Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

योहान 3

येशू निकदेमास शिक्षण देतात

आता निकदेम नावाचा एक परूशी, जो यहूदी प्रतिनिधीमंडळाचा सभासद होता, तो रात्री येशूंकडे आला व म्हणाला, “गुरुजी, आपण शिक्षक आहात व परमेश्वराकडून आलेले आहात, हे आम्हास माहीत आहे. कारण ही जी चिन्हे आपण करत आहात, ती परमेश्वर बरोबर असल्याशिवाय करता येणार नाही.”

त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो, नवीन जन्म1 झाल्याशिवाय कोणालाही परमेश्वराचे राज्य पाहता येणार नाही.”

तेव्हा निकदेमाने विचारले, “जे वृद्ध आहेत त्यांचा नव्याने जन्म कसा होऊ शकेल? त्यांना दुसर्‍या वेळी आपल्या मातेच्या उदरात जाऊन जन्म घेता येणे शक्य नाही!”

येशूंनी उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो, पाण्याने आणि पवित्र आत्म्याने जन्म झाल्याशिवाय कोणीही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही. शरीर शरीरालाच आणि आत्मा आत्म्याला जन्म देतो. ‘तुझा नवीन जन्म झाला पाहिजे,’ या माझ्या विधानाचे आश्चर्य मानण्याचे कारण नाही. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, परंतु तो कुठून आला व कुठे जाईल हे तुम्ही सांगू शकत नाही. तसेच जो प्रत्येकजण आत्म्यापासून जन्मतो त्यांच्या बाबतीत असेच आहे.”

तेव्हा निकदेमाने विचारले, “पण हे कसे होईल?”

“येशूंनी म्हटले, तुम्ही इस्राएलचे शिक्षक असूनही तुम्हाला या गोष्टी समजत नाही काय? मी तुम्हाला निश्चित सांगतो की जे आम्हास समजले आहे ते आम्ही बोलतो आणि आम्ही जे काही पाहिले आहे, त्याविषयी साक्ष देतो आणि तरीही तुम्ही लोक आमची साक्ष मान्य करीत नाही. मी पृथ्वीवरील गोष्टी तुम्हाला सांगितल्या तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही; तर मग स्वर्गीय गोष्टी तुम्हाला सांगितल्यास कसा विश्वास ठेवाल? स्वर्गातून आलेल्या मानवपुत्राशिवाय इतर कोणीही स्वर्गात गेला नाही.2 जसा मोशेने जंगलात साप उंच केला, त्याचप्रमाणे मानवपुत्रालाही उंच केले जाईल,3 जो कोणी त्याजवर विश्वास ठेवेल, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.”

कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. परमेश्वराने आपल्या पुत्राला या जगामध्ये, जगाला दोष लावण्यासाठी नव्हे तर, त्यांच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले आहे. जो त्यांच्यावर विश्वास ठेवतो तो दोषरहित ठरेल, परंतु जो विश्वास ठेवीत नाही तो दोषी ठरविण्यात आला आहे, कारण त्याने परमेश्वराच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवण्याचे नाकारले. निर्णय हाच आहे: प्रकाश या जगात आला आहे, परंतु लोकांनी प्रकाशाऐवजी अंधकाराची अधिक आवड धरली; कारण त्यांची कर्मे दुष्ट होती. दुष्कृत्ये करणारा प्रत्येकजण प्रकाशाचा द्वेष करतो आणि प्रकाशाकडे येत नाही, कारण आपली दुष्कृत्ये प्रकट होतील अशी त्याला भीती वाटते. परंतु जो सत्याने जीवन जगतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की जे काही त्यांनी केले ते परमेश्वराच्या दृष्टीने योग्य आहे, हे स्पष्ट दिसून यावे.

योहानाची येशूंविषयी साक्ष

त्यानंतर, येशू आणि त्यांचे शिष्य यहूदीया प्रांतात आले आणि तिथे थोडा वेळ त्यांच्याबरोबर घालविला आणि बाप्तिस्मे केले. आता योहान शालिमाजवळ असलेले एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता, कारण तिथे विपुल प्रमाणात पाणी असून, लोक बाप्तिस्मा घेण्यासाठी येत असत. त्या वेळेपर्यंत योहान तुरुंगात टाकला गेला नव्हता. कोणाएका यहूदी मनुष्याने योहानाच्या शिष्यांबरोबर शुद्धीकरणाच्या विधीबद्दल वादविवाद केला. तेव्हा शिष्य योहानाकडे आले आणि म्हणाले, “गुरुजी, यार्देन नदीच्या पलीकडे जो मनुष्य आपल्याबरोबर होता व ज्यांच्याबद्दल आपण साक्ष दिली, ते बाप्तिस्मा करीत आहेत आणि पाहा, प्रत्येकजण त्यांच्याकडे जात आहे.”

त्यावर योहानाने उत्तर दिले, “मनुष्याला जे काही स्वर्गातून दिले जाईल तेच प्राप्त होईल. ‘मी ख्रिस्त नव्हे, परंतु त्यांच्यापुढे मला पाठविण्यात आले आहे,’ असे मी म्हटले होते याचे साक्षी तुम्हीच आहात. वधू वराची असते. वराचा मित्र जवळ थांबून त्याचे भाषण ऐकतो, वराचा आवाज ऐकून त्याचा आनंद पूर्ण होतो, तो आनंद माझा आहे आणि आता तो परिपूर्ण झाला आहे. ते अधिक थोर होवो आणि मी लहान व्हावे.”

जो स्वर्गातून आलेला आहे तो इतर सर्वांपेक्षा थोर आहे. जो जगापासून आहे तो जगाचा आहे; व जगातील विषयांच्या बाबतीत बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांहून थोर आहे. त्यांनी जे पाहिले व ऐकले त्याविषयी ते साक्ष देतात, परंतु त्यांची साक्ष कोणीच मान्य करत नाही. जे कोणी त्यांची साक्ष स्वीकारतात, त्यांनी असे प्रमाणित केले की परमेश्वर सत्य आहे. ज्या कोणाला परमेश्वराने पाठविले, ते परमेश्वराची वचने बोलतात, कारण परमेश्वर विपुलतेचा आत्मा देतात. पिता पुत्रावर प्रीती करतात आणि त्याने प्रत्येक गोष्ट त्यांच्या हाती सोपविली आहे. जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन आहे; परंतु जो कोणी पुत्राला नाकारतो, तो जीवन पाहणार नाही, पण परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर राहील.

Source notes (3)
  1. Footnote किंवा वरून जन्मल्याशिवाय
  2. Footnote काही मूळ प्रतींमध्ये मनुष्य जो स्वर्गात आहे.
  3. Footnote किंवा गौरविले जाणे

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.