Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
यहेज्केल 13
खोट्या संदेष्ट्यांचा निषेध
याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “मानवपुत्रा, इस्राएलचे संदेष्टे जे आता भविष्यवाणी करीत आहेत त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग. जे आपल्याच स्वतःच्या कल्पनेनुसार भविष्य करतात त्यांना सांग: ‘याहवेहचे वचन ऐका! सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मूर्ख1 संदेष्टे ज्यांनी काहीही पाहिले नाही तरी स्वतःच्याच आत्म्याचे अनुसरण करतात त्यांचा धिक्कार असो! हे इस्राएला, तुझे संदेष्टे ओसाड जागेतील कोल्ह्यांसारखे आहेत. याहवेहच्या दिवशी युद्धात टिकून उभे राहावे म्हणून इस्राएलच्या लोकांसाठी भिंतींच्या खिंडारांना दुरुस्त करावयाला तुम्ही वरती गेला नाही. त्यांचे दृष्टान्त खोटे आहेत आणि त्यांचे शकुन लबाड आहेत. जरी त्यांना याहवेहने पाठवले नाही, तरी ते म्हणतात, “याहवेह जाहीर करतात,” आणि याहवेहने त्यांच्या शब्दाची पूर्तता करावी अशी अपेक्षा बाळगतात. तुम्ही खोटे दृष्टान्त पाहिले नाही काय आणि मी बोललो नाही तरीही, “याहवेह हे जाहीर करतात,” असे तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही खोटा शकुन उच्चारला नाही काय?
“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुमची खोटी वचने व लबाड दृष्टान्त यामुळे मी तुमच्याविरुद्ध आहे असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. जे खोटे दृष्टान्त पाहतात आणि लबाड शकुन उच्चारतात, मी माझा हात त्या संदेष्ट्यांच्या विरुद्ध उगारणार. ते माझ्या लोकांच्या बैठकीचा भाग नसतील किंवा इस्राएलच्या यादीत त्यांची नोंद केली जाणार नाही, ना ते इस्राएलच्या देशात प्रवेश करतील. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच सार्वभौम याहवेह आहे.
“ ‘कारण जरी शांती नसली तरी ते माझ्या लोकांना, “शांती” असे म्हणत बहकवितात, कारण कच्ची भिंत बांधून ते त्यावर चुन्याचा लेप लावतात, म्हणून जे पडणारच आहे त्याला चुन्याचा लेप जे लावतात त्यांना सांग, मुसळधार पाऊस येईल आणि मी मोठ्या गारा खाली पाठवेन आणि तुफानी वारा सुटेल. जेव्हा भिंत कोसळेल तेव्हा, “तुम्ही दिलेला चुन्याचा लेप कुठे आहे” असे लोक तुम्हाला विचारणार नाहीत काय?”
“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या क्रोधाने तुफानी वारा सोडेन आणि माझ्या रागाने नाशाच्या संतापाने गारा व मुसळधार पाऊस पडेल. तुम्ही चुन्याचा लेप लावलेली भिंत मी पाडून टाकेन आणि ती धुळीस मिळवेन, म्हणजे तिचा पाया उघडा पडेल. जेव्हा ती2 पडेल तेव्हा तिच्याबरोबर तुमचाही नाश होईल; आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. याप्रकारे त्या भिंतीविरुद्ध व ज्यांनी तिला चुन्याचा लेप दिला त्यांच्याविरुद्ध मी माझा क्रोध ओतेन. मी तुम्हाला म्हणणार, “भिंत गेली व ज्यांनी तिला चुन्याचा लेप दिला ते सुद्धा गेले, इस्राएलचे ते संदेष्टे ज्यांनी यरुशलेमविषयी भविष्यवाणी केली आणि शांती नसतानाही शांती विषयी दृष्टान्त पाहिले त्यांच्याविषयी सार्वभौम याहवेह असे जाहीर करतात.” ’
“तर आता हे मानवपुत्रा, आपल्यातील कन्या ज्या त्यांच्याच कल्पनेने भविष्य सांगतात, त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग आणि सांग, “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या स्त्रिया आपल्या मनगटांवर जादूच्या ताईत शिवून बांधतात आणि लोकांना फसविण्यासाठी आपल्या डोक्यासाठी वेगवेगळ्या लांबीचे बुरखे तयार करतात, त्या स्त्रियांचा धिक्कार असो. आपला जीव वाचवावा म्हणून तुम्ही माझ्या लोकांचा जीव पाशात टाकता काय? तुम्ही मूठभर जवासाठी आणि भाकरीच्या तुकड्यांसाठी माझ्या लोकांमध्ये मला अपवित्र केले आहे. जे माझे लोक लबाड्या ऐकतात, त्यांच्याशी तुम्ही खोटे बोलला आहात, ज्यांनी मरू नये अशांना तुम्ही मारून टाकले आणि ज्यांनी जगू नये अशांना तुम्ही वाचविले आहे.
“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जादूचे जे ताईत ज्याद्वारे तुम्ही माझ्या लोकांना पक्ष्यांसारखे फसविता, त्याविरुद्ध मी आहे आणि ते मी तुमच्या मनगटांवरून काढून टाकेन; तुम्ही पक्ष्यांप्रमाणे फसविलेल्या लोकांना मी मुक्त करेन. मी तुमच्या डोक्यावरील बुरखे फाडून टाकीन आणि तुमच्या हातून माझ्या लोकांना वाचवेन आणि ते आणखी तुमच्या हाताच्या सामर्थ्याला बळी पडणार नाही. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. कारण ज्या नीतिमानास मी दुखविले नाही, त्यांना तुम्ही तुमच्या लबाड्यांनी निराश केले आहे आणि दुष्टांनी त्यांच्या कुमार्गापासून वळू नये म्हणून तुम्ही त्यांना उत्तेजन देत त्यांचा जीव वाचविता, म्हणून यापुढे तुम्ही खोटे दृष्टान्त पाहणार नाही किंवा शकुन करणार नाही. माझ्या लोकांना मी तुमच्या हातून सोडवेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”
Source notes (2)
- Footnote किंवा दुष्ट
- Footnote किंवा शहर
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.