Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

यहेज्केल 3

आणि तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आहे ते खा, ही गुंडाळी खा; नंतर इस्राएली लोकांशी बोल.” तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला खाण्यासाठी गुंडाळी दिली.

तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही जी गुंडाळी मी तुला देत आहे ती पोटभरून खा.” म्हणून ती मी खाल्ली आणि ती माझ्या तोंडात मधासारखी गोड लागली.

नंतर तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, आता इस्राएली लोकांकडे जा आणि त्यांना माझी वचने सांग. अस्पष्ट बोलीच्या किंवा अनोळखी भाषेच्या लोकांकडे नाही, तर इस्राएली लोकांकडे तुला पाठवले जात आहे; दुर्बोध किंवा अनोळखी भाषेचे पुष्कळ लोक, ज्यांची भाषा तुला समजत नाही, त्यांच्याकडे नाही. खचितच जर त्यांच्याकडे मी तुला पाठवले तर त्यांनी तुझे ऐकले असते. परंतु इस्राएल लोक तुझे ऐकत नाही कारण ते माझे वचन ऐकू इच्छित नाही, कारण सर्व इस्राएली लोक कठोर व हट्टी आहेत. पण मी तुला त्यांच्यासारखाच निग्रही व कठोर बनवीन. मी तुझे कपाळ हिऱ्यापेक्षा अधिक कठोर, गारगोटीपेक्षा कठीण करेन, जरी ते बंडखोर लोक आहेत तरी त्यांना भयभीत होऊ नको; किंवा घाबरू नको.”

आणि तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, मी तुझ्याशी जी वचने बोलतो ती काळजीपूर्वक ऐक आणि आपल्या हृदयात जपून ठेव. तर आता निर्वासित असलेल्या तुझ्या लोकांकडे जा आणि त्यांच्याशी बोल. त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात,’ मग ते तुझे ऐको किंवा न ऐकोत.”

मग आत्म्याने मला वर उचलले आणि माझ्या पाठीमागून मोठ्या गर्जनेचा मी आवाज ऐकला, जेव्हा धन्य याहवेहचे वैभव आपल्या स्थानातून उठले.1 हा त्या जिवंत प्राण्यांच्या पंखांचा आवाज होता, जे एकमेकांच्या पंखांना घासत होते आणि त्याच्या बाजूंना असलेल्या चाकांचा मोठ्या गर्जनेचा आवाज होता. तेव्हा आत्म्याने मला वर उचलले आणि मी माझ्या आत्म्यात कटूत्व व रागाने भरून दूर गेलो आणि याहवेहचा मजबूत हात माझ्यावर होता. खेबर नदीजवळ तेल-अवीवकडे राहत असलेल्या निर्वासित लोकांकडे मी आलो आणि ते जिथे राहत होते, तिथे त्यांच्याबरोबर; मी अतिदुःखाने सात दिवस बसलो.

यहेज्केलची पहारेकरी म्हणून कामगिरी

सात दिवसांच्या शेवटी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “मानवपुत्रा, मी तुला इस्राएली लोकांचा पहारेकरी केले आहे; तर जे वचन मी सांगतो ते ऐक आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर. जेव्हा मी दुष्टाला म्हणतो, ‘तू खचितच मरशील,’ आणि त्या व्यक्तीने आपल्या मार्गांपासून वळावे म्हणून तू त्यांना चेतावणी दिली नाहीस किंवा त्यांनी त्यांचे दुष्टमार्ग सोडून त्यांचा जीव वाचवावा म्हणून तू त्यांना सांगितले नाहीस, तर ते दुष्ट व्यक्ती त्यांच्या पापामुळे मरतील आणि त्यांच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन. परंतु त्या दुष्ट व्यक्तीने त्याच्या दुष्टाईपासून व त्यांच्या कुमार्गापासून वळावे म्हणून तू त्याला सावध केलेस आणि ते तसे करीत नाहीत, तर ते त्यांच्या पापामुळे मरतील; परंतु तू स्वतः वाचशील.

“त्याच प्रकारे, जेव्हा एखादा न्यायी आपल्या न्यायत्वापासून मागे फिरतो आणि जे वाईट ते करतो आणि मी त्यांच्यापुढे एक अडखळण ठेवेन आणि तो मरण पावेल. कारण तू त्याला चेतावणी दिली नाही, तो त्याच्या पापामुळे मरेल. जी न्यायीपणाची कृत्ये त्या व्यक्तीने केली ती आठवली जाणार नाहीत, आणि त्याच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन. परंतु पाप करू नये म्हणून तू त्या न्यायी व्यक्तीला चेतावणी दिली आणि त्याने पाप केले नाही आणि त्याने ती चेतावणी स्वीकारली म्हणून तो खचितच जगेल आणि तू स्वतःला वाचवशील.”

त्या ठिकाणी याहवेहचा हात माझ्यावर होता, आणि ते मला म्हणाले, “ऊठ आणि मैदानाकडे जा, तिथे मी तुझ्याशी बोलेन.” तेव्हा मी उठलो व मैदानाकडे गेलो. आणि मी खेबर नदीकाठी पाहिलेल्या वैभवासारखे याहवेहचे वैभव तिथे उभे होते आणि मी उपडा पडलो.

नंतर आत्मा माझ्यामध्ये आला आणि मला माझ्या पायावर उभे केले. याहवेह माझ्याशी बोलले आणि म्हणाले: “जा, स्वतःला आपल्या घरात बंद करून घे. आणि तू हे मानवपुत्रा, ते तुला दोर्‍यांनी बांधतील; तू लोकांमध्ये बाहेर जाऊ नये म्हणून तुला बांधले जाईल. तू शांत असावे आणि त्यांचा निषेध करू नये म्हणून तुझी जीभ तुझ्या टाळूला चिकटेल असे मी करेन, कारण ते बंडखोर लोक आहेत. परंतु मी तुझ्याशी बोलेन, तेव्हा मी तुझे मुख उघडेन आणि तू त्यांना सांगशील, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’ ज्याला ऐकावयाचे आहे ते ऐकतील आणि ज्याला ऐकावयाचे नसेल त्याने ऐकू नये; कारण ते बंडखोर लोक आहेत.

Source notes (1)
  1. Footnote काही मूळ प्रतींनुसार या स्थानातून याहवेहच्या वैभवाची स्तुती होवो

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.