Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

उपदेशक 7

सुज्ञान

सन्माननीय नाव हे सुवासिक अत्तरापेक्षा उत्तम आहे,

आणि मृत्युदिन जन्म दिवसापेक्षा उत्तम आहे.

मेजवानीच्या घरी जाण्यापेक्षा

शोकाकुल घरात जाणे हे अधिक उत्तम आहे,

प्रत्येक मनुष्याने1 ही गोष्ट लक्षात ठेवावी;

मृत्यू हे सर्वांचे विधिलिखित आहे.

विलाप करणे हे हसण्यापेक्षा बरे,

कारण दुःखी चेहरा हृदयासाठी बरा आहे.

सुज्ञानी मनुष्याचे हृदय शोकाकुल घरात असते,

परंतु मूर्खांचे हृदय सुखाच्या घरात असते.

सुज्ञानी व्यक्तीच्या निषेधाकडे लक्ष देणे

मूर्खाचे गीत ऐकण्यापेक्षा उत्तम आहे.

मूर्खाचे हसणे हे

पात्राखालील अग्नीतील तडतडणाऱ्या काट्यांप्रमाणे आहे,

हे सुद्धा व्यर्थ आहे.

पिळवणूक सुज्ञानी मनुष्याला मूर्ख बनविते,

आणि लाच हृदयाला भ्रष्ट करते.

एखाद्या कामाचा शेवट त्याच्या आरंभापेक्षा बरा,

आणि गर्वापेक्षा सहनशीलता बरी.

क्रोधित होण्यास तुझ्या अंतःकरणात घाई करू नकोस,

क्रोध तर मूर्खाच्या मांडीवर वास करतो.

असे म्हणू नको, “जुने दिवस सध्याच्या दिवसांपेक्षा अधिक चांगले का होते?”

कारण असे प्रश्न विचारणे हे सुज्ञान नव्हे.

सुज्ञान, हे वतन प्राप्तीप्रमाणे चांगले आहे,

आणि ज्यांना सूर्य दिसतो2 त्यांच्यासाठी ते लाभदायक आहे.

जसे धन तसेच

सुज्ञान हे एक आश्रयस्थान आहे,

परंतु सुज्ञानाचा फायदा हा आहे:

ज्ञान ज्यांच्या मालकीचे आहे, त्यांचे रक्षण करते.

परमेश्वराच्या कामावर मनन करा:

त्यांनी जे वाकडे केले आहे

ते कोण सरळ करू शकतो?

जेव्हा वेळ अनुकूल असते तेव्हा आनंद करा;

परंतु जेव्हा वेळ प्रतिकूल असते, तेव्हा हे लक्षात घ्या:

परमेश्वराने जशी अनुकूल वेळ निर्माण केली

तशी प्रतिकूल वेळही त्यांनीच निर्माण केली,

म्हणून कोणा व्यक्तीला आपल्या भविष्याबद्दल

जाणून घेता येत नाही.

या व्यर्थ जीवनामध्ये मी दोन्ही गोष्टी पाहिल्या आहेत:

नीतिमान व्यक्ती त्यांच्या नीतिमत्वात नाहीसे होतात,

आणि दुष्ट त्यांच्या दुष्टपणात दीर्घायुष्य जगतात.

अति नीतिमान होऊ नका,

किंवा अति सुज्ञानीही असू नका—

तुम्ही स्वतःचा नाश का करून घ्यावा?

अति दुष्ट होऊ नका,

आणि मूर्खही असू नका—

तुमची वेळ येण्यापूर्वी का मरावे?

पहिल्याला घट्ट धरून ठेवणे,

आणि दुसर्‍यालाही सोडून न देणे हे बरे.

जे परमेश्वराचे भय धरतात ते अतिरेक टाळतील.3

सुज्ञान एखाद्या बुद्धिमान व्यक्तीला

एका शहराच्या दहा शासकांपेक्षा अधिक शक्तिशाली बनवते.

खरोखर, या पृथ्वीवर नीतिमान असा कोणीही नाही,

असा एकही व्यक्ती नाही जो चांगलेच करतो आणि कधीच पाप करीत नाही.

लोकांच्या प्रत्येक शब्दांकडे लक्ष देऊ नका,

नाहीतर तुमचा चाकरसुद्धा तुम्हाला शाप देताना तुम्ही ऐकाल—

कारण तुम्ही इतरांना कितीदा शाप दिला

हे तुम्हाला तुमच्या मनातच ठाऊक आहे.

सुज्ञानाने मी या सर्व गोष्टी तपासून पाहिल्या आणि म्हटले,

“मी सुज्ञानी होण्याचे ठरविले आहे”—

परंतु हे माझ्या शक्तीच्या पलीकडे होते.

जे काही अस्तित्वात आहे ते खूपच दूर आणि सखोल आहे,

त्याचा शोध कोणाला घेता येईल?

ज्ञान व रचनेच्या पध्दती जाणून व त्याच शोध घेण्यासाठी

आणि दुष्टतेची मूर्खता

व मूर्खतेचा वेडेपणा समजण्यासाठी

मी माझे मन वळविले.

मरणापेक्षाही अति कटू गोष्ट मला दिसून आली की,

एक स्त्री जी एक पाश आहे,

जिचे हृदय एक सापळा आहे

जिचे हात साखळीप्रमाणे आहेत.

जे परमेश्वराला प्रसन्न करतात ते तिच्यापासून निसटतील,

परंतु पापींना ती पाशात अडकवेल.

“पाहा,” शिक्षक4 असे म्हणतो, “या गोष्टींचा मी शोध लावला आहे:

“रचनेच्या पध्दती समजण्यासाठी मी एक गोष्ट दुसरीत मिळविली—

जेव्हा मी शोध घेत होतो

मला काही निष्पन्न झाले नाही—

हजारांमध्ये एक नीतिमान मनुष्य होता.

परंतु त्या सर्वांमध्ये एकही स्त्री नीतिमान नव्हती.

एकच गोष्ट माझ्या लक्षात आली:

परमेश्वराने मानवजात नीतिमान अशी निर्माण केली,

परंतु ते अनेक योजनांचा शोधच करीत राहिले.”

Source notes (4)
  1. Footnote प्रत्येक मनुष्याने अर्थात् जीवितांनी
  2. Footnote अर्थात् जे जिवंत आहेत
  3. Footnote किंवा त्या दोन्हीना अनुसरतील
  4. Footnote किंवा मंडळीचा उपदेशक

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.