Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

विलापगीत 5

हे याहवेह, आम्हाला काय झाले आहे यांचे स्मरण करा;

आमच्या अपमानाकडे लक्ष द्या.

आमचे वतन अपरिचितांना देण्यात आले आहे,

आमची घरे परकियांनी दिली आहेत.

आम्ही पितृहीन झालो आहोत,

आमच्या माता विधवा झाल्या आहेत.

पिण्याचे पाणीदेखील आम्हाला विकत घ्यावे लागते;

किंमत चुकविल्याशिवाय आम्हाला जळण मिळत नाही.

पाठलाग करणारे आमच्या अगदी जवळ येऊन पोचले आहेत.

आम्ही अत्यंत थकलो आहोत व आम्हाला आराम असा नाहीच.

पुरेशी भाकरी मिळण्याकरिता

आम्ही इजिप्तला आणि अश्शूरला स्वतःचे समर्पण केले आहे.

आमच्या पूर्वजांनी पाप केले व ते आता हयात नाहीत.

आणि आम्ही त्यांची शिक्षा भोगत आहोत.

गुलाम आता आमचे धनी झाले आहेत,

त्यांच्या हातातून आम्हाला सोडविणारा कोणीही नाही.

भाकरी मिळविण्यासाठी आम्हाला आमचा जीव धोक्यात घालावा लागतो,

कारण निर्जन प्रदेशात तलवारीने वध होऊ शकतो.

आमची त्वचा भट्टीप्रमाणे तप्त झाली आहे,

कारण भुकेमुळे आम्ही तापाळलेले आहोत.

स्त्रियांना सीयोनात भ्रष्ट करण्यात आले आहे,

व कुमारिकांना यहूदीयातील नगरात.

आमच्या अधिपतींना त्यांच्या हातांवर लटकविण्यात आले आहे;

आमच्या वडीलजनांचा मान राखला जात नाही.

तरुण गिरणीवर काबाडकष्ट करतात;

तर किशोर लाकडाच्या भारी ओझ्यांखाली डळमळतात.

वडीलजनांनी वेशीतील बैठकी सोडून दिल्या आहेत;

तरुणांनी त्यांचे संगीत बंद केले आहे.

आमच्या हृदयातील आनंद निघून गेला आहे;

आमच्या नृत्यांचे रूपांतर विलापात झाले आहे.

आमच्या मस्तकावरील मुकुट धुळीत पडला आहे.

धिक्कार असो आमचा, कारण आम्ही पाप केले आहे!

याकारणास्तव आमची अंतःकरणे खचली आहेत,

या सर्व गोष्टींमुळे आमचे डोळे निस्तेज झाले आहेत.

सीयोन पर्वत आता ओसाड झाला आहे,

तिथे आता लांडगे शिकारीसाठी संचार करतात.

हे याहवेह, तुमचे शासन सदासर्वकाळचे आहे;

तुमचे राजासन पिढ्यान् पिढ्या स्थिर आहे.

मग तुम्ही आम्हाला नेहमी का विसरता?

तुम्ही आमचा इतक्या दीर्घकालापर्यंत त्याग का केला?

याहवेह, तुम्ही आमचा स्वतःशी पुनः संबंध स्थापित करा,

म्हणजे आम्ही तुमच्याकडे परत येऊ;

पूर्वीच्या दिवसांसारखे आमच्या दिवसांना नवनिर्मित करा,

जर तुम्ही आमच्यावर मर्यादेपलिकडे क्रोधित झाला नसाल

आणि आमचा कायमचा त्याग केला नसेल तर.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.