Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
योहान 18
येशूंना अटक
त्यांची प्रार्थना आटोपल्यावर, येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेले. दुसर्या बाजूला एक बाग होती, ते व त्यांचे शिष्य तिथे गेले.
आता यहूदा, ज्याने त्यांचा विश्वासघात केला, त्याला ही जागा माहीत होती, कारण येशू आपल्या शिष्यांना बर्याच वेळा तिथे भेटत होते. तेव्हा सैनिकांची एक तुकडी, महायाजक आणि परूश्यांकडील अधिकाऱ्यांना वाट दाखवित यहूदाह त्यांना बागेत घेऊन आला. त्यांच्याजवळ मशाली, कंदिले व हत्यारे होती.
येशू, जे सर्व आपल्यासोबत घडणार होते ते पूर्णपणे जाणून होते, त्यांनी बाहेर जाऊन त्यांना विचारले, “तुम्हाला कोण हवे आहे?”
त्यावर त्यांनी उत्तर दिले, “नासरेथकर येशू.”
तेव्हा येशू म्हणाले, “तो मी आहे,” आणि विश्वासघात करणारा यहूदाही त्यांच्याबरोबर तिथे उभा होता. जेव्हा येशूने म्हटले, “मी तो आहे,” तेव्हा ते मागे सरकून भूमीवर पडले.
त्यांना पुन्हा विचारले, “तुम्हाला कोण हवे आहे?”
त्यांनी म्हटले, “नासरेथकर येशू.”
येशू म्हणाले, “तो मी आहे असे मी तुम्हाला सांगितले आहेच, आणि जर तुम्ही मला शोधत आहात, तर या माणसांना जाऊ द्यावे. जे तुम्ही मला दिले आहेत त्यातून मी एकही हरविला नाही,”1 हे शब्द त्यांनी सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
तेव्हा शिमोन पेत्राजवळ तरवार होती, ती तरवार उपसून त्याने महायाजकाच्या दासावर वार केला व त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते.
येशूंनी पेत्रास आज्ञा केली, “तुझी तलवार म्यानात घाल! पित्याने मला दिलेल्या प्याल्यातून मी पिऊ नये काय?”
मग यहूदी अधिकार्यांनी, सैनिकांनी व त्यांच्या सेनापतींनी येशूंना अटक केली. त्यांना बंदी बनविले. प्रथम त्यांनी येशूंना त्या वर्षाचा महायाजक कयफाचा सासरा हन्नाकडे नेले. याच कयफाने यहूदी पुढार्यांसोबत अशी मसलत केली होती की, लोकांसाठी एका मनुष्याने मरावे हे हिताचे आहे.
पेत्राचा प्रथम नकार
शिमोन पेत्र आणि आणखी एक शिष्य येशूंच्या मागे आले. कारण हा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा असल्यामुळे, त्याने येशूंबरोबर महायाजकाच्या अंगणात प्रवेश केला. परंतु पेत्राला बाहेर दाराजवळ थांबावे लागले. तो दुसरा शिष्य, ज्याला मुख्य याजकाची ओळख होती, तो परत आला व दारावर राखण ठेवणार्या दासीशी बोलला व त्यांनी पेत्राला आत आणले.
मग त्या दासीने पेत्राला विचारले, “तू खात्रीने या माणसाच्या शिष्यांपैकी एक नाहीस ना?”
त्याने उत्तर दिले, “मी नाही.”
थंडी पडल्यामुळे शिपाई व वाड्यातील दास ऊब मिळावी म्हणून शेकोटी पेटवून त्याच्याभोवती शेकत उभे राहिले. पेत्रसुद्धा त्यांच्याबरोबर शेकत उभा राहिला.
महायाजकाकडून येशूंची चौकशी
दरम्यान, महायाजकाने येशूंना त्यांच्या शिष्यांविषयी आणि त्यांचे शिक्षण त्याविषयी प्रश्न विचारले.
येशूने त्याला उत्तर दिले, “मी जगापुढे उघडपणे बोलतो, कारण मी सभागृहांमध्ये व मंदिरात जिथे सर्व यहूदी एकत्रित येतात तिथे नियमितपणे शिक्षण दिले आहे. मी गुप्तपणे काहीही बोललो नाही. मला का विचारता? ज्यांनी माझे ऐकले त्यांना विचारा. मी काय बोललो ते त्यांना माहीतच असेल.”
येशूने असे म्हटल्यावर, जवळ असणार्या अधिकार्यांपैकी एकाने येशूंच्या तोंडावर चापट मारली व “अशा रीतीने तू महायाजकाला उत्तर देतो काय?” त्याने दरडावून मागणी केली.
येशूने उत्तर दिले, “मी जर काही चुकीचे बोललो असेल तर तसे सिद्ध करा. परंतु मी सत्य बोललो असेन, तर तुम्ही मला का मारले?” मग हन्नाने येशूंना बांधलेल्या अवस्थेतच महायाजक कयफा याजकडे पाठविले.
पेत्राचा दुसरा व तिसरा नकार
दरम्यान, इकडे शिमोन पेत्र अजूनही शेकोटीजवळ शेकत उभा असताना त्यांनी त्याला विचारले, “तू खरोखर त्यांच्या शिष्यांपैकीच एक नाहीस का आहेस ना?”
पेत्र नाकारून म्हणाला, “मी तो नाही.”
परंतु ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता, त्याचा एक नातलग, महायाजकाच्या दासांपैकी एक होता. त्याने पेत्राला विचारले, “मी तुला येशूंबरोबर बागेत पाहिले नाही का?” पेत्राने पुन्हा नकार दिला आणि तेवढ्यात कोंबडा आरवला.
पिलातापुढे येशू
मग यहूदी पुढार्यांनी येशूंना कयफाकडून रोमी राज्यपालाच्या राजवाड्यात नेले. तोपर्यंत पहाट झाली होती आणि आपण नियमशास्त्रानुसार अशुद्ध होऊ नये आणि आपल्याला वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः राजवाड्यात गेले नाहीत. तेव्हा पिलात त्यांच्याकडे बाहेर आला आणि त्याने त्यांना विचारले, “या मनुष्याविरुद्ध तुमचे काय आरोप आहेत?”
पिलाताला उलट निरोप देत ते म्हणाले, “तो गुन्हेगार नसता तर आम्ही त्याला तुमच्या स्वाधीन केलेच नसते!”
पिलात त्यांना म्हणाला, “त्याला घेऊन जा आणि तुमच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.”
ते विरोध करून म्हणाले, “मृत्युदंड देण्याचा अधिकार आम्हाला नाही.” आपण कोणत्या प्रकारे मरणार असे जे येशूंनी सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले.
मग पिलात राजवाड्यामध्ये परतला आणि त्याने येशूंना आपल्यापुढे बोलावून विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”
“ही तुमची स्वतःची कल्पना आहे की, इतरजण माझ्याबद्दल तुमच्याजवळ असे बोलले?” येशूंनी विचारले.
तेव्हा प्रत्युत्तर करीत पिलात म्हणाला, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी आणि मुख्य याजकांनीच तुला माझ्या स्वाधीन केले नाही का? तू काय केले?”
मग येशूंनी उत्तर दिले, “माझे राज्य या जगाचे नाही. जर असते तर, यहूदी पुढार्यांनी मला अटक करू नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु आता माझे राज्य दुसर्या ठिकाणचे आहे.”
यावरून पिलात त्याला म्हणाला, “मग तू राजा आहेस!”
येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता मी राजा आहे. खरेतर सत्याची साक्ष देण्यासाठीच माझा जन्म झाला व मी या जगात आलो. जे सत्याच्या बाजूचे आहेत, ते माझे ऐकतात.”
पिलाताने उलट विचारले, “सत्य काय आहे?” मग तो पुन्हा यहूदी जिथे जमले होते तिथे बाहेर गेला व त्यांना म्हणाला, “त्याच्यावर आरोप करण्यासाठी मला कसलाही आधार सापडत नाही. परंतु वल्हांडण सणाच्या निमित्ताने मी तुमच्यासाठी एका कैद्याला सोडावे अशी तुमची रीत आहे. तर मी या ‘यहूद्यांच्या राजाला’ सोडावे अशी तुमची इच्छा आहे का?”
ते ओरडले, “नाही, त्याला नको! आम्हाला बरब्बा हवा आहे!” बरब्बाने तर बंडात भाग घेतला होता.
Source notes (1)
- Footnote योहा 6:39
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.