Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

2 शमुवेल 12

नाथानचा दावीदाला निषेध

नंतर याहवेहनी नाथानला दावीदाकडे पाठवले. जेव्हा नाथान त्याच्याकडे आला, तो म्हणाला, “एका शहरात दोन माणसे राहत होती, एक श्रीमंत होता तर दुसरा गरीब. श्रीमंत माणसाजवळ पुष्कळ मेंढरे व गुरे होती, परंतु गरीब मनुष्याकडे त्याने विकत घेतलेल्या एका लहान मेंढीशिवाय काहीच नव्हते. त्याने ती वाढवली, ती त्याच्याबरोबर आणि त्याच्या लेकरांबरोबर वाढली. तिने त्याच्या अन्नामधून खाल्ले, त्याच्या प्याल्यातून पाणी प्याले आणि त्याच्या बाहूंमध्येच ती झोपी जात असे. त्याला ती आपल्या मुलीप्रमाणेच होती.

“त्या श्रीमंत मनुष्याकडे एक पाहुणा आला. परंतु त्या श्रीमंत मनुष्याने त्या पाहुण्यासाठी भोजन बनवावे म्हणून त्याच्याकडील असलेल्या मेंढरे किंवा गुरातून घेतले नाही, त्याऐवजी त्याने त्या गरीब माणसाची ती लहान मेंढी घेऊन त्याच्याकडे आलेल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले.”

हे ऐकून दावीद त्या माणसावर रागाने भडकला आणि नाथानला म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, ज्या मनुष्याने असे केले आहे तो मेलाच पाहिजे! त्याने त्या मेंढीसाठी चारपट किंमत मोजावी, कारण त्याने दया न करता असे कृत्य केले आहे.”

तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, “तो मनुष्य तूच आहेस! याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘मी तुझा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला आणि तुला शौलाच्या हातातून सोडविले. तुझ्या धन्याचे घर मी तुला दिले आणि तुझ्या धन्याच्या स्त्रिया तुझ्या बाहूंमध्ये दिल्या. मी तुला संपूर्ण इस्राएल आणि यहूदीया दिले. आणि हे सर्व फार थोडेच होते तर, मी तुला अधिक दिले असते. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते करून तू याहवेहचा शब्द का अवमानीत केला आहेस? उरीयाह हिथी याला तू तलवारीने मारून टाकलेस आणि त्याची पत्नी तू आपली स्वतःची पत्नी म्हणून घेतली आहेस. तू त्याला अम्मोन्यांच्या तलवारीने ठार मारलेस. तर आता, तलवार तुझ्या घराण्याला कधीही सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ लेखले आणि उरीयाह हिथीची पत्नी तू स्वतःची पत्नी म्हणून घेतली आहेस.’

“याहवेह असे म्हणतात: ‘तुझ्याच घराण्यातून मी तुझ्यावर अरिष्ट आणणार आहे. तुझ्या डोळ्यांसमोर मी तुझ्या स्त्रिया घेऊन तुझ्या जिवलगाला देईन आणि तो दिवसाच्या प्रकाशात तुझ्या स्त्रियांशी संबंध ठेवील. तू हे गुप्तपणे केलेस, परंतु मी हे दिवसाच्या प्रकाशात सर्व इस्राएलसमोर करेन.’ ”

नंतर दावीद नाथानाला म्हणाला, “मी याहवेहविरुद्ध पाप केले आहे.”

नाथानाने उत्तर दिले, “याहवेहने तुझे पाप दूर केले आहे. तू मरणार नाहीस. परंतु हे कृत्य करून तू याहवेहचा भयंकर अनादर1 केला आहेस, या कारणाने तुझ्यापासून जन्मलेला मुलगा मरण पावेल.”

नाथान घरी निघून गेल्यानंतर, उरीयाहच्या पत्नीपासून दावीदाला झालेल्या मुलावर याहवेहने वार केला आणि तो आजारी पडला. दावीदाने मुलासाठी परमेश्वराकडे याचना केली. त्याने उपास केला व गोणपाट घालून रात्रभर जमिनीवर पडून राहिला. त्याच्या घरातील वडील लोक त्याला जमिनीवरून उठविण्यासाठी त्याच्या बाजूला उभे राहिले, परंतु त्याने नकार दिला आणि त्याने त्यांच्याबरोबर काहीही अन्न खाल्ले नाही.

सातव्या दिवशी ते मूल मरण पावले. मूल मरण पावले आहे हे दावीदाला सांगण्यासाठी त्याचे सेवक घाबरत होते, कारण त्यांना वाटले, “मूल जिवंत असताना आम्ही त्याला समजाविले पण तो आमचे ऐकत नव्हता. तर आता आम्ही त्याला कसे सांगावे की, मूल मरण पावले आहे? तो स्वतःला काही अपाय करून घेईल.”

आपले सेवक एकमेकात कुजबुज करीत आहेत असे दावीदाच्या लक्षात आले, आणि त्याला समजले की मूल मरण पावले आहे. त्याने विचारले, “मूल मरण पावले आहे काय?”

“होय, तो मरण पावला आहे.” त्यांनी उत्तर दिले.

तेव्हा दावीद जमिनीवरून उठला, त्याचे स्नान झाल्यानंतर, तैलाभ्यंग करून आपले कपडे बदलले व याहवेहच्या घरात जाऊन त्याने आराधना केली, मग तो आपल्या स्वतःच्या घरात गेला व त्याने मागितल्यानुसार त्यांनी त्याच्यापुढे अन्न वाढले, आणि त्याने ते खाल्ले.

त्याच्या सेवकांनी त्याला विचारले, “तुम्ही हे असे का वागत आहात? मूल जेव्हा जिवंत होते, तेव्हा तुम्ही उपास केला आणि रडलात, परंतु आता मुलाचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही उठून भोजन करीत आहात.”

त्याने उत्तर दिले, “मूल अजून जिवंत होते तेव्हा मी उपास केला आणि रडलो, मला वाटले, ‘न जाणो याहवेहची कृपा कदाचित माझ्यावर होईल आणि ते मुलाला वाचवतील.’ परंतु आता तो मरण पावला आहे, तर मी उपास का करावा? मी त्याला पुन्हा परत आणू शकणार आहे काय? मी त्याच्याकडे जाईन, परंतु तो माझ्याकडे परत येणार नाही.”

नंतर दावीदाने आपली पत्नी बथशेबा हिचे सांत्वन केले आणि तो तिच्याकडे गेला आणि त्याने तिच्याशी प्रीतिसंबंध केला. तिने एका पुत्राला जन्म दिला आणि त्यांनी त्याचे नाव शलोमोन असे ठेवले. याहवेहने त्याच्यावर प्रीती केली; कारण याहवेहने त्याच्यावर प्रीती केली, म्हणून याहवेहने नाथान संदेष्ट्याद्वारे निरोप पाठवून त्याचे नाव यदीदियाह2 असे ठेवले.

त्या कालांतरात योआबाने अम्मोन्यांच्या राब्बाह नगराविरुद्ध लढाई केली आणि राजदूर्ग ताब्यात घेतले. नंतर योआबाने संदेशवाहकांना दावीदाकडे निरोप पाठवित सांगितले, “मी राब्बाहशी युद्ध केले आणि राजदूर्ग ताब्यात घेऊन त्या शहराचा पाणी पुरवठा हस्तगत केला आहे. तर आता उरलेले सैन्य गोळा करा आणि शहराला वेढा घाला आणि ते ताब्यात घ्या. नाहीतर मी ते शहर घेईन आणि ते माझ्या नावावर होईल.”

त्याप्रमाणे दावीदाने संपूर्ण सैन्य एकत्रित केले आणि तो राब्बाह शहराकडे गेला आणि त्यावर हल्ला करून ते ताब्यात घेतले. दावीदाने त्यांच्या राजाच्या डोक्यावरून मुकुट काढून घेतला आणि तो स्वतःच्या डोक्यावर ठेवला. त्याचे वजन सोन्याचा एक तालांत3 होते व त्यावर मोलवान रत्ने जडविलेली होती. दावीदाने त्या शहरातून मोठ्या प्रमाणात लूट घेतली आणि त्या शहरातील लोक जे तिथे होते त्यांना त्याने बाहेर आणले, व त्यांना करवती, लोखंडी कुदळ आणि कुऱ्हाडीच्या साहाय्याने मजुरी करण्यास लावले आणि त्याने त्यांना वीटभट्टीवर काम करावयास लावले. दावीदाने अम्मोन्यांच्या नगरांचे असे केले. नंतर तो व त्याचे सर्व सैन्य यरुशलेमास परतले.

Source notes (3)
  1. Footnote जुन्या इब्री प्रतींमध्ये शत्रूंपुढे अनादर
  2. Footnote यदीदियाह म्हणजे याहवेहला प्रिय
  3. Footnote अंदाजे 34 कि.ग्रॅ.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.