Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
योहान 16
“तुम्ही बहकविले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सर्व सांगितले आहे. कारण ते तुम्हाला सभागृहामधून काढून टाकतील आणि खरोखर, अशी वेळ येत आहे की, जे कोणी तुम्हाला जिवे मारतील त्यांना आपण परमेश्वराला सेवेचा यज्ञ अर्पण करीत आहोत असे वाटेल. ते अशा गोष्टी करतील कारण त्यांनी कधीही पित्याला किंवा मला ओळखले नाही. मी तुम्हाला हे सांगत आहे, ते यासाठी की जेव्हा ते घडेल, तेव्हा तुम्हाला आठवेल की मी आधी तुम्हाला त्यासंबंधी इशारा दिला होता. मी या गोष्टी यापूर्वी तुम्हाला सांगितल्या नाहीत, कारण मी प्रत्यक्ष तुम्हाबरोबर होतो, परंतु आता ज्यांनी मला पाठविले त्यांच्याकडे मी परत जात आहे. तरी तुम्हापैकी कोणीही, ‘आपण कुठे जाता?’ असे विचारीत नाही खरे सांगावयाचे तर, मी या गोष्टी सांगितल्या आहेत म्हणून तुमची हृदये दुःखाने भरून गेलेली आहेत. परंतु खरी गोष्ट सांगतो की, माझे जाणे हे तुमच्या हितासाठीच आहे. मी जर गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही; पण मी जर गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवेन. जेव्हा तो येईल, तेव्हा पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी व न्यायनिवाड्या विषयी जग कशी चूक करत आहे हे तो सिद्ध करेल. पापाविषयी, कारण जगातले लोक मजवर विश्वास ठेवीत नाहीत; नीतिमत्त्वाविषयी, कारण मी पित्याकडे जात आहे आणि तुम्ही मला यापुढे पाहणार नाही; न्यायनिवाड्या विषयी, कारण या जगाच्या अधिपतीला दोषी ठरविण्यात आले आहे.
“मला तुम्हाला बरेच काही सांगावयाचे आहे, पण आता ते तुमच्याने ग्रहण होणार नाही. परंतु जेव्हा तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्गदर्शन करून पूर्ण सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे काहीही सांगणार नाही; तर त्याने जे काही ऐकले आहे, तेच तुम्हाला सांगेल. तो तुम्हाला जे काही घडणार आहे ते सांगेल. कारण तो माझ्यापासून आहे, म्हणून माझे गौरव करेल आणि माझ्यापासून जे त्याला मिळेल ते तो तुम्हाला प्रकट करेल. पित्याचे जे सर्व आहे ते माझे आहे. यासाठी मी म्हणालो की आत्मा जे माझ्याकडून स्वीकारेल ते तो तुम्हाला प्रकट करेल.”
शिष्यांच्या दुःखाचे आनंदात रूपांतर होईल
येशू वारंवार म्हणत होते, “थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही, परंतु त्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही मला पुन्हा पाहाल.”
यावरून, त्यांचे काही शिष्य एकमेकास विचारू लागले, “मी पित्याकडे जातो म्हणून थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल याचा अर्थ काय?” तेव्हा ते विचारू लागले, “थोड्या वेळाने, असे जे येशू म्हणत आहेत, हे आम्हास समजत नाही.”
त्यांना याविषयी काही विचारायचे आहे हे ओळखून येशूंनी त्यांना म्हटले, “मी तुम्हाला जे सांगितले होते, त्याबद्दल तुम्ही एकमेकांना विचारत आहात काय की ‘थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.’ मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जग आनंद करेल पण तुम्ही रडाल व शोक कराल. तुम्ही दुःख कराल परंतु तुमच्या दुःखाचे रूपांतर आनंदात होईल. जी स्त्री बाळाला जन्म देते तिला वेदना होतात कारण तिची वेळ आलेली असते; परंतु जेव्हा तिचे बाळ जन्मास येते तेव्हा ती तिच्या बाळाला या जगात जन्मलेले पाहून आनंद करते व सर्व यातना विसरून जाते. त्याच प्रकारे आता दुःख करण्याची तुमची वेळ आहे, परंतु मी तुम्हाला पुन्हा भेटेन तेव्हा तुमचे हृदय आनंदी होईल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही. त्या दिवशी तुम्ही माझ्याजवळ काही मागणार नाही. मी तुम्हाला खरोखर सांगतो की, तुम्ही जे काही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते तो तुम्हाला देईल. आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही. माझ्या नावाने मागा म्हणजे मिळेल आणि तुमचा आनंद पूर्ण होईल.
“जरी मी अलंकारिक रीतीने बोलत आहे, तरी अशी वेळ येईल की मी तुम्हाबरोबर अशा भाषेमध्ये आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हाला स्पष्टरीतीने सांगेन. त्या दिवसात तुम्ही माझ्या नावाने मागाल. मी असे म्हणत नाही की मी तुमच्यावतीने पित्याजवळ मागेन. नाही, पिता स्वतःही तुमच्यावर प्रीती करतात, कारण तुम्ही मजवर प्रीती केली व मी परमेश्वरापासून आलो आहे असा विश्वास ठेवला. मी पित्यापासून आलो आणि या जगात प्रवेश केला आणि मी हे जग सोडून पित्याकडे परत जात आहे.”
तेव्हा येशूंचे शिष्य म्हणाले, “पाहा, आता तुम्ही स्पष्ट बोलत आहात, अलंकारिक भाषेत काही सांगत नाही. आता आम्हास कळले की, तुम्हाला सर्वगोष्टी ठाऊक आहेत, म्हणून कोणासही आपणास प्रश्न विचारण्याची गरज नाही. यावरून आपण परमेश्वरापासून आला आहात असा आम्ही विश्वास ठेवतो.”
येशूंनी उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास ठेवता काय? अशी वेळ येत आहे आणि आलीच आहे की तुमची पांगापांग होईल व तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या घरी परत जाल. तुम्ही मला एकटे सोडाल, तरीसुद्धा मी एकटा नसेन, कारण माझे पिता मजबरोबर आहेत.
“मी या सर्वगोष्टी तुम्हाला सांगितल्या, ते यासाठी की माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी. या जगात तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. परंतु धीर धरा! कारण मी जगावर विजय मिळविला आहे.”
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.