Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

यशायाह 32

नीतिमत्वाचे राज्य

पाहा, एक राजा धार्मिकतेने राज्य करेल

आणि राज्यकर्ते न्यायाने सत्ता चालवितील.

प्रत्येकजण वाऱ्यापासून आश्रयस्थान

आणि वादळापासून आश्रयस्थान,

वाळवंटामध्ये असलेल्या पाण्याच्या प्रवाहासारखा

आणि तहानलेल्या भूमीमध्ये मोठ्या खडकाच्या सावलीसारखा असेल.

तेव्हा पाहणाऱ्यांचे डोळे बंद राहणार नाहीत,

आणि ज्यांच्या कानांना ऐकू येते ते ऐकतील.

भीती बाळगणाऱ्या अंतःकरणाला माहीत होईल आणि ते समजून घेतील

आणि अडखळणारी जीभ अस्खलित आणि स्पष्ट अशी होईल.

यापुढे मूर्खांना चांगले

व बदमाशांना थोर म्हटले जाणार नाही.

मूर्ख लोक मूर्खपणाच्या गोष्टी करतात,

त्यांचे अंतःकरण वाईट कृत्य करण्यावरच केंद्रित असते:

ते देवहीनतेची कृत्ये करतात

आणि याहवेहविरुद्ध चुकीच्या गोष्टी पसरवितात;

भुकेल्यांना ते उपाशी सोडतात

आणि व तान्हेल्या जिवांना पाण्यापासून वंचित ठेवतात.

बदमाश माणसे दुष्ट पद्धतीचा वापर करतात,

गरजवंताची याचना वाजवी असली तरी,

ते दुष्टाईच्या योजना बनवितात,

ते लबाडीने गरिबांचा नाश करतात.

परंतु कुलीन मनुष्य कुलीनतेच्या योजना बनवितो

आणि कुलीनतेच्या कार्यावर स्थिर राहतो.

यरुशलेमच्या स्त्रिया

आळसात लोळत पडणार्‍या स्त्रियांनो,

उठा व माझे ऐका;

हे निश्चिंत असणाऱ्या कन्यांनो,

मी काय सांगतो याकडे लक्ष द्या!

एका वर्षाहून अधिक कालावधीत

तुम्हाला जे सुरक्षित वाटते ते थरथर कापतील;

कारण द्राक्षाचा उपज बुडेल,

आणि फळांचा हंगाम येणार नाही.

आत्मसंतुष्ट स्त्रियांनो, थरथर कापा;

निश्चिंत असलेल्या कन्यांनो, तुमचा थरकाप होऊ द्या!

आपली सुंदर वस्त्रे काढून

शोक करण्यासाठी गोणपाट गुंडाळा.

तुमचे ऊर बडवा, प्रसन्न करणार्‍या तुमच्या शेतांसाठी,

फलवंत द्राक्षवेलीसाठी

आणि माझ्या लोकांच्या भूमीसाठीही

कारण शेतात सर्वत्र काटेकुसळे व झुडपे वाढतील—

होय, आनंदोत्सव करणाऱ्या तुमच्या घरांसाठी,

व चैनबाजी करणार्‍या या शहरांसाठी विलाप करा.

गडाचा त्याग करण्यात येईल,

गजबजलेली शहरे रिकामी होतील;

किल्ले व टेहळणी बुरूज कायमची पडीक स्थाने होतील,

जिथे रानगाढवांचे व शेरडेमेंढरांचे कळप आनंदात चरतील,

परंतु जेव्हा उच्च स्थानावरून परमेश्वराचा आत्मा आपल्यावर ओतल्या जाईल,

ओसाड भूमी सुपीक होईल,

आणि सुपीक भूमी अरण्यासारखी वाटू लागेल.

याहवेहचा न्याय वाळवंटातही वास्तव्य करेल,

व त्यांची नीतिमत्ता सुपीक भूमीत नांदेल.

शांती नीतिमत्तेचे फळ असेल;

नीतिमत्तेचे कार्य तर सार्वकालिक शांतता आणि धैर्य आहे.

माझ्या लोकांची घरे शांतीने भरलेली

आणि सुरक्षित असतील,

त्यांची शांतिभंग न होता ते विश्रांती घेतील.

जरी गारांनी अरण्याचा नाश होईल

आणि सर्व शहरे जमीनदोस्त होतील.

तरी तुम्ही किती आशीर्वादित व्हाल,

प्रत्येक झऱ्याजवळ तुमचे बीज पेराल,

आणि तुमची गुरे आणि गाढवे मुक्तपणे चरतील.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.