Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

प्रेषित 11

पेत्र आपल्या कृतीचे स्पष्टीकरण करतो

गैरयहूदी लोकांनीही परमेश्वराचे वचन ग्रहण केले हे प्रेषितांच्या आणि यहूदीया प्रांतातील विश्वासणार्‍यांच्या कानी गेले. मग पेत्र वर यरुशलेमला गेला, त्यावेळी सुंता झालेल्या विश्वासणार्‍यांनी त्याच्यावर टीका केली ते म्हणाले, “तू असुंती लोकांच्या घरी गेलास आणि त्यांच्याबरोबर भोजन केले.”

त्यावर पेत्राने सुरुवातीपासून, सर्वगोष्टी सविस्तर सांगितल्या: तो म्हणाला, “मी योप्पा शहरात प्रार्थना करीत असताना, माझे देहभान सुटले तेव्हा मी दृष्टान्त पाहिला. त्यामध्ये मोठ्या चादरी सारखे काहीतरी चारही कोपरे धरून आकाशातून खाली सोडले जात आहे आणि मी जिथे होतो तिथे ते खाली आले. मी त्यामध्ये डोकावून पाहिले मला पृथ्वीवरील चतुष्पाद प्राणी, श्वापदे, सरपटणारे जीवजंतू व आकाशातील पाखरे दिसली. तेव्हा एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली, ‘पेत्रा, ऊठ व मारून खा.’

“मी उत्तर दिले, ‘प्रभू खात्रीने नाही! कारण अस्वच्छ व अशुद्ध असे कधीही माझ्या तोंडात गेलेले नाही.’

“स्वर्गातून दुसर्‍या वेळेस वाणी ऐकू आली, ‘परमेश्वराने जे शुद्ध केले आहे, ते अशुद्ध असे म्हणू नकोस.’ असे तीन वेळा झाले आणि ते सर्व परत स्वर्गाकडे घेतले गेले.

“नेमक्या याच वेळी कैसरीयाहून मजकडे पाठविलेली तीन माणसे मी राहत होतो त्या घराच्या समोर येऊन उभी राहिली. तेव्हा आत्मा मला म्हणाला त्यांच्याबरोबर जाण्यास संकोच करू नको. मजबरोबर सहा बंधूही सोबतीला होते आणि आम्ही त्या मनुष्याच्या घरी प्रवेश केला. त्याने आम्हाला सांगितले की परमेश्वराचा दूत त्याच्या घरात प्रकट झाला आणि म्हणाला, ‘योप्पा येथे शिमोन ज्याला पेत्र म्हणतात त्याला बोलावून घे. तो तुला संदेश सांगेल त्याद्वारे तुझे आणि तुझ्या सर्व घराण्याचे तारण होईल.’

“मी बोलण्यास सुरुवात केली, तेव्हाच पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला, जसा तो सुरुवातीला आपल्यावर उतरला होता. तेव्हा मला आठवण झाली की, प्रभू येशूंनी काय सांगितले होते: ‘योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला, परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.’ म्हणून जर परमेश्वराने तेच दान त्यांना दिले, जे आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा आपल्याला मिळाले, तर परमेश्वराला विरोध करणारा मी कोण?”

त्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांच्याकडे आणखी काही प्रश्न राहिले नाहीत आणि ते परमेश्वराची स्तुती करू लागले व म्हणाले, “तर आता परमेश्वराने गैरयहूदीयांनाही पश्चात्ताप करण्याची संधी दिली आहे ज्यामुळे त्यांना जीवन प्राप्त होईल.”

अंत्युखिया येथील मंडळी

स्तेफनाचा वध झाल्यानंतर छळामुळे जे इतरत्र पांगले होते ते प्रवास करीत फेनिके, सायप्रस व अंत्युखिया येथे गेले व त्यांनी केवळ यहूदीयांनाच वचन सांगितले. तरी, सायप्रस व कुरेने, येथून अंत्युखिया येथे गेलेल्या काही लोकांनी प्रभू येशूंविषयीची शुभवार्ता ग्रीक लोकांनाही सांगितली. तेव्हा प्रभूचे सामर्थ्य त्यांच्यावर होते, म्हणून लोकांनी मोठ्या संख्येने विश्वास ठेवला आणि ते प्रभूकडे वळले.

यरुशलेम येथे असलेल्या मंडळीने जेव्हा ही बातमी ऐकली, तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियास पाठविले. जेव्हा तो तिथे आला आणि परमेश्वराच्या कृपेमुळे जे काही झाले होते ते पाहून तो आनंदित झाला आणि त्या सर्वांनी पूर्ण मनाने प्रभूबरोबर एकनिष्ठ राहावे असे त्याने त्या सर्वांना उत्तेजन दिले. बर्णबा एक चांगला मनुष्य होता, तो पवित्र आत्म्याने भरलेला आणि विश्वासात परिपूर्ण असा होता आणि फार मोठ्या संख्येने लोकांना प्रभूकडे आणले.

त्यानंतर शौलाचा शोध घेण्यासाठी बर्णबा पुढे तार्ससला गेला, जेव्हा तो त्याला भेटला, त्याने त्याला अंत्युखिया येथे आणले. बर्णबा व शौल दोघेही वर्षभर मंडळ्यांमध्ये अनेक लोकांना भेटून शिक्षण देत राहिले. अंत्युखिया मध्येच शिष्यांना ख्रिस्ती हे नाव प्रथम मिळाले.

याकाळात काही संदेष्टे यरुशलेमकडून खाली अंत्युखियास आले. त्यांच्यामधील अगब नावाचा एकजण उभा राहिला आणि आत्म्याच्या साहाय्याने त्याने असे भविष्य सांगितले की, सर्व रोमी साम्राज्यात मोठा दुष्काळ पडणार आहे. (क्लौडियसच्या कारकिर्दीत हे झाले.) तेव्हा शिष्यांनी असे ठरविले की, प्रत्येकांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे यहूदीयामध्ये राहणार्‍या बंधू भगिनींना मदत करावी. त्याप्रमाणे त्यांनी केले, त्यांच्या देणग्या तेथील वडीलमंडळींना पाठविण्यासाठी त्यांनी शौल व बर्णबाच्या स्वाधीन केल्या.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.