Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

इब्री 10

ख्रिस्ताचा आत्मयज्ञ एकदाचा व अखेरचा

नियमशास्त्र ज्या येणार्‍या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची छाया आहे—त्याचे खरे स्वरूप नाही. या कारणासाठी ते प्रतिवर्षी नित्य अर्पण केल्या जाणार्‍या त्याच यज्ञांनी उपासनेसाठी येणार्‍यांना परिपूर्ण करण्यास केव्हाही समर्थ ठरत नाही. तसे झाले असते, तर एकच अर्पण पुरेसे नव्हते काय? उपासक कायमचे शुद्ध झाले असते तर त्यांची दोषाची भावना नाहीशी झाली असती. पण त्यांनी त्यांच्या पापांची प्रतिवर्षी त्यांना आठवण करून दिली. कारण बैलांचे व शेळ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे.

यास्तव, जेव्हा ख्रिस्त जगात आले तेव्हा ते म्हणाले,

“यज्ञ किंवा अर्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही,

परंतु तुम्ही माझ्यासाठी एक शरीर तयार केले;

होमार्पण व पापार्पण यांनी

तुम्हाला संतोष झाला नाही.

मग मी म्हणालो, ‘मी येथे आहे; शास्त्रलेखात माझ्याविषयी लिहिले आहे,

हे माझ्या परमेश्वरा तुमची इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.’ ”1

ते प्रथम म्हणाले, “बली आणि दाने, होमार्पणे आणि पापार्पणाची तुम्हाला इच्छा नाही व त्यात तुम्हाला संतोष नाही;” जरी ते नियमानुसार अर्पण करत होते. नंतर ते म्हणाले, “हा मी येथे आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” दुसरी व्यवस्था स्थापन करून त्यांनी पहिली व्यवस्था रद्द केली. आणि त्या इच्छेद्वारे आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह बलिदानाद्वारे पवित्र केलेले आहोत.

प्रत्येक याजक प्रतिदिवशी धार्मिक कामे करत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो. परंतु या याजकाने पापांसाठी सार्वकालिक असे एकच बली अर्पण करून ते परमेश्वराच्या उजव्या हाताशी बसले आहेत. आणि त्या वेळेपासून त्यांचे शत्रू त्यांचे पायासन होईपर्यंत वाट पाहत आहेत. कारण एकाच यज्ञामुळे ज्यांना ते पवित्र करीत आहे, त्या सर्वांना त्यांनी परिपूर्ण केले आहे.

याबाबत पवित्र आत्मा आपल्याला साक्ष देतो, प्रथम त्यांनी म्हटले:

“मी त्यांच्याबरोबर करार करेन तो असा,

प्रभू म्हणतात त्या वेळेनंतर,

मी माझे नियम त्यांच्या मनात ठेवेन

आणि ते मी त्यांच्या हृदयावर लिहेन.”2

मग पुढे ते म्हणतात,

“त्यांची पापे व नियमबाह्य कृत्ये

यापुढे मी स्मरणार नाही.”3

आणि जिथे क्षमा झालेली आहे, तिथे पापांसाठी आणखी यज्ञ करण्याची मुळीच गरज नाही.

धीराने विश्वासात टिकून राहण्यासाठी आवाहन

म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आता येशूंच्या रक्ताद्वारे आपल्याला परमपवित्रस्थानी आत्मविश्वासाने जाता येते. आपल्यासाठी हा नवा व जीवनदायी मार्ग पडद्याद्वारे म्हणजे त्यांच्या शरीराद्वारे उघडला आहे. आणि आपल्यासाठी परमेश्वराच्या घरावर एक महान याजक आहेत, म्हणून आपली हृदये शुद्ध करण्यासाठी शिंपडले, दोषी विवेकापासून मुक्त झालेले व शुद्ध पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्‍या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने परमेश्वराजवळ येऊ. आपण न डगमगता आपल्या आशेचा भरवसा दृढ धरू; कारण ज्यांनी वचन दिले ते विश्वसनीय आहेत. आणि प्रीती व चांगली कृत्ये करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांना प्रेरित करू या. आपण कित्येकांच्या सवयीप्रमाणे आपले एकत्रित मिळणे न सोडता एकमेकांना उत्तेजन द्यावे आणि तो दिवस जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते म्हणून तसे एकत्रित मिळून एकमेकांना अधिक उत्तेजन द्यावे.

सत्याचे ज्ञान झाल्यानंतर जर आपण जाणूनबुजून पाप करतो, तर त्या पापांसाठी दुसरे कोणतेही अर्पण राहिले नाही, पण राहिले ते भयावह न्यायाची प्रतीक्षा आणि परमेश्वराच्या शत्रूंना भस्मसात करून टाकणारी मोठी आगच. मोशेने दिलेले नियमशास्त्र एखाद्याने नाकारले तर त्याच्यावर दया न होता त्याला दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो. तर ज्याने परमेश्वराच्या पुत्राला पायाखाली तुडविले, शुद्ध करणारे साक्षीचे रक्त अपवित्र मानले, जेणेकरून ते स्वतः पवित्र झाले होते आणि कृपाशील पवित्र आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठोर शिक्षा होण्यास पात्र ठरेल म्हणून तुम्हाला वाटते? कारण “सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन,”4 आणि आणखी, “प्रभू त्यांच्या लोकांचा न्याय करतील,” असे जे म्हणाले, ते आपल्याला माहीत आहे. जिवंत परमेश्वराच्या हातात सापडणे फार भयंकर आहे.

जेव्हा तुम्हाला प्रथम प्रकाश मिळाला तेव्हा तुम्हाला भयंकर दुःखसहनाने भरलेला संघर्ष करावा लागला याची आठवण करा. कित्येकदा सार्वजनिक रीतीने तुमचा अपमान व छळ झाला; तर कधी अशाच गोष्टी सहन करणार्‍यांबरोबर तुम्ही जोडीने उभे राहिला. बंदिवानांबरोबर तुम्ही दुःख सोसले आणि अधिक चांगली व टिकाऊ मालमत्ता आपल्याजवळ आहे हे समजून तुम्ही स्वतःच्या मालमत्तेची जप्ती आनंदाने स्वीकारली. तुमचा विश्वास सोडू नका, त्याचे मोठे प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे.

तुम्ही परमेश्वराची इच्छा पूर्ण केल्यानंतर जे वचन त्यांनी तुम्हाला दिले आहे ते तुम्हास मिळेल यासाठी धीराचे अगत्य आहे. कारण,

“अगदी थोड्या वेळात,

जो येणार आहे तो येईल

आणि उशीर करणार नाही.”5

आणि,

“माझा नीतिमान विश्वासाने जगेल.

आणि माघार घेणार्‍यामध्ये

मला संतोष वाटणार नाही.”6

माघार घेणार्‍यातील आणि नाश होणार्‍यातील आपण नाही, परंतु ज्यांच्याजवळ विश्वास असून ज्यांना तारणप्राप्ती झाली आहे त्यांच्यात आपण सामील आहोत.

Source notes (6)
  1. Footnote स्तोत्र 40:6‑8
  2. Footnote यिर्म 31:33
  3. Footnote यिर्म 31:34
  4. Footnote अनु 32:36; स्तोत्र 135:14
  5. Footnote यश 26:20
  6. Footnote हब 2:4

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.