Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

उत्पत्ती 3

मानवाचे पतन

आता याहवेह परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व वन्यप्राण्यांमध्ये सर्प सर्वात धूर्त होता. त्याने स्त्रीला म्हटले, “बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तुम्ही खाऊ नये असे परमेश्वराने खरोखरच म्हटले आहे काय?”

स्त्री सर्पाला म्हणाली, “आम्हाला बागेतील झाडांची फळे खाण्याची मुभा आहे. पण परमेश्वर म्हणाले, ‘बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ खाऊ नका आणि त्याला स्पर्शही करू नका, असे केल्यास तू मरशील.’ ”

पण सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही निश्चितच मरणार नाही, कारण परमेश्वराला हे माहीत आहे की ज्या दिवशी ते फळ तुम्ही खाल, त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि चांगले व वाईट यातील फरक तुम्हाला समजेल आणि तुम्ही परमेश्वरासारखे व्हाल.”

जेव्हा स्त्रीने पाहिले की खाण्यास योग्य, दिसण्यास सुंदर आणि सुज्ञ करणारे ते झाड आहे, तेव्हा तिने त्याच्या फळातील काही तोडून घेतले आणि खाल्ले आणि आपला पती, जो तिच्यासोबत होता, त्यालाही दिले आणि त्याने ते खाल्ले. पण मग त्यांचे डोळे उघडले आणि आपण नग्न असल्याचे त्यांना समजले; नंतर त्यांनी स्वतःसाठी अंजिराच्या पानांची कटिवेष्टने केली.

सायंकाळी याहवेह परमेश्वर बागेतून फिरत असल्याचा आवाज त्यांनी ऐकला आणि आदाम व त्याची पत्नी, याहवेह परमेश्वरापासून बागेतील झाडामागे लपली. परंतु याहवेह परमेश्वराने आदामाला हाक मारून म्हटले, “तू कुठे आहेस?”

आदाम म्हणाला, “बागेत मी तुमचा आवाज ऐकला आणि मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो; त्यामुळे लपून बसलो.”

याहवेह म्हणाले, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?”

त्यावर आदाम म्हणाला, “जी स्त्री तुम्ही माझ्या सोबतीला दिली; तिने मला त्या झाडाची फळे दिली आणि मी ती खाल्ली.”

तेव्हा याहवेह परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाले, “तू हे काय केलेस?”

त्यावर ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ पाडली आणि मी ते फळ खाल्ले.”

याहवेह परमेश्वर सर्पाला म्हणाले, “कारण तू हे केलेस म्हणून,

“तू सर्व पाळीव प्राण्यांहून,

आणि सर्व वन्यपशूहून अधिक शापित आहेस!

तू तुझ्या पोटावर सरपटशील

आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस

माती खाशील.

तू आणि स्त्री,

तुझी संतती1 आणि तिची संतती यामध्ये

मी शत्रुत्व निर्माण करेन;

तिचे संतान तुझे मस्तक चिरडेल2

आणि तू त्याची टाच फोडशील.”

नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाले,

“तुझ्या प्रसूतिकाळात मी तुझे क्लेश अत्यंत वाढवेन;

वेदनांनी तू तुझ्या संतानास जन्म देशील,

तुझ्या पतीकडे तुझी ओढ राहील,

आणि तो तुजवर सत्ता गाजवील.”

नंतर ते आदामाला म्हणाले, “तू तुझ्या पत्नीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, ते खाल्लेस म्हणून आता,

“तुझ्यामुळे भूमी शापित झाली आहे;

तू तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस

अत्यंत क्लेशमय कष्ट करून तिचा उपज खाशील.

भूमी तुझ्यासाठी काटे आणि कुसळे उगवील,

आणि तू शेतातील पीक खाशील.

ज्यामधून तू घडविला गेलास

त्या मातीत परत जाऊन मिळेपर्यंत

तू घाम गाळून अन्न खाशील,

कारण तू माती आहेस

आणि तू मातीतच परत जाऊन मिळशील.”

आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा3 असे ठेवले, कारण ती सर्व सजिवांची माता होती.

याहवेह परमेश्वराने आदामासाठी आणि त्याच्या पत्नीसाठी चर्मवस्त्रे केली आणि त्यांना ती घातली. नंतर याहवेह परमेश्वर म्हणाले, “पाहा, मानव आपल्यापैकी एक आणि आपल्यासारखा झाला आहे; तो बरे आणि वाईट यातील फरक समजू लागला आहे. परंतु आता जीवनवृक्षाचे फळ त्याच्या हाती लागून त्याने ते तोडून खाऊ नये, कारण मग तो सदासर्वकाळ जिवंत राहील.” म्हणून याहवेह परमेश्वराने मनुष्याला ज्या भूमीतून निर्माण केले होते तिची मशागत करण्यासाठी त्या एदेन बागेतून घालवून दिले. अशा रीतीने त्यांनी मनुष्याला एदेन बागेच्या बाहेर घालवून दिले आणि जीवनवृक्षाकडे कोणीही जाऊ नये यासाठी एदेन बागेच्या पूर्वेस4 करूबीम आणि प्रत्येक दिशेकडे फिरणारी एक ज्वालामय तलवार ठेवली.

Source notes (4)
  1. Footnote किंवा बीज
  2. Footnote किंवा फोडेल
  3. Footnote संभावित अर्थ सजीव
  4. Footnote किंवा च्या समोर

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.