दाखला

आपण नीतिमान आहोत याचे समर्थन करून इतर सर्वांना तुच्छ मानत होते अशा लोकांसाठी त्यांनी हा दाखला सांगितला: “दोन माणसे प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेली. एक परूशी होता आणि दुसरा जकातदार. परूशी स्वतः उभा राहिला आणि प्रार्थना केली: ‘हे परमेश्वरा, मी तुमचे फार आभार मानतो, कारण मी इतर लोकांसारखा लुटारू, कुकर्मी, व्यभिचारी किंवा या जकातदारासारखा1 नाही. मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो, तसेच माझ्या मिळकतीचा दशांश देतो.’

“परंतु जकातदार दूर उभा राहिला. आपले डोळे वर आकाशाकडे न लावता आपल्या छातीवर मारून म्हणाला, ‘हे परमेश्वरा, मज पाप्यावर दया कर.’

“मी तुम्हाला सांगतो, हा मनुष्य, त्या दुसर्‍यापेक्षा परमेश्वरासमोर नीतिमान ठरून घरी गेला. कारण जे सर्व स्वतःला उच्च करतात त्यांना नम्र केले जाईल आणि जे स्वतःला नम्र करतात, त्यांना उंच केले जाईल.”

येशू लहान मुलांना आशीर्वाद देतात

लोकांनी आपल्या बालकांना येशूंनी त्यांच्यावर हात ठेवावे म्हणून त्यांच्याकडे आणले. परंतु शिष्यांनी त्यांना दटाविले. येशूंनी त्या बालकांना2 आपल्याजवळ बोलाविले आणि म्हणाले, “लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका, कारण परमेश्वराचे राज्य अशांचेच आहे. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, तुम्ही या लहान बालकासारखे होऊन परमेश्वराच्या राज्याचा स्वीकार करीत नाही, तोपर्यंत त्यात तुमचा प्रवेश होऊ शकणार नाही.”

एक श्रीमंत शासक

एका शासकाने येशूंना विचारले: “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळावे म्हणून मी काय करावे?”

येशूंनी उत्तर दिले, “तू मला उत्तम कशाला म्हणतोस? परमेश्वराशिवाय कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊक आहेत: ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको, तुझ्या आईवडिलांचा मान राख.’ ”3

तो म्हणाला, “मी लहान होतो, तेव्हापासूनच मी या सर्व आज्ञांचे पालन करीत आहे.”

जेव्हा येशूंनी हे ऐकले, ते त्याला म्हणाले, “पण तू एका गोष्टीत उणा आहेस. तुझे आहे ते सर्वकाही विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.”

जेव्हा त्याने हे बोलणे ऐकले, तेव्हा तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता. येशूंनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, “श्रीमंतांना परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे किती कठीण आहे! एखाद्या श्रीमंत मनुष्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.”

ज्यांनी हे बोलणे ऐकले, त्यांनी विचारले, “मग कोणाचे तारण होऊ शकेल?”

येशूंनी उत्तर दिले, “जे काही मानवाला अशक्य आहे, परंतु त्या सर्वगोष्टी परमेश्वराला शक्य आहेत.”

तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “आपणास अनुसरावे म्हणून आम्ही सर्वकाही सोडून दिले आहे!”

“मी तुम्हाला निश्चित सांगतो,” येशूंनी म्हटले, “असे कोणी नाही की ज्यांनी परमेश्वराच्या राज्यासाठी आपले घर, भाऊ बहीण, आई, पिता, पत्नी, मुले, यांचा त्याग केला, त्याला या जगात अनेक पटीने दिले जाईलच पण येणार्‍या युगात सार्वकालिक जीवनही लाभेल.”

येशू तिसर्‍यावेळी आपल्या मृत्यूचे भविष्य करतात

येशूंनी त्यांच्या बारा शिष्यांना बाजूला बोलावून घेतले आणि त्यांना सांगितले, “आपण यरुशलेमात जात आहोत आणि संदेष्ट्यांनी मानवपुत्रासंबंधी, म्हणजे माझ्याबद्दल, जे सर्वकाही लिहून ठेवलेले आहे ते पूर्ण होईल. त्याला गैरयहूदीयांच्या हाती सोपवून देण्यात येईल. ते त्याची थट्टा करतील, त्याचा अपमान करतील आणि त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील आणि त्याचा जीव घेतील परंतु तीन दिवसानंतर तो पुन्हा उठेल.”

त्यातील शिष्यांना काहीही समजले नाही. ते त्यांना आकलन होऊ नये म्हणून त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते. येशू काय बोलत आहेत हे त्यांना माहीत नव्हते.

येशू आंधळ्यांना दृष्टी देतात

येशू यरीहो शहराजवळ आले, तेव्हा एक आंधळा भिकारी, रस्त्याच्या कडेला भीक मागत बसला होता. जवळून जात असलेल्या गर्दीचा आवाज त्याने ऐकला, तेव्हा त्याने विचारले काय चालले आहे. त्यांनी त्याला सांगितले, “नासरेथकर येशू रस्त्याने जात आहेत.”

तो मोठ्याने ओरडला, “अहो येशू, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.”

येशूंच्या पुढे चाललेल्या गर्दीतील लोकांनी त्याला धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, पण तो उलट अधिक मोठमोठ्याने ओरडतच राहिला, “अहो दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.”

येशू थांबले आणि त्या मनुष्याला त्यांच्याकडे आणण्यास सांगितले. जेव्हा तो आंधळा जवळ आला, येशूंनी त्याला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?”

“प्रभू मला दृष्टी यावी.” त्याने उत्तर दिले.

यावर येशू म्हणाले, “ठीक आहे, तुला दृष्टी दिली आहे. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” त्याच क्षणाला त्याला दिसू लागले आणि परमेश्वराची स्तुती करीत तो येशूंच्या मागे चालू लागला. जेव्हा सर्व लोकांनी हे पाहिले, त्यांनी सुद्धा परमेश्वराची स्तुती केली.

Source notes (3)
  1. Footnote जकातदार अर्थात् रोमी सरकारसाठी जकातावर काम करणारे
  2. Footnote बालकांना लहान मुलांची अंतःकरणे जशी असतात तशी अंतःकरणे झाल्याशिवाय परमेश्वराच्या राज्यात प्रवेश होणारच नाही
  3. Footnote निर्ग 20:12‑16; अनु 5:16‑20

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.