Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

लूक 13

पश्चात्ताप करा किंवा नाश पावा

त्या सुमारास तिथे जे हजर होते, त्यांनी असे वृत्त येशूंना सांगितले की, गालील येथील रहिवाशांचे रक्त पिलाताने त्यांच्या बलिदानांमध्ये मिश्रित केले होते. येशूंनी उत्तर दिले, “गालीलातील लोक इतर लोकांपेक्षा अधिक पापी होते म्हणून त्यांनी दुःख सोसले असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो, तसे मुळीच नाही. जर तुम्हीही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा नाश होईल. किंवा शिलोआमाचा बुरूज जेव्हा त्या अठरा लोकांवर पडला आणि ते मरण पावले, तर तुम्हाला असे वाटते काय की, यरुशलेममध्ये राहणार्‍या सर्वांपेक्षा ते अधिक दोषी होते? नाही, मुळीच नाही! परंतु तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुमचाही नाश होईल.”

नंतर त्यांनी हा दाखला सांगितला: “एका मनुष्याच्या बागेमध्ये अंजिराचे झाड वाढत होते, आणि तो फळ पाहावयास गेला पण त्याला काही सापडले नाही. जो मळ्याची काळजी घेत होता त्यास म्हणाला, ‘तीन वर्षापासून मी या अंजिराच्या झाडावर फळ शोधायला येत आहे आणि मला काहीच मिळाले नाही. ते उपटून टाक! या जागेचा व्यर्थ उपयोग का बरे?’

“त्यावर माळी धन्याला म्हणाला, ‘आणखी एक वर्ष राहू द्या, मी त्याच्याभोवती खोदून खतपाणी घालेन. पुढील वर्षी फळ आले तर ठीक! नाही मिळाले तर उपटून टाका.’ ”

शब्बाथ दिवशी येशू एका अपंग स्त्रीस बरे करतात

एकदा शब्बाथ दिवशी येशू एका सभागृहामध्ये शिक्षण देत होते, तिथे एका स्त्रीला दुरात्म्याने अठरा वर्षे अपंग करून ठेवले होते. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूंनी तिला आपल्याजवळ बोलाविले, आणि ते तिला म्हणाले, “बाई, तू तुझ्या विकारापासून मुक्त झाली आहेस.” त्यांनी तिला स्पर्श केला आणि तत्काळ तिला सरळ उभे राहता आले. तेव्हा ती परमेश्वराची स्तुती करू लागली.

येशूंनी शब्बाथ दिवशी बरे केले हे पाहून सभागृहाचा प्रमुख खूपच संतप्त झाला व लोकांना म्हणाला, “काम करण्यासाठी सहा दिवस आहेत; त्या दिवसातच आजारातून बरे होण्यासाठी येत जा; शब्बाथ दिवशी नाही.”

प्रभूने त्यांना उत्तर दिले, “ढोंग्यांनो! तुमच्यातील कोणी शब्बाथ दिवशी आपल्या बैलाला किंवा गाढवाला गोठ्यातून बाहेर पाणी पाजण्यास नेत नाहीत काय? ही स्त्री अब्राहामाच्या वंशातील1 कन्या आहे, तिला सैतानाने अठरा वर्षे कैद करून बंधनात जखडून ठेवले होते, शब्बाथ दिवशी तिला बंधमुक्त करणे योग्य नाही का?”

येशूंचे हे उद्गार ऐकून त्याचे सर्व विरोधक लज्जित झाले, पण लोक मात्र ते करीत असलेल्या अद्भुत कृत्यांमुळे हर्षभरित झाले.

मोहरीच्या दाण्याचा व खमिराचा दाखला

नंतर येशूंनी विचारले, “परमेश्वराचे राज्य कशाप्रकारचे आहे? त्याची तुलना मी कशाशी करू? एका मनुष्याने आपल्या बागेत पेरलेल्या मोहरीच्या दाण्यासारखे आहे. ते वाढून मोठे झाड होते आणि त्याच्या फांद्यांमध्ये आकाशातील पक्षी विसावा घेतात.”

पुन्हा येशूंनी विचारले, “परमेश्वराच्या राज्याची तुलना मी कशाबरोबर करू? ते खमिरासारखे आहे, एका स्त्रीने ते घेतले आणि तीन माप2 पिठात तोपर्यंत एकत्र केले की त्यामुळे सर्व पीठ चांगले फुगले.”

अरुंद प्रवेशद्वार

नंतर येशू शहरातून आणि गावातून शिक्षण देत यरुशलेमकडे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी कोणीतरी त्यांना विचारले, “प्रभूजी, फक्त थोड्याच लोकांना तारण प्राप्त होणार का?”

येशू त्यांना म्हणाले, “अरुंद द्वाराने प्रवेश करण्याचा प्रयत्न करा, पुष्कळजण आत जाण्याचा प्रयत्न करतील, पण आत जाऊ शकणार नाहीत. एकदा जर घर प्रमुखाने दार लावून घेतले, तर तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत व विनंती करून म्हणाल, ‘महाराज, आम्हासाठी दार उघडा.’

“तो तुम्हाला उत्तर देईल, ‘मी तुम्हाला ओळखीत नाही किंवा तुम्ही कुठून आला हे मला माहीत नाही.’

“पण तुम्ही म्हणाल, ‘आम्ही तुमच्याबरोबर खाणेपिणे केले, आणि तुम्ही आमच्या रस्त्यावर शिक्षण दिले.’

“त्यावर तो तुम्हाला उत्तर देईल, ‘मी तुम्हाला ओळखीत नाही व तुम्ही कुठले आहात हे मला माहीत नाही. तुम्ही सर्व अन्याय करणार्‍यांनो माझ्यापासून दूर निघून जा!’

“अब्राहाम, इसहाक, याकोब आणि सर्व संदेष्टे परमेश्वराच्या राज्यात असलेले पाहाल पण स्वतःला मात्र बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तुमच्यामध्ये रडणे आणि दातखाणे असेल. पूर्व आणि पश्चिमेकडून, उत्तर व दक्षिणेकडून लोक येतील, आणि परमेश्वराच्या राज्याच्या मेजवानीत सामील होऊन आपआपल्या जागा घेतील. खरोखर, जे शेवटचे ते पहिले आणि जे पहिले ते शेवटचे होतील.”

येशूंचा यरुशलेमसाठी शोक

काही परूशी येशूंकडे येऊन त्यांना म्हणाले, “आपण येथून निघून जा, कारण हेरोद राजा आपणास जिवे मारावयास पाहत आहे.”

येशूंनी उत्तर दिले, “त्या कोल्ह्याला जाऊन सांगा, की ‘मी आज व उद्या भुते काढीत आणि रोग बरे करीत राहीन आणि तिसर्‍या दिवशी माझा उद्देश पूर्ण करेन.’ काही झाले तरी मला आज, उद्या आणि परवा प्रवास केलाच पाहिजे कारण संदेष्ट्यांची हत्या यरुशलेमच्या बाहेर होणे शक्य नाही.

“हे यरुशलेम, यरुशलेम! संदेष्ट्यांना ठार मारणारे आणि तुझ्याकडे पाठविलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या लेकरांना एकवटण्याची माझी कितीतरी इच्छा होती. पण तुमची नव्हती. आणि पाहा! आताच तुझे घर ओसाड पडले आहे. मी तुला सांगतो की, ‘प्रभूच्या नावाने3 येणारे धन्यवादित असो’ असे तू म्हणेपर्यंत मी तुझ्या दृष्टीस पडणार नाही.”

Source notes (3)
  1. Footnote वंशातील म्हणजे अब्राहामाच्या वंशातील कन्या, इस्राएल जातीचे यहूदी
  2. Footnote अंदाजे 27 कि.ग्रॅ.
  3. Footnote स्तोत्र 118:26

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.