Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

उत्पत्ती 11

बाबिलोन येथील बुरूज

त्याकाळी पृथ्वीवरील सर्व मानवांची एकच भाषा आणि एकच बोली होती. पुढे ते पूर्वेकडे जात असता, त्या लोकांना शिनार1 प्रांतात एक मैदान लागले आणि त्यांनी तिथे वस्ती केली.

ते एकमेकास म्हणाले, “चला आपण विटा तयार करून त्याला पक्क्या भाजू या.” त्याप्रमाणे त्यांनी दगडाऐवजी विटा तयार केल्या आणि चुना म्हणून डांबर वापरले. मग ते म्हणाले, “आपण स्वतःसाठी एक मोठे शहर आणि आकाशाला भिडणारा अतिउंच बुरूज बांधू म्हणजे आपण प्रसिद्ध होऊ; नाहीतर पृथ्वीतलावर आपली पांगापांग होईल.”

परंतु जेव्हा मानव बांधत असलेले शहर आणि बुरूज पाहण्यास याहवेह खाली आले, तेव्हा याहवेह म्हणाले, “हे सर्व एक असून त्यांची भाषा ही एकच आहे, जर ही योजना साध्य झाली तर मानवांना असाध्य असे काहीही राहणार नाही. चला, आपण खाली जाऊ आणि त्यांच्या भाषेत वेगवेगळ्या भाषांची सरमिसळ करू, म्हणजे त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.”

अशा रीतीने याहवेहने सर्व पृथ्वीभर मानवांची पांगापांग केली आणि त्यांचे शहर बांधण्याचे काम थांबले. म्हणून त्या शहराला बाबिलोन2 म्हणतात, कारण याहवेहने मानवांना गोंधळात पाडून अनेक भाषा दिल्या आणि सर्व पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली.

शेम ते अब्राम

शेमाची वंशावळी:

अर्पक्षद याचा जन्म जलप्रलयानंतर दोन वर्षांनी झाला, त्यावेळी शेम 100 वर्षांचा होता. अर्पक्षदाचा पिता झाल्यानंतर शेम आणखी 500 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

अर्पक्षद 35 वर्षांचा असताना तो शेलाहचा पिता झाला. शेलाहच्या जन्मानंतर अर्पक्षद आणखी 403 वर्षे जगला. त्या काळात त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

जेव्हा शेलाह 30 वर्षांचा झाला तेव्हा तो एबरचा पिता झाला. आणि एबरचा पिता झाल्यावर शेलाह आणखी 403 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

एबरचा पुत्र पेलेग जन्मला तेव्हा एबर 34 वर्षांचा होता. पेलेग जन्मल्यानंतर एबर 430 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

पेलेगचा पुत्र रऊ जन्मला तेव्हा पेलेग 30 वर्षांचा होता. रऊच्या जन्मानंतर पेलेग आणखी 209 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

रऊचा पुत्र सरूग जन्मला तेव्हा रऊ 32 वर्षांचा होता. सरूगच्या जन्मानंतर रऊ आणखी 207 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

सरूगचा पुत्र नाहोर जन्मला तेव्हा तो 30 वर्षांचा होता. नाहोरच्या जन्मानंतर सरूग आणखी 200 वर्षे जगला, आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

नाहोर 29 वर्षांचा होता तेव्हा त्याला तेरह झाला. तेरहचा पिता झाल्यावर नाहोर पुढे आणखी 119 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

तेरह 70 वर्षांचा होईपर्यंत त्याला अब्राम, नाहोर व हारान हे तीन पुत्र झाले.

अब्रामाचे गोत्र

तेरहाच्या वंशजाचा तपशील:

तेरहास अब्राम, नाहोर व हारान हे पुत्र होते. हारानाला लोट नावाचा पुत्र झाला. पण हारान त्याच्या पिता तेरह जिवंत असताना, आपल्या जन्मस्थानी, खाल्डियनांच्या ऊर गावी मरण पावला. अब्राम व नाहोर यांनी विवाह केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय होते व नाहोराच्या पत्नीचे नाव मिल्का होते; मिल्का ही हारानाची कन्या होती आणि हारान हा मिल्का व इस्काह यांचा पिता होता. सारायला मूलबाळ नव्हते कारण ती वांझ होती.

मग आपला पुत्र अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा पुत्र लोट आणि आपली सून साराय, यांना बरोबर घेऊन कनान देशात जाण्यासाठी तेरहाने खाल्डियनांचे ऊर गाव सोडले; पण कनान देशात जाण्याऐवजी ते हारान शहरीच स्थायिक झाले.

तेरहाचे वय 205 वर्षांचे होऊन, हारान येथे तो मरण पावला.

Source notes (2)
  1. Footnote किंवा बाबिलोन
  2. Footnote किंवा बाबिलोन अर्थात् गोंधळ

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.