Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

निर्गम 12

वल्हांडण व बेखमीर भाकरीचा सण

मग इजिप्तमध्ये याहवेह मोशे व अहरोन यांच्याशी बोलले, “हा महिना तुमच्यासाठी पहिला महिना, वर्षाचा पहिला महिना असेल. तू इस्राएलाच्या सर्व समुदायाला जाहीर कर की, या महिन्याच्या दहाव्या दिवशी, प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी एक कोकरू घ्यावे, प्रत्येक घराण्यासाठी एक कोकरू. जर एखादे कुटुंब एका कोकराच्या मानाने लहान असले तर शेजारच्या कुटुंबाबरोबर, त्यांच्यातील लोकांची संख्या लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्ती किती खाईल यानुसार अंदाज घेऊन, किती कोकरे लागतील हे ठरवावे. एक वर्षाचे निर्दोष नर कोकरू असावे, आणि तुम्ही ते मेंढरांतून अथवा शेळ्यांतून घ्यावे. या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत त्यांची काळजी घ्यावी आणि इस्राएली लोकातील सर्वांनी सायंकाळी ते कापावेत. ज्या घरांमध्ये ते खातील त्या घराच्या दोन्ही दारपट्ट्यांना व कपाळपट्टीला त्या कोकराचे रक्त घेऊन ते लावावे. त्या रात्री प्रत्येकाने त्या कोकर्‍याचे विस्तवावर भाजलेले मांस, बेखमीर भाकर व कडू भाजी यांच्याबरोबर खावे. मांस कच्चे किंवा पाण्यात उकळून खाऊ नये, तर विस्तवावर भाजून, त्याचे डोके, पाय व आतड्यांसह खावे. त्यातील काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये; जर काही सकाळपर्यंत उरले तर ते जाळून टाकावे. तुम्ही ते असे खावे: तुमच्या कंबरा बांधलेल्या, तुमची पायतणे पायात घातलेली व हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा याहवेहचा वल्हांडण1 आहे.

“कारण त्याच रात्री मी संपूर्ण इजिप्त देशामधून संचार करेन व सर्व मनुष्यांचे व जनावरांचे प्रथमवत्स मारून टाकेन आणि त्यांच्या सर्व दैवतांवर न्याय आणेन; मी याहवेह आहे. तुम्ही राहत असलेल्या घरांच्या दारांवर असलेले रक्त हे तुमच्याकरिता चिन्ह असेल, जेव्हा मी ते रक्त पाहीन, तेव्हा मी तुम्हाला ओलांडून पुढे जाईन. जेव्हा मी इजिप्तला तडाखा देईन, तेव्हा कोणतीही विनाशी पीडा तुम्हाला स्पर्श करणार नाही.

“हा दिवस तुम्ही याहवेहचा सण म्हणून पिढ्यान् पिढ्यांपर्यंत सर्वकाळच्या नियमाने पाळावा. सात दिवस तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी. पहिल्या दिवशी आपल्या घरातून खमीर काढून टाकावे, कारण जे कोणी या सात दिवसात खमीर घातलेल्या वस्तू खाईल, त्याला इस्राएलातून बेदखल करण्यात यावे. पहिल्या दिवशी एक पवित्र सभा भरवावी आणि सातव्या दिवशी दुसरी सभा. या दिवसात प्रत्येकाने खाण्यासाठी अन्न तयार करण्याशिवाय इतर कोणतेही काम करू नये.

“बेखमीर भाकरीचा सण पाळावा, कारण याच दिवशी मी तुमच्या सैन्यांना इजिप्तमधून बाहेर आणले. पिढ्यान् पिढ्यांपर्यंत सर्वकाळच्या नियमाने तो पाळावा. पहिल्या महिन्यात चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी. या सात दिवसात तुमच्या घरात खमीर सापडू नये. आणि कोणीही, तो परदेशी असो वा देशात जन्मलेला असो, जो खमीर घातलेले पदार्थ खाईल तर त्याला इस्राएलाच्या समाजातून वाळीत टाकले जावे. खमीर घातलेले काहीही खाऊ नये. तुम्ही कुठेही राहत असला तरी तुम्ही बेखमीर भाकरीच खावी.”

मग मोशेने इस्राएलातील वडीलजनांना बोलाविले व म्हटले, “तुम्ही लगेच जा व आपआपल्या कुटुंबाप्रमाणे कोकरू निवडून घ्या व वल्हांडणाच्या कोकराचा वध करा. एजोबाची जुडी घेऊन ती पात्रात घेतलेल्या रक्तात बुडवा व त्याने ते रक्त घराच्या दरवाजाच्या बाजूंवर व कपाळपट्टीवर लावा. तुम्हापैकी कोणीही सकाळ होईपर्यंत आपल्या घराबाहेर पडू नये. कारण याहवेह या देशात संचार करतील व इजिप्तवासियांचा संहार करतील. पण ज्या दरवाजाच्या बाजूंवर व कपाळपट्टीवर रक्त दिसेल, याहवेह त्या घराला ओलांडून पुढे जातील व विनाशकाला तुम्हाला मारण्यास तुमच्या घरात येऊ देणार नाहीत.

“तुमच्यासाठी व तुमच्या वंशजांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा. वचन दिल्याप्रमाणे जो देश याहवेह तुम्हाला देणार आहेत, त्या देशात तुम्ही जाल, तिथेही हा विधी पाळावा. जेव्हा तुमची लेकरे तुम्हाला विचारतील, ‘या विधीचा अर्थ काय आहे?’ तेव्हा त्यांना सांगा, ‘हा याहवेहसाठी वल्हांडणाचा यज्ञ आहे, ज्यांनी इजिप्तच्या लोकांचा संहार करून त्यांचा नाश केला, आणि इस्राएली लोकांची घरे ओलांडून गेले आणि आम्हाला वाचविले.’ ” तेव्हा लोकांनी आपली मस्तके नमवून त्यांना नमन केले व त्यांची आराधना केली. मग याहवेहने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले.

मध्यरात्रीत याहवेहने इजिप्त देशातील प्रथम जन्मलेले सर्व मारून टाकले. सिंहासनावर बसणार्‍या फारोहच्या प्रथम पुत्रापासून तुरुंगात असलेल्या कैद्याच्या प्रथम जन्मलेल्या पुत्रापर्यंत, जनावरांचे प्रथम जन्मलेले वत्स देखील मारून टाकले. तेव्हा फारोह, त्याचे अधिकारी व सर्व इजिप्तचे लोक रात्री जागे झाले आणि इजिप्तमध्ये मोठा आकांत झाला, कारण ज्या घरात मृत्यू झाला नाही, असे एकही घर नव्हते.

निर्गम

तेव्हा फारोहने मोशे व अहरोन यांना रात्री बोलावून म्हटले, “उठा! तुम्ही व इस्राएली लोक माझ्या लोकांना सोडून जा! जा, आणि तुम्ही मागितल्याप्रमाणे याहवेहची उपासना करा. तुमची शेरडेमेंढरे आणि गुरे घ्या आणि निघून जा आणि मलाही आशीर्वाद द्या.”

इस्राएली लोक देशाबाहेर त्वरेने जावे म्हणून इजिप्तच्या लोकांनी त्यांना विनंती केली. कारण ते म्हणाले, “नाहीतर आम्ही सर्व मरून जाऊ!” मग इस्राएली लोकांनी खमीर घालण्यापूर्वी कणीक परातीसह कापडात बांधून खांद्यावर टाकली. मोशेने सांगितल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी इजिप्तच्या लोकांकडून चांदीचे व सोन्याचे दागिने व कपडे मागून घेतले. इजिप्तचे लोक इस्राएली लोकांवर कृपादृष्टी करतील असे याहवेहने केले आणि जे काही त्यांनी मागितले ते सर्व त्यांनी त्यांना दिले; अशाप्रकारे त्यांनी इजिप्तच्या लोकांना लुटले.

इस्राएल लोकांनी रामसेस पासून ते सुक्कोथ पर्यंत प्रवास केला. स्त्रिया व लेकरे या खेरीज सुमारे सहा लाख पुरुष पायी चालणारे होते. इतर पुष्कळ लोकसुद्धा त्यांच्याबरोबर निघाले होते, त्याचप्रमाणे शेरडेमेंढरांचे कळप व जनावरेही होती. जी कणीक इस्राएल लोकांनी इजिप्तमधून बरोबर आणली होती, त्याच्या त्यांनी भाकरी भाजल्या. ते कणीक बेखमीर होते, कारण जेव्हा त्यांना इजिप्तमधून घालवून दिले, स्वतःसाठी अन्न तयार करावयाला वेळ नव्हता.

इस्राएली लोक इजिप्तमध्ये राहिले तो कालावधी चारशेतीस वर्षांचा होता. चारशेतिसाव्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी याहवेहच्या सैन्यांनी इजिप्त देश सोडला. ही रात्र याहवेहने इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणण्यासाठी वेगळी करून ठेवली, ही रात्र इस्राएल लोकांनी पिढ्यान् पिढ्या याहवेहला सन्मान म्हणून पाळावी.

वल्हांडणाचे नियम

नंतर याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले, “वल्हांडणाच्या भोजनाचे हे नियम आहेत:

“कोणत्याही विदेशी व्यक्तीने ते खाऊ नये. पण तू मोल देऊन विकत घेतलेला गुलाम व ज्याची सुंता तू करून घेतली आहे त्याने ते खावे. पण तात्पुरता रहिवासी किंवा मोलकरी यांनी ते खाऊ नये.

“ते घरातच खावयाचे आहे; त्यातील मांस घराबाहेर घेऊन जाऊ नये. त्यातील एकही हाड मोडू नये. इस्राएलाच्या सर्व समुदायाने हा सण पाळावा.

“तुमच्याबरोबर राहणार्‍या विदेशी व्यक्तीला याहवेहचा हा वल्हांडणाचा सण पाळावयाचा असेल, तर त्यांच्यातील सर्व पुरुषांनी सुंता करवून घ्यावी; मगच ते या देशात जन्मलेल्याप्रमाणे हा सण पाळू शकतील. कोणत्याही बेसुंती पुरुषाने ते खाऊ नये. तुमच्यामध्ये असलेले स्वदेशी असो वा तुमच्यामध्ये असलेले विदेशी असो, दोघांनाही एकच नियम असावा.”

तेव्हा याहवेहने मोशे व अहरोन यांना सूचना दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले. याच दिवशी याहवेहने वंशानुसार इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले.

Source notes (1)
  1. Footnote मूळ भाषेत पेसाह-ओलांडणे

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.