Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
उत्पत्ती 18
तीन पाहुणे
अब्राहाम मम्रेच्या महान एलावृक्षाजवळ राहत असताना, मध्यान्हाच्या उन्हात आपल्या तंबूच्या दारापुढे बसला होता, तेव्हा याहवेहने त्याला दर्शन दिले. अब्राहामाने आपली नजर वर करून पाहिले की तीन पुरुष जवळपास उभे आहेत, तो घाईने आपल्या तंबूच्या दाराकडून त्यांना भेटण्यास गेला व त्यांना भूमीपर्यंत लवून नमन केले.
तो त्यांना म्हणाला, “माझ्या स्वामी, माझ्यावर आपली कृपा झाली असल्यास, माझ्या घरी न येता पुढे जाऊ नका. मी थोडे पाणी आणतो आणि तुम्ही आपले पाय धुऊन या झाडाखाली विसावा घ्या. तुम्हाला ताजेपणा यावा म्हणून थोडे अन्नही आणतो मग तुम्ही पुढील प्रवासास निघा; तुम्ही तुमच्या या सेवकाकडे आला आहात.”
“ठीक आहे. तू म्हणतोस त्याप्रमाणे कर.” त्यांनी उत्तर दिले.
मग अब्राहाम धावत आपल्या तंबूत येऊन साराहला म्हणाला, “लवकर तीन सिआ1 सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.”
नंतर अब्राहाम आपल्या गुरांच्या कळपाकडे गेला, त्यातील एक कोवळे व उत्तम वासरू त्याने निवडले आणि ते लवकर बनवावे म्हणून एका नोकराकडे दिले. मग त्याने दूध, दही आणि वासराचे मांस घेतले, जे त्याने बनविले होते आणि ते त्यांच्यासमोर ठेवले; आणि ते जेवत असता तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिला.
त्यांनी विचारले, “तुझी पत्नी, साराह कुठे आहे?”
अब्राहामाने उत्तर दिले, “ती तंबूत आहे.”
मग त्यापैकी एकजण म्हणाला, “पुढील वर्षी मी तुझ्याकडे निश्चित वेळेत परत येईन, तेव्हा तुझी पत्नी साराहला एक पुत्र होईल.”
त्याच्यामागे, तंबूच्या दारातून साराह हे ऐकत होती. आता अब्राहाम व साराह दोघेही खूप वृद्ध झाली होती. साराहला मुले होण्याचा काळ केव्हाच निघून गेला होता; म्हणून साराह स्वतःशीच हसली व विचार करू लागली, “मी झिजून गेले आहे आणि माझा स्वामीही वृद्ध असताना, आता मला हा आनंद मिळेल काय?”
तेवढ्यात याहवेहने अब्राहामाला विचारले, “ ‘माझ्यासारख्या वृद्धेला खरेच मूल होईल काय?’ असे म्हणत साराह का हसली? याहवेहला कोणतीही गोष्ट असाध्य आहे काय? मी सांगितल्याप्रमाणे पुढील वर्षी निश्चित वेळेत परत येईल आणि साराहला एक पुत्र होईल.”
साराह घाबरली, म्हणून ती खोटे बोलत म्हणाली, “मी हसले नाही.”
परंतु ते म्हणाले, “होय, तू हसलीस.”
सदोम शहरासाठी अब्राहामाची मध्यस्थी
जेव्हा ते पुरुष पुढील प्रवासास जाण्यास उठले आणि त्यांनी खाली सदोमाच्या दिशेने पाहिले. अब्राहाम त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्याबरोबर थोडी वाट चालून गेला. मग याहवेह म्हणाले, “अब्राहामापासून मी माझा संकल्प गुप्त ठेवावा काय? कारण खात्रीने अब्राहाम एक महान व बलाढ्य राष्ट्र होईल आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित2 होतील. कारण मी त्याला निवडले आहे अशासाठी की त्याने त्याच्यानंतर त्याच्या लेकरांना व त्याच्या घराण्याला याहवेहच्या मार्गात जे योग्य व न्यायी आहे, त्यात चालवावे, त्यामुळे अब्राहामाला दिलेले अभिवचन याहवेह पूर्ण करतील.”
मग याहवेहने म्हटले, “सदोम आणि गमोरा विरुद्ध आक्रोश खूप वाढला आहे आणि त्यांचे पाप गंभीर आहे. मी खाली जाऊन बघेन, मग त्यांनी जे केले आहे ते माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आक्रोशाएवढे वाईट आहे की नाही हे मला समजेल.”
त्याच्याबरोबर असलेले पुरुष सदोमाच्या दिशेने गेले, पण अब्राहाम याहवेहपुढे उभा राहिला. अब्राहाम त्यांच्याजवळ गेला आणि विचारले: “तुम्ही दुष्टांबरोबर नीतिमानांचा सुद्धा नाश करणार काय? जर त्या शहरात पन्नास नीतिमान लोक आढळले तरी त्यांचा तुम्ही नाश करणार आणि त्यात असलेल्या नीतिमान लोकांसाठी तुम्ही त्यांची गय करणार नाही काय? ही गोष्ट तुमच्यापासून दूर असो—की तुम्ही दुष्टांच्या बरोबर नीतिमान लोकांनाही मारून टाकावे, नीतिमान आणि दुष्टांना सारखेच लेखावे हे तुमच्यापासून दूर असो! सर्व पृथ्वीचे न्यायाधीश, जे योग्य ते करणार नाहीत का?”
याहवेहने उत्तर दिले, “त्या सदोम शहरात मला जर पन्नास नीतिमान लोक आढळले, तर त्यांच्यासाठी मी त्या सर्व शहराची गय करेन.”
मग अब्राहाम पुन्हा म्हणाला, “मी धूळ आणि राख असून, मी प्रभूशी बोलण्याचे धैर्य केले आहे, जर नीतिमानांची संख्या पाच कमी पन्नास असली तर काय? पाच लोक कमी आहेत म्हणून तुम्ही त्या संपूर्ण शहराचा नाश करणार काय?”
याहवेहने उत्तर दिले “मला तिथे पंचेचाळीस भेटले, तरी मी त्याचा नाश करणार नाही.”
अब्राहाम पुन्हा याहवेहला म्हणाला, “तिथे फक्त चाळीस असले तर काय?”
याहवेहने उत्तर दिले, “त्या चाळिसांसाठी, मी नाश करणार नाही.”
मग तो म्हणाला, “प्रभूला राग येऊ नये, पण मला बोलू द्यावे. फक्त तीसच मिळाले तर?”
याहवेहने उत्तर दिले, “तिथे तीस सापडले, तरी मी नाश करणार नाही.”
मग अब्राहाम म्हणाला, “मी प्रभूशी बोलण्याचे खूप धैर्य केले आहे, तिथे जर वीसच नीतिमान लोक असले तर?”
त्यांनी म्हटले, “त्या विसांसाठी मी त्यांचा नाश करणार नाही.”
मग तो म्हणाला, “प्रभूला राग न येवो, पण मला एकदाच बोलू द्यावे. तिथे फक्त दहाच सापडले तर?”
याहवेहने उत्तर दिले, “त्या दहांच्यासाठी मी त्याचा नाश करणार नाही.”
जेव्हा याहवेहने अब्राहामाशी आपले बोलणे संपविले, ते निघून गेले आणि अब्राहाम घरी परतला.
Source notes (2)
- Footnote अंदाजे 16 कि.ग्रॅ.
- Footnote किंवा त्याचे नाव आशीर्वाद म्हणून वापरले जाईल
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.