Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
इय्योब 36
एलीहू पुढे म्हणाला:
“अजून थोडा वेळ माझ्याशी धीर धरून राहा आणि मी तुला दाखवेन
की परमेश्वराच्या बाजूने मला आणखी पुष्कळ बोलायचे आहे.
माझे ज्ञान मला फार दुरून मिळते;
माझ्या निर्माणकर्त्याचे न्यायीपण मी वर्णन करून सांगेन.
ही खात्री करून घे की माझे शब्द खोटे नाहीत;
ज्याच्याकडे परिपूर्ण ज्ञान आहे तो तुझ्याबरोबर आहे.
“परमेश्वर सामर्थ्यवान आहे, परंतु कोणाचा तिरस्कार करीत नाही;
ते बलवान असून त्यांच्या योजनांमध्ये स्थिर आहेत.
दुष्टांना ते जिवंत ठेवत नाही
परंतु पीडितांना त्यांचे हक्क देतात.
न्यायी मनुष्यावरून त्यांची नजर सरकत नाही;
राजांबरोबर त्यांना ते राजासनावर बसवितात
आणि सर्वकाळासाठी त्यांना थोर बनवितात.
परंतु जर लोक साखळ्यांनी बांधलेले आहेत,
आणि दुःखाच्या दोरखंडात जखडलेले आहेत,
त्यांनी काय केले आहे हे परमेश्वर त्यांना सांगतात—
त्यांनी गर्विष्ठपणात पाप केले आहे.
ते त्यांना सुधारणा ऐकून घेण्यास भाग पाडतात
आणि त्यांनी केलेल्या पापांसाठी पश्चात्ताप करण्याची आज्ञा करतात.
जर त्यांनी आज्ञा पाळल्या आणि परमेश्वराची सेवा केली,
तर त्यांच्या आयुष्याचे बाकीचे दिवस ते समृद्धीत घालवतील
आणि संतृप्तीची वर्षे बघतील.
परंतु जर ते ऐकणार नाहीत,
तर तलवारीने ते नाश होतील
आणि ज्ञाना अभावी मरण पावतील.
“देवहीन हृदयाचे लोक संताप साठवून ठेवतात;
त्यांना बेड्या बांधल्या, तरी ते मदतीसाठी रडत नाही.
त्यांच्या भर तारुण्यातच
मंदिरांना जीवन समर्पित असलेल्या पुरुषगामींसह1 ते मरण पावतात.
परंतु जे क्लेश सहन करतात त्यांना परमेश्वर क्लेशातून मुक्त करतात;
त्यांच्या दुःखात ते त्यांच्याशी बोलतात.
“दुःखाच्या जाभाड्यातून ते तुला निमंत्रण देतात
आणि विशाल व मर्यादा नसलेल्या ठिकाणी,
तुझ्या आरामदायी मेजावर मिष्टान्नांनी परमेश्वर तुला तृप्त करतात.
परंतु आता दुष्टांमुळे तुझ्यावर दंड लादला आहे;
शिक्षा आणि न्याय यांनी तुझी पकड घेतली आहे.
सावध राहा की कोणीही आपल्या श्रीमंतीने तुला भुरळ पाडू नये;
आणि मोठी लाच देऊन तुला कोणी भटकू देऊ नये.
तुझी श्रीमंती किंवा तुझे शक्तिशाली प्रयत्न
संकटात पडण्यापासून तुला उचलून धरतील काय?
लोकांना त्यांच्या घरातून ओढून दूर नेण्यासाठी,
रात्रीच्या समयाची इच्छा करू नकोस.
दुष्टतेकडे तू वळणार नाहीस याची काळजी घे,
कारण असेच दिसते की तू कष्टापेक्षा दुष्टतेची निवड करतोस.
“परमेश्वर त्यांच्या सामर्थ्यात उंचावलेले आहेत.
त्यांच्यासारखा दुसरा शिक्षक कोण आहे?
त्यांचे मार्ग त्यांच्यासाठी कोणी विदित केले आहेत,
किंवा, ‘तुम्ही दुष्कृत्य केले आहे’ असे त्यांना कोण म्हणणार?
ज्या कृत्यांबद्दल लोकांनी गीते गाऊन स्तुती केली,
ती त्यांची कृत्ये आठवून त्यांची प्रशंसा कर.
सर्व मानवजातीने हे पाहिले आहे;
मनुष्य दुरूनच त्याच्याकडे टक लावून पाहतात.
परमेश्वर किती महान आहे—ते समजणे आमच्या बुद्धीपलीकडे आहे!
त्यांच्या आयुष्याच्या संख्येचे आकलन करता येत नाही.
“ते पाण्याचे थेंब वर आकर्षून घेतात,
आणि झर्यासाठी त्याचे रूपांतर पावसात करतात;
मेघ आपले दहिवर खाली ओततात
आणि मनुष्यांवर भरपूर वृष्टी होते.
ढगांना त्यांनी कसे पसरविले आहे,
आपल्या मंडपातून ते कसे गडगडाट करतात हे कोणाला समजते?
पाहा ते कशाप्रकारे आपल्या सभोवती वीज विखरून ठेवतात,
आणि समुद्राच्या खोलीला झाकून घेतात.
अशाप्रकारे परमेश्वर राष्ट्रांवर अधिकार2 करतात
आणि विपुलतेने अन्न पुरवितात.
चमकणार्या विजेला ते आपल्या हातात भरतात
आणि त्याच्या नेमाने तडाखा करण्यास आज्ञा करतात.
त्यांचा गडगडाट येणार्या वादळाची घोषणा करते;
पशूप्राण्यांना सुद्धा त्यांच्या येण्याचे पूर्वज्ञान होते.
Source notes (2)
- Footnote मूळ अर्थ मंदिरात लैंगिक व्यवसायात लावलेले
- Footnote किंवा पोषण
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.