Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

यहेज्केल 41

नंतर त्या मनुष्याने मला मुख्य दिवाणखान्यात आणले आणि तेथील स्तंभ मापले; प्रत्येक बाजूंनी त्या खांबांची रुंदी सहा हात1 होती. प्रवेशद्वार दहा हात2 रुंद होते आणि भिंतींची रुंदी प्रत्येक बाजूने पाच हात3 होती. त्याने मुख्य दिवाणखाना देखील मापला; तो चाळीस हात लांब आणि वीस हात रुंद4 होता.

मग तो आतील पवित्रस्थानात गेला आणि प्रवेशद्वाराच्या खांबांचे माप घेतले; प्रत्येक खांब दोन हात5 रुंद होते. प्रवेशद्वार सहा हात रुंद होते आणि भिंतींची रुंदी प्रत्येक बाजूने सात हात6 होती. आणि त्याने आतील पवित्रस्थानाची लांबी मापली; ती वीस हात होती आणि मुख्य दिवाणखान्याच्या शेवटपर्यंत त्याची रुंदी वीस हात होती. तो मला म्हणाला, “हे परमपवित्रस्थान आहे.”

नंतर त्याने मंदिराच्या भिंतीचे माप घेतले; ती सहा हात जाड होती आणि मंदिराच्या सभोवती असलेल्या खोल्या प्रत्येकी चार हात रुंद होत्या.7 बाजूला असलेल्या खोल्या एकावर एक अशा तीन मजल्यांवर होत्या, प्रत्येक मजल्यावर तीस खोल्या होत्या. बाजूला असलेल्या खोल्यांना आधार असावा म्हणून मंदिराच्या सभोवती असलेल्या भिंतींना फळ्या होत्या, ज्या मंदिराच्या भिंतीमधून टाकल्या गेल्या नव्हत्या. मंदिराच्या बाजूस असलेल्या खोल्या प्रत्येक मजल्यावर रुंद होत गेल्या. मंदिराच्या सभोवती असलेली इमारत चढत्या रचनेत बांधली होती, म्हणजे प्रत्येक मजल्यावरील खोल्या त्याच्या खालच्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा रुंद होत्या. सर्वात खालच्या मजल्यापासून मधल्या मजल्यालगत जाऊन, सर्वात वरच्या मजल्यापर्यंत पायर्‍या होत्या.

मी पाहिले की मंदिराला सभोवार उंच केलेला एक आधार होता, जो बाजूच्या खोल्यांसाठी पाया होता. तो मापन-दंडाच्या लांबीचा म्हणजेच सहा हात लांब होता. बाजूच्या खोल्यांची बाहेरील भिंत पाच हात जाड होती. मंदिराच्या बाजूच्या खोल्या आणि याजकांच्या खोल्यामधील मोकळ्या जागेचे माप मंदिराच्या सभोवती वीस हात रुंद होते. त्या मोकळ्या जागेकडून खोल्यांसाठी प्रवेशद्वार होते, एक उत्तरेकडे तर दुसरे दक्षिणेकडे; आणि मोकळ्या जागेलगत सभोवार असलेला आधार पाच हात रुंद होता.

मंदिराच्या अंगणासमोरील पश्चिमेकडील इमारत सत्तर हात8 रुंद होती. सभोवार त्या इमारतीची भिंत पाच हात जाड होती आणि त्याची लांबी नव्वद हात9 होती.

त्यानंतर त्याने मंदिराचे माप घेतले; ते शंभर हात10 लांब होते आणि मंदिराचे अंगण व त्याच्या भिंतीसह इमारतीची लांबी देखील शंभर हात होती. मंदिराच्या समोरच्या बाजूसह, पूर्वेच्या बाजूने मंदिराची रुंदी शंभर हात होती.

नंतर त्याने मंदिराच्या मागच्या बाजूच्या समोरच्या इमारतीची लांबी मापली, ती तिच्या दोन्ही बाजूंच्या सज्ज्यांसह शंभर हात होती.

मुख्य दिवाणखाना, आतील पवित्रस्थान आणि अंगणासमोरील देवडी, त्याचप्रमाणे उंबरठे आणि अरुंद खिडक्या आणि त्या सभोवार असलेले तीनही सज्जे; उंबरठा व त्याच्या पलीकडील सर्वकाही लाकडाने आच्छादले होते—जमीन, खिडक्यापर्यंतच्या भिंती आणि खिडक्या झाकलेल्या होत्या. आतील पवित्रस्थानाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील वरचा भाग आणि आतील व बाहेरील पवित्रस्थानाच्या सभोवारच्या भिंतीवर टप्या टप्याने करूब व खजुरीची झाडे कोरली होती. एका खजुरीच्या झाडानंतर एक करूब कोरले होते. प्रत्येक करुबाला दोन मुखे होती: एका खजुरीच्या झाडाकडून मनुष्याचे मुख तर दुसर्‍या खजुरीच्या झाडाकडून सिंहाचे मुख, मंदिरात चोहीकडे ते कोरलेले होते. मुख्य दिवाणखान्याच्या भिंतींवर जमिनीपासून प्रवेशद्वाराच्या वरच्या भागापर्यंत करूब आणि खजुरीची झाडे कोरली होती.

मुख्य दिवाणखान्याला चौरस द्वारपट्टी होती आणि ती परमपवित्रस्थानाच्या द्वारपट्टीसारखीच होती. तिथे एक लाकडी वेदी होती ती तीन हात11 उंच आणि दोन हात लांब होती, तिचे कोपरे, तिची बैठक आणि तिच्या बाजू लाकडाच्या होत्या. तो मनुष्य मला म्हणाला, “हा तोच मेज आहे जो याहवेहसमोर असतो.” मुख्य दिवाणखाना आणि परमपवित्रस्थानाला दुहेरी दरवाजे होते. प्रत्येक द्वाराला दोन झडपा होत्या; प्रत्येक द्वाराला बिजागरी लावलेल्या दोन झडपा होत्या. मुख्य दिवाणखान्याच्या द्वारावर त्यासारखीच करूब व खजुरीची झाडे कोरलेली होती आणि देवडीसमोर लाकडाच्या लोंबत्या तुळया होत्या. देवडीच्या बाजूच्या भिंतींवर अरुंद खिडक्या होत्या, ज्यावर प्रत्येक बाजूंनी खजुरीची झाडे कोरली होती. मंदिराच्या बाजूला असलेल्या खोल्यांमध्ये सुद्धा लोंबत्या तुळया होत्या.

Source notes (11)
  1. Footnote किंवा 3.2 मीटर
  2. Footnote किंवा 5.3 मीटर
  3. Footnote किंवा 2.7 मीटर
  4. Footnote किंवा 21 मीटर लांब आणि 11 मीटर रुंद
  5. Footnote किंवा 1.1 मीटर
  6. Footnote किंवा 3.7 मीटर
  7. Footnote किंवा 2.1 मीटर
  8. Footnote किंवा 37 मीटर
  9. Footnote किंवा 48 मीटर
  10. Footnote किंवा 53 मीटर
  11. Footnote किंवा 1.5 मीटर

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.