Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

इय्योब 19

इय्योब

मग इय्योबाने उत्तर देत म्हटले:

“किती काळ तुम्ही मला त्रास देणार

आणि आपल्या शब्दांनी मला चिरडणार?

एवढ्यात दहा वेळा माझी निंदा करून;

निर्लज्या सारखा तुम्ही माझ्यावर हल्ला केला.

मी जर खरोखरच चुकलो असेन,

तरी त्यासाठी मी स्वतः जबाबदार असणार.

जर स्वतःला तुम्ही खरच माझ्यापेक्षा थोर समजता

आणि माझ्या या दैनावस्थेचा माझ्याविरुद्ध गैरउपयोग करता,

तर ही गोष्ट लक्षात घ्या, की ही स्थिती परमेश्वराने माझ्यावर आणली आहे

आणि आपल्या जाळ्यात मला वेढले आहे.

“मी जरी ‘जुलूम!’ असे म्हणून ओरडतो, परंतु मला प्रतिसाद मिळत नाही;

साहाय्यासाठी मी बोलावितो, परंतु मला न्याय मिळत नाही.

मी पार जाऊ नये म्हणून परमेश्वराने माझी वाट अडविली आहे;

त्यांनी माझे मार्ग अंधाराने झाकून टाकले आहेत.

माझा सन्मान त्यांनी माझ्यापासून हिरावून घेतला आहे

आणि माझ्या मस्तकावरील मुकुट काढून घेतला आहे.

माझा सर्वनाश होईपर्यंत त्यांनी मला चहूकडून तोडले आहे;

झाडाप्रमाणे त्यांनी माझी आशा उपटून टाकली आहे.

त्यांचा क्रोध माझ्याविरुद्ध भडकला आहे;

आपल्या शत्रूंमध्ये त्यांनी मला गणले आहे.

त्यांची फौज जोमाने पुढे जात आहे;

त्यांनी माझ्याविरुद्ध युद्ध रचले आहे

आणि माझ्या डेर्‍या सभोवती वेढा घातला आहे.

“माझे बंधुजन त्यांनी माझ्यापासून दूर केले आहेत;

माझे परिचित मला अगदी परके झाले आहेत.

माझे नातलग माझ्यापासून दूर गेले आहेत;

माझ्या जिवलग मित्रांना माझा विसर पडला आहे.

माझे पाहुणे आणि माझ्या सेविका सुद्धा मला परके मानतात;

अनोळखी माणसाप्रमाणे ते माझ्याकडे बघतात.

मी माझ्या सेवकाला आज्ञा करतो,

आणि माझ्या मुखाने त्याला विनवणी करतो, परंतु तो उत्तर देत नाही.

माझ्या पत्नीसाठी माझा श्वास किळसवाणा झाला आहे;

माझ्या परिवारासाठी मी घृणास्पद असा आहे.

लहान मुलेदेखील माझी निंदा करतात;

मी दिसलो तरी ते माझा अपमान करतात.

माझ्या जिवलग मित्रांनादेखील माझा वीट येतो;

ज्यांच्यावर मी प्रीती केली, तेही माझ्यावर उलटले.

मी आता फक्त हाडे व कातडी असा उरलो आहे;

आणि मृत्यूच्या संकटातून थोडक्यात निभावून गेलो आहे.1

“माझ्यावर दया करा, माझ्या मित्रांनो, माझ्यावर दया करा,

कारण परमेश्वराच्या हाताने माझ्यावर प्रहार केला आहे.

परमेश्वराने करावा असा तुम्हीही माझा छळ का करता?

माझ्या वेदना पाहून तुमचे समाधान झाले नाही काय?

“अहा, माझ्या शब्दांची नोंद करण्यात आली असती,

ते एका चर्मपत्राच्या गुंडाळीत लिहून ठेवले असते,

लोखंडी कलमाने ते शिसावर,

किंवा कायम स्‍वरुपाने खडकावर कोरले असते तर किती बरे होते!

मला ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे,

आणि अखेरीस ते पृथ्वीवर उभे राहील;

आणि हे शरीर कुजून गेल्यानंतरही,

आपल्या देहाशिवाय2 मी परमेश्वराला पाहीन;

होय, मी स्वतः त्यांना पाहीन

दुसरा कोणी नाही; तर मी स्वतःच्या डोळ्यांनी मी त्यांना पाहीन.

त्यासाठी माझ्या हृदयात मी किती उतावळा झालो आहे!

“आणि आता जर तुम्ही असा विचार केला की, ‘आम्ही कसे त्याला नीच करू,

कारण समस्येचे मूळ तर त्याच्यामध्येच आहे,’

तुम्ही स्वतः तलवारी विषयी भय धरावे;

कारण क्रोधाची शिक्षा तलवारीने येणार,

आणि मग न्याय अस्तित्वात आहे हे तुम्हाला समजेल.3”

Source notes (3)
  1. Footnote किंवा केवळ हिरड्या बाकी आहेत
  2. Footnote देहाशिवाय इतर मूळ प्रतींमध्ये देहामध्ये
  3. Footnote किंवा तुला सर्वसमर्थाची ओळख होईल

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.