Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
उत्पत्ती 5
आदाम ते नोआह पर्यंत
ही आदामाची लिखित वंशावळी आहे.
जेव्हा परमेश्वराने मानवजातीला निर्माण केले, त्यांनी त्याला आपल्या प्रतिरूपात घडविले. परमेश्वराने त्यांना पुरुष व स्त्री असे निर्माण केले. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना “मानवजात”1 असे नाव दिले.
आदाम 130 वर्षाचा झाला तेव्हा त्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात, त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत एक मुलगा झाला; त्याने त्याचे नाव शेथ ठेवले. शेथच्या जन्मानंतर आदाम आणखी आठशे वर्षे जगला. याकाळात त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. आदाम एकंदर 930 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
शेथ 105 वर्षाचा झाला, तेव्हा त्याला अनोश झाला. अनोशचा पिता झाल्यावर शेथ 807 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. शेथ एकंदर 912 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
अनोश नव्वद वर्षाचा झाला तेव्हा त्याला केनान झाला. केनानचा पिता झाल्यावर अनोश 815 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. अनोश एकंदर 905 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
केनान सत्तर वर्षाचा झाला तेव्हा तो महलालेलाचा पिता झाला. महलालेलाचा पिता झाल्यावर केनान 840 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. केनान एकंदर 910 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
महलालेल 65 वर्षाचा झाला तेव्हा तो यारेदाचा पिता झाला. यारेदाचा पिता झाल्यावर महलालेल 830 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. महलालेल एकंदर 895 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
यारेद 162 वर्षाचा झाला तेव्हा तो हनोखाचा पिता झाला. हनोखाचा पिता झाल्यावर यारेद 800 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. यारेद एकंदर 962 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
हनोख 65 वर्षाचा झाला तेव्हा तो मथुशेलहाचा पिता झाला. मथुशेलहाचा पिता झाल्यावर हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे 300 वर्षे चालला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. हनोख एकंदर 365 वर्षे जगला. हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालत असताना तो अदृश्य झाला, कारण परमेश्वराने त्याला नेले.
मथुशेलह 187 वर्षाचा झाला तेव्हा तो लामेखाचा पिता झाला. लामेखाचा पिता झाल्यानंतर मथुशेलह 782 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. मथुशेलह एकंदर 969 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
लामेख 182 वर्षांचा झाल्यावर त्याला पुत्र झाला. त्याने त्याचे नाव नोआह2 असे ठेवले, कारण तो म्हणाला, “शाप दिलेली भूमी कसण्याच्या अवघड कामापासून याहवेह आम्हाला विसावा देतील.” नोआहच्या जन्मानंतर लामेख 595 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. लामेख एकंदर 777 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
नोआह 500 वर्षाचा झाला तेव्हा तो शेम, हाम व याफेथ यांचा पिता झाला.
Source notes (2)
- Footnote हिब्रूमध्ये आदाम
- Footnote किंवा नोआह अर्थात् दिलासा किंवा विसावा
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.