Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

याकोब 1

परमेश्वराचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याजकडून,

राष्ट्रांमध्ये पांगलेल्या बारा वंशाना,

शुभेच्छा.

कसोटी आणि मोह

माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, जेव्हा तुम्ही अनेक प्रकारच्या परीक्षांना तोंड देता तेव्हा त्यात अत्यानंद माना. कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची जी परीक्षा होते त्यामुळे धीर उत्पन्न होतो. धीराला कार्य पूर्ण करू द्या यासाठी की तुम्ही परिपक्व आणि पूर्ण व्हावे व तुम्हाला कशाचीही कमतरता भासू नये. जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल, तर तुम्ही परमेश्वराला मागा आणि ते तुम्हास दिले जाईल, कारण ते कोणाचेही दोष न काढता सर्वांस उदारतेने देतात. परंतु जेव्हा तुम्ही मागता, तेव्हा संशय न बाळगता विश्वासाने मागावे, कारण जो संशय धरतो तो वार्‍याने लोटलेल्या व हेलकावे खाणार्‍या समुद्राच्या लाटेसारखा आहे. अशा व्यक्तीने आपल्याला प्रभूपासून काही मिळेल अशी आशा अजिबात धरू नये. असा मनुष्य दुहेरी मनाचा असून ज्या सर्वगोष्टी तो करतो त्यात अस्थिर असतो.

दीन परिस्थितीतील विश्वासू जणांनी आपल्या उच्च पदाबद्दल अभिमान बाळगावा. परंतु जे श्रीमंत आहेत त्यांनी आपल्या दीन अवस्थेबद्दल अभिमान बाळगावा; कारण ते रान फुलांसारखे नाहीसे होतील. जसा सूर्य प्रखर उष्णतेने उगवतो आणि रोप कोमेजून टाकतो; त्याचे फूल गळून पडते आणि त्याच्या सुदंरतेचा नाश होतो. त्याचप्रमाणे श्रीमंत ही आपला उद्योग करीत असतानाच कोमेजून जाईल.

जो कोणी व्यक्ती परीक्षेत धीर धरतो तो धन्य आहे, कारण परीक्षेत उतरल्यावर, प्रभूने आपल्यावर प्रीती करणार्‍यांना जो जीवनी मुकुट देण्याचे वचन दिले आहे, तो त्याला मिळेल.

मोह आल्यानंतर, “परमेश्वर मला मोहात टाकत आहे” असे कोणीही म्हणू नये. कारण परमेश्वराला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि ते स्वतः कोणाला मोहात पाडत नाहीत; परंतु प्रत्येक मनुष्य स्वतःच्याच दुष्ट वासनेने ओढला व भुलविला जाऊन मोहात पडतो. मग इच्छेने गर्भधारण केल्यानंतर, ती वासना पापाला जन्म देते; आणि पापाची पूर्ण वाढ झाली म्हणजे पाप मरणास जन्म देते.

म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो फसू नका. प्रत्येक उत्तम व परिपूर्ण दान वरून आहे, ते स्वर्गातील प्रकाशाचे पिता जे छायेसारखे बदलत नाहीत, त्यांच्यापासून येते. त्यांनी आपल्याला सत्य वचनाद्वारे जन्म देण्यासाठी निवडले आहे, यासाठी की त्यांनी जे सर्वकाही उत्पन्न केले त्यामधील आपण प्रथमफळ व्हावे.

ऐकणे आणि आचरणात आणणे

माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे लक्षात घ्या, प्रत्येकजण ऐकावयास शीघ्र, बोलावयास सावकाश व रागास मंद असावा. कारण मनुष्याच्या संतापाने परमेश्वर ज्या नीतिमत्वाची अपेक्षा करतो ते साध्य होत नाही. यास्तव, सर्व अनैतिक घाण व दुष्टतेचा त्याग करा व जे वचन तुम्हामध्ये पेरलेले आहे त्याचा नम्रतेने स्वीकार करा, ते वचन तुम्हाला तारावयास समर्थ आहे.

वचन केवळ ऐकून स्वतःची फसवणूक करू नका. वचन सांगते त्याप्रमाणे आचरण करा. कारण जो कोणी वचन ऐकतो, पण त्याप्रमाणे आचरण करत नाही, तो आरशात आपले मुख पाहणार्‍यासारखा आहे. तो स्वतःकडे पाहिल्यावर निघून जातो आणि आपण कसे दिसत होतो हे ताबडतोब विसरतो. परंतु जो कोणी स्वतंत्रतेच्या परिपूर्ण नियमांकडे लक्ष देतो आणि त्यामध्ये स्थिर राहतो, तो ऐकून विसरणारा न होता त्याप्रमाणे कृती करणारा होतो आणि तो जे काही करतो त्या गोष्टीत त्याला आशीर्वाद मिळतो.

जे स्वतःला भक्त समजतात परंतु आपल्या जिभेवर ताबा ठेवीत नाहीत, ते स्वतःलाच फसवितात व त्यांची भक्ती व्यर्थ आहे. परमेश्वर पित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्दोष भक्ती हीच आहे की अनाथ व विधवांची त्यांच्या दुःखात काळजी घेणे आणि जगाच्या मलिनतेपासून स्वतःला अलिप्त राखणे.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.